सॅबी परेरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेलेल्या देहदान केलेल्या / बेवारशी प्रेतांना फाडून, त्याला विशिष्ठ रसायनं लावून “बॉडी” जतन करण्याचं काम करणारा मेडिकल कॉलेजच्या डिसेक्शन हॉलमधील एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी, ज्याच्या दुकानात सदैव बोकडाची चामडं उतरवलेली ‘बॉडी’ लटकत असते असा एक खाटीक, “बॉडीची” मोजमापं घेऊन शरीराची वैगुण्ये झाकून गुण ठळक करण्याचं काम करणारी एक लेडीज टेलर, मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मेलेल्या व्यक्तींची “बॉडी” वापरणारे, पुरेशा बॉड्या मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त करणारे मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर, आणि मृत व्यक्तीची “बॉडी” घेऊन त्यापासून रोबोट तयार करण्याच्या प्रयत्नात असलेले एक नामांकित डॉक्टर. अशी वेगवेगळ्या अंगाने बॉडीशी संबंधीत पात्रे एकत्र येतात आणि अभिनय-संवादाची अशी काही भेदक बॉडीलाईन गोलंदाजी करतात की प्रेक्षागृहात बसलेल्या जिवंत बॉड्यांच्या मेंदूला हसता-हसता झिणझिण्या आल्यावाचून राहत नाहीत.

प्रेतं फाडफाडून निबर झालेला, तुकोबाच्या भक्तीत तल्लीन होणारा आणि त्याचवेळी प्रेतागारातल्या एका मुलीच्या प्रेतावर अत्यंत उत्कट आणि निरागस प्रेम करणारा विजय, आपल्याला विकृत न वाटता त्याच्याबद्दल आपल्याला कणव वाटते. शरीरं फाडण्यापासून सुरु झालेला ते शरीरापासून मुक्त होऊन राहावसं वाटण्यापर्यंतचा विजयचा प्रवास गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या नैसर्गिक अभिनय शैलीत दाखवलाय म्हणण्यापेक्षा ते विजयच्या बॉडीतच नव्हे तर अंतरंगात शिरलेत असं म्हणणंच संयुक्तिक ठरेल.

हेही वाचा : अनवट नात्याची रंजक बाईक-राईड: बाप ल्योक

श्रीकांत यादव यांनी यांनी केलेली विजयच्या खाटिक मित्राची भुमिका खास जमली आहे. त्या दोघांचा दारू पितानाचा प्रसंग हा, लेखकाने लिहिलेले संवाद आणि गिरीश कुलकर्णी- श्रीकांत यादव यांची अभिनयाची जुगलबंदी यासाठी बघावाच असा झालेला आहे. इतर कलाकारांची साथही तोलामोलाची आहे. तुकाराम महाराजांच्या भूमिकेतील डॉक्टर अभिजित ढेरे यांनी गायलेले सर्वच अभंग आणि विशेषतः नाटकाच्या शेवटी असलेला ‘का रे माझा तुज न ये कळवळा’ हा अभंग विशेष प्रभावी झाला आहे. पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना आदी तांत्रिक बाबीही नाटकाच्या प्रकृतीला साजेशा झालेल्या आहेत.

हेही वाचा : स्वातंत्र्याच्या उंबऱ्यावरील सिनेमाची ‘ज्युबिली’

ही एक प्रकारची फँटसी असली तरी लेखक डॉ. हर्षवर्धन श्रोत्री आणि दिग्दर्शक किरण यज्ञोपवित हे दोघे, तगड्या कलाकारांच्या साथीने हा फँटसीचा खेळ बिलीव्हेबल करण्यात, आणि प्रेक्षकालाही या खेळात सामील करण्यात पुरते यशस्वी झाले आहेत. अधूनमधून नाटकाचा मंदावणारा वेग हा नाटकाच्या बॉडीत रमलेल्या प्रेक्षकाला नाटकाच्या अंतरंगात उतरायला अवकाश मिळवून देतो.

हेही वाचा : महारानी-2: बिहारी पोलिटिकल ड्रामा

आपल्या मरणाच्या वेळी जेंव्हा आपण निव्वळ एक ‘बॉडी’ या शिवाय इतर काही राहणार नाही, तेंव्हा आपल्या इतकी वर्ष अट्टाहासानं जपलेल्या प्रेमाचे, द्वेषाचे, विचारसरणीचे, मतांचे, राग–लोभाचे, अहंकारांचे, विचारांचे, आठवणींचे काय होत असेल, ते सारं कुठे जात असेल या विचाराचा भुंगा हे नाटक आपल्या बॉडीच्या वरच्या भागात सोडून देते. अनेक संवाद, प्रसंग आणि मौनातुनही आपल्याला अंतर्मुख व्हायला लावणारे, चामडी सोलवटून आपल्या बॉडीच्या आत डोकावायला लावणारे, शरीराला अलगद मसाज करीत असल्याचं भासवून मेंदूला रग्गड व्यायाम देणारे पाहायलाच हवे असे नाटक म्हणजे “होल बॉडी मसाज”!

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish kulkarni starar whole body massage marathi drama review sva 00
Show comments