-श्रुति गणपत्ये

सत्ताधारी पक्ष अनेकदा आपली राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी धार्मिक दंग्यांना प्रोत्साहन देतो. त्यातून हजारो लोकांचं आयुष्य कायमच उद्ध्वस्त होऊ जातं. जाती-धर्मातली दरी आणखी वाढते आणि कोणे एकेकाळी कुटुंबाप्रमाणे वावरणारी माणसं एकमेकांच्या जीवाचे दुश्मन होऊन जातात. इतकं स्पष्ट राजकीय विश्लेषण घेऊन हॉटस्टारवर रंजन चांडेल दिग्दर्शित “ग्रहण” नावाची मालिका या आठवड्यामध्ये प्रदर्शित झाली. शीख दंगलींवर बेतलेल्या सत्या व्यास यांच्या “चौरासी” या कादंबरीवरून मालिकेची कथा घेतली आहे. पवन मल्होत्रा हा एक जुना, कसलेला नट सोडला तर बाकी बहुतेक चेहरे झोया हुसेन, वाकिमा गब्बी, अंशुमन पुष्कर ते त्या मानाने नवीन आहेत. पण अभिनयाच्या बाबत मात्र कुठेही तडजोड नाही.

झारखंडमध्ये असलेलं बोकारो शहर हे स्टील प्लांटसाठी ओळखलं जातं. साधारण १९८० च्या काळात बहुसंख्यांक हिंदी आणि अल्पसंख्यांक पंजाबी भाषिक अशी तिथली लोकसंख्या होती. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यावर १९८४मध्ये शीखविरोधी दंगे उसळले त्यात या बोकारो स्टील सिटीलाही गिळले. शीखांच्या कतली, मारहाण, जाळपोळ झाली आणि अनेक कुटुंबांची कायमची वाताहात झाली. सत्ताधारी पक्षाच्या (अर्थात त्यावेळी काँग्रेस सत्तेत होती) स्थानिक नेत्यांची या दंगलींना कशी फूस होती आणि त्यातून कशाप्रकारचं राजकारण घडत गेलं अशी राजकीय आणि त्याचवेळी काही कुटुंबांची भावनिक गुंतागुंतीची कथा यामध्ये आहे. प्रत्यक्षातही काँग्रेसच्या नेत्यांवर शीख दंगली घडवल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. मात्र या दंगली काही एका दिवसांत, इंदिरा गांधींच्या हत्येने भावना तीव्र होऊन घडलेल्या नव्हत्या. काही वर्ष इथलं वातावरण शीख विरुद्ध हिंदी भाषिक असं बनवण्यात आलं होतं. आपापसातील छोटे-मोठे हेवेदावे, व्यवसायात एखाद्याला मिळालेलं यश याचा फायदा उचलत समाजात सातत्याने धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम काही स्थानिक नेते करत होते. द्वेषाची भावना भडकवत ठेवून पाहिजे तेव्हा तिचा वापर दंगलींमध्ये करून घेतला गेला.

मालिकेची कथा वर्तमान आणि भूतकाळ अशा दोन पातळ्यांवर चालते. रांची शहरामध्ये अमृता सिंग (झोया) ही प्रामाणिक आयपीएस ऑफिसर आणि वडील (पवन) राहत असतात. सत्ताधारी पक्षाचा मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेता यांच्यातील राजकीय वैमनस्यातून बोकारो स्टील सिटीमध्ये १९८४ ला झालेल्या शीख विरोधी दंगलींची पुन्हा एकदा चौकशी लागते. विरोधीपक्ष नेत्याचा त्या दंगलीमध्ये असलेला सहभाग हा सर्वांनाच माहित असतो. पण राजकीय कौशल्याच्या जोरावर तो त्यातून कायम सुटतो. त्या चौकशी समितीमध्ये अमृता सिंगला प्रमुख नेमलं जातं कारण ती शीख असते. या दंगलींशी संबंधित पुरावे पुढे येऊ लागतात तशी अमृता हादरून जाते कारण प्रमुख दंगल घडवणारा म्हणून तिच्या वडिलांचाच फोटो तिच्या समोर येतो. याबद्दल ती वडिलांना विचारून बघते, पण सत्य काही समोर येत नाही. त्यामुळे ती बोकारो मध्ये जाऊन चौकशी सुरू करते आणि तिच्या वडिलांच्या आणि पर्यायाने स्वतःच्या आयुष्याशी या दंगलींचा काहीतरी खोल संबंध आहे याची जाणीव तिला होते. दंगली अनुभवलेला प्रत्येक जण तिच्या बापाला दोषी ठरवत असतो आणि त्याचं नावही वेगळं सांगत असतो. तरीही ती आपल्या बापाला वाचवण्याचा प्रयत्न करते. मात्र सहकारी पोलीस अधिकाऱ्याच्या ते लक्षात येतं आणि तिला निलंबित केलं जातं.

दंगलींच्या आधी घडून गेलेली कथा एक शीख मुलगी आणि हिंदी भाषिक मुलगा यांच्यातल्या प्रेमचा आहे. मनूच्या (वामिका) घरी ऋषी (अंशुमन) हा पेइंग गेस्ट म्हणून राहतो. सततच्या सहवासाने त्यांच्यामध्ये आकर्षण निर्माण होतं. त्याचवेळी बरेचशी शीख कुटुंब ही व्यावसायिक असल्याने हिंदी भाषिकांना त्यांच्याबद्दल द्वेष असतो. हे परराज्यातून आलेले लोक आपल्या गावात काम-धंदा करून पैसे मिळवतात हे त्यांना सहन होत नाही. त्यामुळे आपापसात टोमणेबाजी, हेवेदावा होत राहतात. त्याचवेळी पंजाबला भिंद्रनवालेच्या हिंसाचाराने घेरलेलं असतं. रोजच्या हत्या, दंगे, हिंसा पंजाबला व्यापून टाकते. अशावेळी शीख कुटुंबियांना परत पंजाबमध्ये जाऊन स्थायिक होणंही धोक्याचं वाटत असतं. या राजकीय परिस्थितीचा फायदा उचलून स्टील प्लांटचा युनियन लीडर संजय सिंग हिंदी भाषिकांना भडकवण्याचं काम करतो. हाच पुढे जाऊन विरोधीपक्ष नेता बनतो. दंग्यांसाठी वातावरण निर्मिती करून शस्त्र, आग लावण्यासाठी पेट्रोल असं सगळं साहित्य तो जमवतो आणि स्वतः मात्र दंग्यांपासून लांब राहतो. त्यामध्ये नाईलाजाने ऋषीसारखा तरुण फसतो. या दंग्यांचं चित्रीकरण अंगावर काटा आणणारं आहे. बलात्कार, जाळपोळ, मुलांसमोर आई-वडिलांना जीवंत जाळणं असा हाहाःकार शहरामध्ये माजतो. माणसातली अमानुषता कोणत्या थराला जाऊ शकते याचं खूप बेचैन करणारं चित्रीकरण यामध्ये आहे. शीखांना निर्घृणपणे कापून काढणाऱ्या गुरू नावाच्या एका माणसाला ३० वर्षांनंतर पोलीस विचारतात की त्याने हे का केलं. त्याचं उत्तर खूप अस्वस्थ करणारं असतं. त्यात धार्मिक द्वेषापेक्षा त्याची गरिबी आणि त्यातून त्याला प्रत्येकाकडून मिळणारी तुच्छतेची वागणूक असते. तो सांगतो की, चार आण्याचा चहा पिणारा माणूसही मला शुल्लक समजून हाडतुड करायचा जणू काही आपलं अस्तित्वच नाही. जेव्हा दंगली उसळल्या तेव्हा माझ्या हातात पहिल्यांदा शस्त्र आलं आणि मला अचानक इतरांसारखेच आपण आहोत, कमी नाही याची जाणीव झाला. आपल्याला काहीतरी ताकद मिळाल्याच्या भावनेतून आपला साठलेला राग बाहेर पडला अशी तो कबुली देतो. पण त्या कृत्याचा पश्चाताप त्याचं आयुष्य जाळतो. मरेपर्यंत तो गुरुद्वारामध्ये लोकांची सेवा करत राहतो.

अर्थात वरून आलेल्या आदेशाचं पालन करत पोलीस दंगा करणाऱ्यांना थांबवण्याएेवजी दुर्लक्ष करतात. खरंतर प्रत्येक दंग्यामध्येच पोलिसांची संशयास्पद भूमिका ही दिसून येते. मनू आणि ऋषी या दंग्यांचे बळी ठरतात. पण मनूच्या कुटुंबाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ऋषी दंगा करणाऱ्यांना साथ देतो आणि संपूर्ण शहर त्यालाच दोषी ठरवतं. दंगलींच्या नंतरही उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या कहाण्या, कायमचे शरणार्थी कॅम्पमध्ये गेलेले लोक, विधवा स्त्रिया, एकल स्त्रिया यांच्याही समस्या, अनुभव, दंगलींनी कायम स्वरुपी संपवलेलं त्यांचं आयुष्य पुढे येतं. पुढे जाऊन विरोधी पक्षनेत्याला अटकही होते. पण तो जाताना एक सूचक विधान करून जातो की, एका शहरामध्ये दंगली घडवण्याएवढी साधनं साधा युनियन लीडर उभारू शकत नाही. त्याच्यापाठी मोठी शक्ती लागते. ही शक्ती अर्थातच सत्ताधारी पक्षाची असते हे मालिकेच्या शेवटी स्पष्ट होतं. राजकीय पक्षांनी आपली दंगलींमधली भूमिका कितीही नाकारली तरी भूतकाळ कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने समोर येतोच.

shruti.sg@gmail.com

 

Story img Loader