१४ सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये हिंदी भाषा दिन म्ह्णून साजरा करण्यात येतो. आज भारतात साधारण ४७ टक्क्यांहून अधिक लोक हिंदी भाषिक आहेत, तर ७७ टक्के लोक हिंदी बोलू शकतात. भारतामध्ये हिंदी ही कामकाजाची भाषा म्हणून वापरली जाते. विश्व हिंदी दिवस १० जानेवारी रोजी असतो. मग, भारतात १४ सप्टेंबर रोजी हिंदी भाषा दिन का साजरा करण्यात येतो ? या दिवसाचे इतिहासातील महत्त्व काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
भारत देशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. भाषिक आणि सांस्कृतिक संपन्नता या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये ४७ टक्क्यांहून अधिक लोकांची भाषा हिंदी आहे, तर ७७ टक्के लोक हिंदी भाषा बोलू आणि समजू शकतात. हिंदी ही जागतिक स्तरावरसुद्धा सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या १० दहा भाषांमध्ये येते.
हेही वाचा :‘द व्हॅक्सिन वॉर’मधील ‘तो’ श्लोक आणि सृष्टिनिर्मितीचे रहस्य…
हिंदी दिवस १४ सप्टेंबरलाच साजरा का करतात ?
देशात हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी १४ सप्टेंबर, १९४९ रोजी जेव्हा हिंदीला भारतातील व्यवहाराची भाषा म्हणून दर्जा देण्यात आला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या अध्येक्षतेखाली समिती नेमण्यात आली. भारतात विविध भाषा बोलल्या जातात. परंतु, सरकारी कामकाज, व्यवहार यांच्यासाठी एकच भाषा असणे आवश्यक होते. सरकारी कामकाजाची व्यवहार भाषा (राजभाषा) म्हणून हिंदीला मान देण्यात आला. तसेच इंग्रजी ही द्वितीय क्रमांकाची भाषा ठरली. त्यामुळे भारताची एक अशी राष्ट्रभाषा नाही. १४ सप्टेंबर रोजी हिंदीला व्यवहारभाषेचा मान देण्यात आल्यामुळे हा दिवस हिंदी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हिंदी भाषेच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणे, हिंदीला योग्य सन्मान प्राप्त करून देणे हे या दिवसाचे मुख्य प्रयोजन असते.
२००१ च्या अहवालानुसार, ४१.३ टक्के लोक हिंदी बोलायचे. २००१ ते २०११ मध्ये हिंदी बोलणाऱ्यांची संख्या १० कोटींनी वाढली. २०१७ मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये ‘अच्छा’, ‘बड़ा दिन’, ‘बच्चा’ और ‘सूर्य नमस्कार’ यांसारख्या हिंदी शब्दांचा समावेश करण्यात आला.गुगलच्या माहितीनुसार, विकिपीडियाचा इंग्रजीच्या तुलनेत हिंदीचा वापर करणारे लोक काही अंशी अधिक आहेत जगात पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, संयुक्त अरब अमीरात, अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी, न्यूझीलंड, युगांडा, गुयाना, सूरीनाम, त्रिनिदाद, मॉरिशस, साऊथ आफ्रिका समवेत अनेक देशांत हिंदी भाषिक आढळतात.