– लीना परांजपे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
व्यवसायाने इंटिरियर डिझायनर असलेल्या प्राजक्ताचं लग्न आयटी इंजिनिअर असलेल्या श्रीनिवाससोबत झालं. दोघंही कमावते. त्यांचं लग्न हे घरच्यांच्या पसंतीनुसार, म्हणजे अरेंज मॅरेज असलं तरी लग्नापूर्वीच्या गप्पांच्या एका भेटीतच ‘आपण एकमेकांचे चांगले जोडीदार बनू’ असं दोघांनाही वाटलं. लग्नानंतर दार्जिलिंगला १० दिवसांचं हनीमून करून ते परतले आणि घरच्यांना काही कळायच्या आतच सेपरेट झाले. हो, विभक्त! लग्नानंतर पंधराव्या दिवशी प्राजक्ता तिच्या आईकडे निघून गेली… कायमची!
पुढच्या दोन महिन्यांमध्ये ह्या तरूण जोडप्यात काहीही संवाद झाला नाही. नाही म्हणायला, श्रीनिवासने प्राजक्ताला दोन-चारदा फोन करायचा प्रयत्न केला, पण ती मोबाइलच स्वीच ऑफ करून बसली. दिवस जात होते. घरच्यांना काहीही कळत नव्हतं. हे दोघे एकत्र नांदत का नाहीयेत, हे समजायला त्यांना काहीच मार्ग नव्हता. समजणार तरी कसं? ह्या दोघांनी त्यांच्यात नेमकं काय झालं हेच कुणाला सांगितलं नव्हतं. तिसऱ्या महिन्यात मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब झालेला श्रीनिवास माझ्याकडे समुपदेशनासाठी आला. त्याच्याशी मोकळेपणाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. रिझर्व्हड, काहीसा अबोल स्वभावाचा श्रीनिवास घडाघडा बोलू लागला…
दार्जिलिंगला हनीमूनच्या दिवसांत श्रीनिवास आणि प्राजक्ता यांच्यात फिजिकल इंटिमसी शारीरिक जवळीक झाली खरी, पण त्यांच्या शरीरांच्या तारा काही जुळल्या नाहीत. प्राजक्ताला श्रीनिवासच्या लैंगिक वर्तनात धुसमुसळेपणा, आक्रमकपणा जाणवला. तो तिला इतका खटकला की श्रीनिवाससोबत राहायचं नाही, हा निर्णय तिने दार्जिलिंगहून निघतानाच मनात पक्का करून टाकला.
श्रीनिवास-प्राजक्ता हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अगदी खरंखुरं. तुमच्या माझ्यासारखं. त्यांच्यासारखी अनेक जोडपी लग्नानंतरच्या फक्त १५- २० दिवसांच्या संसारानंतर विभक्त होताहेत. नव्हे, लग्न – हनीमूननंतर एका महिन्याच्या आतच विभक्त होणा-या जोडप्यांची संख्या सतत वाढत आहे. आणि त्याचं सर्वात प्रमुख कारण आहे, जोडीदाराला ‘जज’ करण्यात, त्याच्याबद्दलचं मत बनविण्यात घाई करणं!
इंटरनेट, मोबाईलच्या आजच्या काळात रोमॅंटिक-सेन्शुअल-पॉर्न असा बहुविध कंटेंट सर्वांनाच उपलब्ध झाला आहे. त्यातून ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार, आवडी-निवडीनुसार प्रत्येकाच्या लैंगिक प्रेरणा, लैंगिक वर्तन प्रभावित होत आहे. लग्न-हनीमूनच्या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवायला मिळणा-या आनंदाच्या लाटांसोबत नातेसंबंधांची जी आव्हानं येतात, ती कशी हाताळायची हे माहित नसल्यामुळे नवी जोडपी गोंधळताहेत. मनमोकळ्या संवादाच्या अभावामुळे त्यांची मानसिक घालमेल होते आणि मग प्राजक्तासारखी नववधू नव-याला सोडून जाते!
लग्नानंतरच्या नात्यात नवरा-बायकोमधील शरीर संबंधांचं महत्व अनन्यसाधारण आहेच, ते नाकारून चालणार नाही. म्हणूनच तर पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मराठीजनांच्या विवाह पत्रिकेत ‘शरीरसंबंध करण्याचे योजिले’ असा स्पष्ट उल्लेख केला जायचा. पण दुसरीकडे, शरीरसंबंध किंवा लैंगिक वर्तन ही बाब फक्त काही मिनिटांची असते, हेसुद्धा विसरून चालणार नाही.
लैंगिक वर्तन ही एक अत्यंत खासगी, नाजूक, संवेदनशील बाब असली तरी तिच्या पलीकडेही भावभावनांचं- सुखदु:खाचं- कौटुंबिक नातेसंबंधांचं- जबाबदारीचं एक खूप मोठं जीवन आहेच. त्या जीवनाचं आव्हान एक जोडपं म्हणून एकत्रितपणे पेलायचं असेल तर नवरा-बायकोंमध्ये सर्वात आधी भावनिक जवळीक निर्माण व्हायला हवी. ही भावनिक जवळीक लग्नाच्या आधीही एकमेकांशी संवाद साधून निर्माण होऊ शकते. खरंतर, तशी भावनिक जवळीक – भावनिक मोकळेपणा निर्माण झाल्याशिवाय लग्न- हनीमून करणं हेच मुळी आजच्या ‘खुल्या समाजव्यवस्थे’त चुकीचं आहे.
नव्या पिढीत हे ज्यांना समजेल त्यांनाच “सुखी संसाराचं गुपीत” उलगडेल.
(लेखिका मॅरेज कोच आहेत)
contact@leenaparanjpe.com