Navratri 2024: नवरात्रौत्सवाची घटस्थापना झाली आणि नऊ दिवस शक्तीच्या विविध रूपांचा जागर केला जाणार आहे. या विश्वाची निर्मिती आदिशक्तीच्या गर्भातून झाली, याचमुळे गर्भधारणेची आणि जीवन सर्जनाची अपार क्षमता ध्यानी घेऊन वेदांनीही ‘उत्ताना मही पृथ्वी’ या शब्दात आदिशक्तीचा गौरव केलेला आहे. हीच आदिशक्ती अनेकविध रूपात पुजली जाते. याच आदिशक्तीचा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी लाभला होता. स्वराज्य स्थापनेसाठी महाराजांना दोन मातांचे आशीर्वाद लाभले. पहिली म्हणजे साक्षात जगदंबा तर दुसऱ्या म्हणेज त्यांच्या जन्मदात्या आईचा ‘जिजाऊंचा’.. विशेष म्हणजे जिजाऊंच्या जन्मकथेचा थेट संबंध हा जगदंबेशी जोडलेला आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर याविषयी ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात हे जाणून घेणे नक्कीच माहितीपूर्ण ठरावे!
जननी आणि जगज्जननी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात देवी भवानी आणि त्यांच्या आई जिजाऊ साहेबांचं खूप मोठं स्थान होतं. जननी आणि जगज्जननी या दोन्ही शक्तिरुपांना त्यांनी समरूप-एकरूप मानलं होत. रा.चिं. ढेरे यांनी वर्णन केल्याप्रमाणे, ‘जिजाऊंच्या संस्कारातूनच जगातील असाधारण पुरुषांत गणना व्हावी, असे महामानवत्त्व शिवरायांना प्राप्त झाले.’ जिजाऊंच्या गुणांचे कौतुक करावे तितके थोडेच त्या उत्तुंग ध्येयवादाने झपाटलेल्या होत्या; त्या चारित्र्यसंपन्न, विवेकी, दूरदर्शी, प्रवत्सल, कर्तृत्वशालिनी होत्या. लखुजी जाधवांची कन्या, मालोजी राजांची सून आणि चार पातशाह्या खेळणाऱ्या शहाजी राजांची पत्नी अशी अनेक बिरुद त्यांच्या मागे असली तरी त्यांना आयुष्यभर संकटाशीच सामना करावा लागला. महाराष्ट्राच्या इतिहासात जिजाबाईंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्या फक्त स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या, तर त्या रयतेला मातेसमान होत्या. त्यांचे मूळ घराणे सिंदखेडच्या जाधवराव देशमुखांचे, श्रीमंत आणि धाडसी जहागीरदारांचे होते. जिजाबाईंची जन्मतारीख आणि वर्षाविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र, काही इतिहासकारांच्या मते, परंपरेनुसार त्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी झाला असावा.’
अधिक वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj: सूरत लुटीचे ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?
मुलासाठी नवस करणाऱ्यांसाठी धडा
जिजाऊंचा जन्म ही काही साधी घटना नव्हती. जिजाऊ मातोश्रींच्या भोवती त्यांच्या जन्मापासूनच एक दैवी वलय होते. त्यांचा जन्म हा स्त्री शक्तीला बळकटी देणारा होता. या लेखाचा विषय जिजाऊ आणि जगदंबा यांच्यातील ऋणानुबंध सांगणारा असला तरी सामाजिक स्तरावर मध्ययुगीन महाराष्ट्रात आपल्या पोटी कन्यारत्न व्हावे असा ध्यास धरणाऱ्या मातेचाही आहे. आजही वंशाला दिवा हवा म्हणून मुलासाठी नवस करणाऱ्या प्रत्येकाने जिजाऊंच्या जन्मकथेतून धडा घेणे गरजेचं आहे.
कन्यारत्नासाठी माऊलीने केला नवस
जिजाबाईंचे वडील लखुजी जाधव हे निजामशाहीतील प्रभावशाली सरदार होते. लखुजी जाधवांना चार पुत्र होते, परंतु त्यांना कन्या प्राप्ती झालेली नव्हती. त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई (अथवा गिरिजाबाई) यांना त्याची खंत होती. आपल्याला मुलगी व्हावी या अनावर इच्छेने त्यांनी सिंदखेडमधील त्यांच्या कुलस्वामिनीला-रेणुकेला नवस केला. त्यानंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले ते म्हणजे जिजाऊ! पुत्रासाठी, वंशाला दिवा हवा म्हणून नवस करणारी माणसं समाजाच्या प्रत्येक वर्गात आणि प्रत्येक कालखंडात अस्तित्त्वात होती. परंतु म्हाळसाबाईंच्या कन्यारत्नाने मात्र संपूर्ण इतिहासालाच कलाटणी दिली.
शाकंभरी पौर्णिमेला जिजाऊ अवतरली
म्हाळसाबाईंच्या पोटी जन्म पावलेल्या या कन्येने पहिला सूर्यकिरण पाहिला, तो शालिवाहन शक १५१८ च्या पौष पौर्णिमेला; म्हणजे शाकंभरी पौर्णिमेला! हा योगायोग तत्कालीन संबंधितांच्या आणि प्रजाजनांच्या मनात वेगळा भक्तीभाव निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरला.
विजयराव देशमुख यांनी ‘महाराजांच्या मुलखात’ या पुस्तकात दिलेला जिजाऊंच्या जन्मकथेचा संदर्भ:
“….गिरजाबाईसाहेबांनी जगदंबेला नवस केला की, ‘ओटीत एखादी पोर दे.’ आणि केवढे आश्चर्य! १५९७ (इसवी) च्या पौषी पौर्णिमेस सूर्योदयासमयी लुकजींना कन्या रत्न प्राप्त झाले. पोर सुलक्षणी. मुखमंडळावर तेज असे की, जशी कडाडणारी वीजच! लुकजींचा आणि गिरजाऊंचा आनंद गगनात मावेना. लगबगीने गंगाधर शास्त्र्यांनी कुंडली मांडली. अवघेच हर्षभरित झाले. प्रत्यक्ष मतापूरची, तुळजापूरची जगदंबाच गिरजाऊचे पोटी आली होती ! अवघी कुळी पोरीने उद्धरली. लुकजींना धन्य धन्य वाटले. साखरपाने वाटीत लुकजींचा हत्ती चाळीस हजार वस्तीच्या सिंदखेडात झुलू लागला. वाड्यात ब्राह्मण अनुष्ठानी बसले. महाली मंत्रघोष सुरु झाले. भट-बंदी गर्जु लागले.
‘उदयोS स्तु आंबे !….’
अधिक वाचा: ३५७ वर्षे झाली, छत्रपती शिवरायांचा किल्ला मजबूत; पण पुतळा मात्र कोसळला…
यात तुळजापूरची जगदंबाच गिरजाऊचे पोटी आली असं वर्णन करण्यात आलेलं आहे. रा. चिं. ढेरे यांनी नमूद केल्याप्रमाणे, या कथनाच्या मागील मुख्य आशय म्हणजे जाधवरावांच्या आश्रयाला असलेल्या दोन भाटांचे कवन हे होय. रामसिंग आणि बजरंग या दोन भाटांनी जाधवरावांच्या घरातील महत्त्वाच्या नोंदींच्या आधारेच हे कवन रचले आहे. दुर्दैवाने हे कवन मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. ‘सिंदखेड राजाचा इतिहास’ (राजे जाधवरावांचे घराणे- आदरणीय जिजामातेचे माहेर) या पुस्तकात समग्र छापले आहे.
या संदर्भात रां. चिं. ढेरे यांनी विजयराव देशमुख यांच्याकडे पृच्छा केली असता त्यांनी सांगितले की, “जिजाऊंचा जन्म रेणुकेला /जगदंबेला केलेल्या नवसामुळे झाला, हे मी केलेलं विधान (‘महाराजांच्या मुलखात’, ‘सिंदखेड राजा’, ‘शककर्ते शिवराय, खंड १’)रामसिंग भाट व बजरंग भाट यांच्या एका पोवाड्यातील उल्लेखावरून केले आहे. रामकृष्ण खेकाळे यांनी हा पोवाडा प्रसिद्ध केला. मूळ हस्तलिखितही तेच सिंदखेडराजवरून घेऊन गेले.
उपरोक्त पोवाड्यातील संबंधित ओळी अशा….
लाखोजी रावांना मुलगी व्हावी म्हणोनि
म्हाळसाराणीने बहू केले नवस ।
जगदंबकृपेने झाली मुलगी म्हाळसाराणीला ।
तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वाला ।
फसली सन १००७ ला पौष पौर्णिमा सूर्योदयाला ।
राणी म्हाळसा महालाला चौकाने नैऋत्य कोनाला । …
शास्त्री गंगाधरने कुंडली केली, भविष्य सांगितले सर्वांला ।
राजे लाखोजी पोटी मातापूर तुळजापूर जगदंबा आली ।
(तपशीलासाठी ‘शककर्ते शिवराय, खंड १’ अवश्य पहावा.)
(पत्र, दि. २-१०-१९९१)
सिंदखेडची रेणुका
माहूरची रेणुका देवी जाधव घराण्याची कुलस्वामिनी होती, त्यामुळे सिंदखेड राजामध्ये तिचे लहानसे ठाणे असणे आणि त्या ठिकाणी जाधवरावांच्या कुटुंबाची विशेष श्रद्धा असणे स्वाभाविक होते. सिंदखेडमधील रामेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या उत्तराभिमुख छोट्या देवळीत रेणुकेचा तांदळा आहे. म्हाळसाबाईंनी कन्यारत्नाच्या प्राप्तीसाठी याच रेणुका देवीला नवस केला होता. सिंदखेड राजातील रेणुका मंदिरातील मूर्तीची स्थापना लखुजी जाधव यांनी केली होती, असे स्थानिक परंपरेनुसार मानले जाते. परंतु सिंदखेड राजा हे स्थान आधीपासूनच रेणुका देवीच्या पूजेचे केंद्र असावे असेही काही अभ्यासक मानतात. सिंदखेड राजा हे गावाचे नाव ‘राजे जाधवराव यांचे सिंदखेड’ या अर्थाने प्रसिद्ध झाले. जाधवराव घराण्याच्या बखरीत सिंदखेड हे नाव ‘सिदू गवळी’ नावाच्या शासकामुळे पडले असल्याचे म्हटले आहे. या स्थळाचे नाव सिद्धक्षेत्र असल्याचा उल्लेख काही ठिकाणी सापडतो. सिद्धक्षेत्राचेच पुढे सिंदखेड झाले असावे असा तर्क मांडला जातो.
या स्थळाची नोंद करताना काही बखरकारांनी ‘आलमपूर’ अशी केली होती. आलमपूर या नावाला स्वतःचे असे एक वलय आहे. सिंदखेडच्या पश्चिमेला भोकरदन आणि पूर्वेकडॆ आंध्रातील आलमपूर ही दोन स्थळं आहेत. ही दोन्ही स्थळं मातृदेवतेची म्हणजेच रेणुकेची असल्यामुळे आलापूर या नावाने प्रसिद्ध होती.
सर्जनाची देवी ‘शाकंभरी’
दक्षिण दिग्विजयाच्या काळात श्रीमल्लिकार्जुन दर्शनाला जाण्यापूर्वी शिवाजी महाराज आलमपूरच्या माळावर ससैन्य उतरले होते. भोकरधन (भोगवर्धन) हे मातृ उपासनेचे मोठे केंद्र होते. हे येथे उत्खननात मिळालेल्या सर्जनाच्या देवतेच्या अनेक मूर्तींवरून सिद्ध होते. भोकरधनचे प्राचीन नाव ‘आलापूर’ असे होते. ते याच देवतेच्या उपासना प्राधान्यामुळे. ही सर्जनाची-मातृत्त्वाची देवी ‘शाकंभरी’ या नावाने ओळखली जाते. शाकंभरीच्या उत्सवाचा मुख्य दिवस पौषी पौर्णिमा हा असतो. जिजाऊंचा जन्म हा पौषी पौर्णिमेच्या म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेच्या सूर्योदय समयी झाला.
संदर्भ:
देशमुख, विजयराव. महाराजांच्या मुलखात, नागपूर, १९७८.
देशपांडे, सु. र. मराठेशाहीतील मनस्विनी, पुणे, २००५.
ढेरे, रा. चिं. श्रीतुळजाभवानी, पुणे, २००७.