गणेश चतुर्थी २०२३ : गणेशोत्सव अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे. गणपतीची मूर्ती आणणे, पूजेची तयारी, सजावट, याची गडबड बहुतांश घरांमध्ये असेल. सध्या गणपतीच्या मूर्तीचं बुकिंग दोन-तीन महिने आधीच होते. आपल्याला हवी तशी गणेशमूर्ती आणण्याकडे लोकांचा ओढा असतो. गणेश मंडळांमध्ये तर गणपतीच्या मूर्तींवरून चढाओढ असते. घोड्यावर, माशावर, हंसावर बसलेली-उभी राहिलेली गणेशमूर्ती, टीव्हीवरील मालिकांचाही गणेशमूर्तींवर प्रभाव असतो. ‘जय मल्हार’मधील गणपती, कृष्णरूपातील गणपती, लोकमान्य टिळक यांच्या पोशाखातील गणपती, श्रीदत्तरूपातील गणपती अशा विविध मूर्तिस्वरूपात गणपती आपल्याला दिसतो. परंतु, यामध्ये गणपतीची खरी मूर्ती, किंवा शास्त्रीय मूर्ती कशी असावी, याचा विचार कमी होताना दिसतो. श्रीगणपतीअथर्वशीर्ष हे गाणपत्य सांप्रदायातील महत्त्वाचे वाङ्मय आहे. या अथर्वशीर्षामध्ये गणपतीची मूर्ती कशी असावी सांगितले आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : गणपतीचा जन्म कधी झाला ? जाणून घ्या गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमध्ये फरक….

अथर्वशीर्षानुसार गणेशमूर्ती…

सध्या अनेक लोकांना ‘ट्रेंडिंग’ गणेशमूर्तींचे आकर्षण वाटते. भव्यदिव्य गणपतीच्या मूर्ती, घोडा, शेषनाग, मासा, हंस अशा प्राण्यांवर विराजमान गणपती, हातात काहीतरी आयुध घेऊन धावत जाणारा गणपती, अवकाशात उड्या घेणारा गणपती, अगदी चांद्रयानासहचा गणपतीसुद्धा या वर्षी दिसून येत आहे. परंतु, गणपतीची मूर्ती कशी असावी, हे श्रीगणपतीअथर्वशीर्षात सांगितलेले आहे. गणपतीअथर्वशीर्षाच्या उत्तरार्धात ‘एकदन्त…योगिनां वर:’ पर्यंतच्या श्लोकांमध्ये गणेशमूर्तीचे वर्णन केलेले आहे. ही गणेशमूर्ती शास्त्रीय गणेशमूर्ती आहे.
एकदंत, चतुर्भुज, पाश व अंकुश धारणा करणारा, एका हाती (मोडलेला) दात धारणा करणारा व दुसऱ्या हाताची वरदमुद्रा असलेला, ज्याचा ध्वज मूषकचिन्हांकित आहे, असा रक्तवर्ण, लंबोदर, सुपासारखे कान असलेला, रक्तवस्त्र नेसलेला, अंगाला रक्तचंदनाचा अनुलेप लावलेला,रक्तपुष्पांनी पूजिलेला भक्तावर दया करणारा, जगताचे कारण अच्युतसृष्टीच्या प्रारंभी प्रकट झालेला,प्रकृती-पुरुषांच्या पलीकडे असणाऱ्या गणाधिशाचे ध्यान करावे.

हेही वाचा : गणपतीचे वाहन उंदीर का आहे? मोर हे गणेशाचे वाहन होते का ? जाणून घ्या कथा…

भारतीय विविध गणेशमूर्ती

भारतीय शिल्पकलेत, भारतीय चित्रकलेत विविध रूपांमध्ये श्रीगणेश दिसतात. द्विभुज, षडभुज, दशभुज, त्रिमुख, चतुर्मुख, हातात मोदक, लाडू, डाळिंब असेही दर्शवण्यात आलेले दिसते. प्रारंभी गणपतीला दोनच हात होते. पुढे उंदीर हे गणपतीचे वाहन, पण त्याची इतर वाहनंही आहेत. हेरंब गणपतीचे वाहन सिंह, तर मयूरेश्वराचे मोर आहे. गणपती कधी समभंग मुद्रेत, कधी पद्मासनास्थित, कधी नृत्यमुद्रेतही आढळतो.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How should a ganesha idol be what is the form of ganesha idol what atharvashirsha says vvk