सॅबी परेरा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महारानी या Sony-Liv वरील वेबसिरीजच्या पहिल्या सीजनला मिळालेल्या उत्तम प्रतिसादावरून या वेबसिरीजचा दुसरा सीजन येणे साहजिकच अपेक्षित होतं. पहिल्या सीजनमधे भीमा भारती हा राज्याचा मुख्यमंत्री असून त्याची पत्नी रानी भारती ही घरदार, संसार, मुलं यात गुंतलेली एक सामान्य गृहलक्ष्मी आहे. एक पत्नी आणि एक आई म्हणून आपली कर्तव्ये पूर्ण करणे हेच तिचं जग आहे. आपल्या नवऱ्याच्या राजकारणात तर तिला अजिबात रस नाहीये. राजकारणापायी आपला नवरा आपल्याला आणि आपल्या मुलांना पुरेसा वेळ देत नाही याव्यतिरिक्त तिची काही तक्रारही नाहीये.

परंतु अशी काही राजकीय परिस्थती निर्माण होते की रानी भारतीला मुख्यमंत्री बनावे लागते. राजकीय पेच निवळेपर्यंत रानी भारतीला नामधारी मुख्यमंत्रीपदी ठेवून राज्याचा संपूर्ण कंट्रोल आपल्या हाती ठेवायचा आणि योग्य वेळ येताच रानी भारतीला बाजूला सारून आपण पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या गादीवर बसायचे असा भीमा भारतीचा डाव आहे. बिहारचे जातीपातीचे रक्तरंजित राजकारण, चारा घोटाळ्याच्या जागी असलेला दाना घोटाळा, रानी भारतीला आणि भीमा भारतीला राजकारणातून आणि जीवनातून उठविण्यासाठी होणारी कटकारस्थाने या घटनांना बिहारचा संदर्भ असला आणि वरवर पाहता ही कथा लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्यावर आधारित असल्याचे वाटत असले तरी केवळ बिहारच्या राजकारणाची पार्श्वभूमी वापरून लेखक-दिग्दर्शकाने एकंदर भारतीय राजकारणावर भाष्य केलेले आहे.

रानी भारतीवर आपला पती आणि राज्याचा माजी मुख्यमंत्री भीमा भारतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. रानी आता मुख्यमंत्री नाहीये आणि तिची चौकशी सुरु आहे या प्रसंगापासून हा दुसरा सीजन सुरु होतो आणि चौकशीच्या ओघात एकेक प्रसंगाचा पट उलगडू लागतो.

केवळ रबर स्टॅम्प म्हणून गादीवर बसवलेली अशिक्षित रानी भारती लवकरच राजकारणाचे ताणेबाणे शिकते आणि बिहारच्या जनतेच्या भल्यासाठी आपल्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या नवऱ्याशीच पंगा घेते. शासन आणि प्रशासनात महिलांचा टक्का वाढला तर राजकारणाचा पोत सुधारेल आणि प्रत वाढेल हा समज किती भाबडा आहे हे आपण रोजच्या जगण्यात अनुभवत असलो तरी पडद्यावर का होईना खुद्द आपल्या पतीच्या विरोधात जाऊन भ्रष्टाचाराची साफसफाई करणारी रानी भारती प्रेक्षकांच्या मनात फील गुड ची भावना जागवते हे मान्य करावंच लागेल.

हुमा कुरेशीने रानी भारतीचा एक सामान्य गृहिणी, तीन मुलांची आई ते राज्याची खमकी मुख्यमंत्री हा प्रवास आपल्या अभिनयाने जिवंत करून पूर्ण सिरीज आपल्या खांद्यांवर पेलली आहे. आक्रस्ताळी बंडखोरी न करता, राजकारणातील पुरुषी वर्चस्ववादाला आव्हान देणाऱ्या, आणि राजकारणात बस्तान मांडल्यावरही आपली तत्व न सोडणाऱ्या, प्रवाहपतित न होणाऱ्या, गावंढळ स्त्रीच्या भूमिकेचा आलेख पटकथेत नेमका मांडला आहे आणि त्या भूमिकेला हुमा कुरेशीने पुरेपूर न्याय दिला आहे. भीमा भारतीच्या भूमिकेतील सोहम शाहचं काम देखील चांगलं असलं तरी त्या रोलमध्ये काहीसा एकसुरीपणा जाणवतो. विरोधी पक्षनेते असलेल्या नवीन कुमारच्या भूमिकेतील अमित सियालने आपल्या आजवरच्या लौकिकाला साजेसं असं दमदार काम केलेलं आहे. मल्याळी आयएएस ऑफ़िसर कावेरी च्या भूमिकेत कनी कुश्रुती आणि वित्त सचिव इनामुलहक़च्या भूमिकेतील परवेज़ आलमचा अभिनय वाखाणण्याजोगा झाला आहे.

दिग्दर्शन आणि अभिनया इतकेच या सिनेमाचे संवाद प्रभावी झाले आहेत. यातील पार्श्वसंगीत आणि गाण्यांतही एक खास बिहारी लज्जत आहे. बिहारी पार्श्वभूमीवरील राजकारण असूनही (इतर युपी बिहारवरील सिनेमांप्रमाणे) या सिरीजमध्ये शिव्यागाळी किंवा अश्लीलता नाही ही देखील एक जमेची बाब आहे.

पटकथेत काही छोट्यामोठ्या गफलती जाणवत असल्या तरी एकंदर सिरिजमधील वेगवान घटनांच्या ओघात त्या खटकत नाहीत किंवा सिरीजची रंगत कमी होऊ देत नाहीत. एखाद्या सीरिजच्या पहिल्या सीजनने निर्माण केलेल्या अपेक्षांना दुसऱ्या सीजनमधे पुरेपूर न्याय मिळालाय असं फार क्वचित होतं. महाराणीच्या दुसऱ्या सीजनला ते निव्वळ साधलं नाही तर या सीजनने पहिल्या सीजनपेक्षा वेगळी उंची गाठली आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huma qureshi sohum shah and amit sial maharani 2 review nrp