– आदित्य गुंड
सध्या आपल्यातील अनेकांना मोबाईलवर एक मेसेज येतोय. हा मेसेज एक जाहिरातच आहे पण याआधी कधीही असा मेसेज आला नव्हता. वेगवेगळ्या वृत्तपत्रसमूहांकडून आपल्या वाचकांना हा मेसेज पाठवला जातोय. आमचा ई पेपर तुम्ही ह्या लिंकवर जाऊन वाचू शकता अशा आशयाचा हा मेसेज आहे. गेल्या दहा वर्षात कधीही न आलेला हा मेसेज आज तरी लोकांना मोठा दिलासा देतोय. करोनामुळे अनेक वाचकांनी घरी पेपर घेणे बंद केले. काहीजणांनी तर चक्क घरी आलेला पेपर जाळून टाकला. परिस्तिथीचा अंदाज घेत अनेक वृत्तपत्रसमूहांनी आपल्या पेपरची छपाई बंद करण्याची घोषणा केली. असे असले तरी लोकांना बातम्या पुरवणे गरजेचे समजून ई पेपर मात्र प्रसिद्ध केले जात आहेत. त्यामुळे वाचकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ई- पेपरची सुरुवात –
ई पेपरची सुरुवात नक्की कधी झाली? याबद्दल विविध मतमतांतरे आहेत. सर्वाधिक लोकप्रिय मतानुसार पहिला डिजिटल पेपर १९७४ मध्ये अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयमध्ये सुरु झाला. ब्रूस पॅरेलो यांनी ‘प्लेटो न्यूज रिपोर्ट’ नावाने हा पेपर सुरु केला. मात्र आपल्या घरी येतो त्या पेपरमधील बातम्या जशाच्या तशा वाचण्याची संधी सर्वप्रथम कॉम्प्यूसर्व्ह इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस या अमेरिकेतील कंपनीने उपलब्ध करून दिली. ओहायो राज्यातील कोलंबस शहरातील ‘द कोलंबस डिस्पॅच’ हे दैनिक वृत्तपत्र जुलै १९८० मध्ये कॉम्प्यूसर्व्हने उपलब्ध करून दिले. त्यावेळी कॉम्प्यूसर्व्हचे ३६०० स्बस्क्रायबर्स होते. पुढील वर्षभरात द लॉस अँजेलिस टाइम्स, द मिनियापोलीस स्टार अँड ट्रिब्यून, द न्यूयॉर्क टाइम्स, द सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल, द वॉशिंग्टन पोस्ट यासारखे लोकप्रिय दैनिक पेपर कॉम्यूसर्व्हवर उपलब्ध झाले. या दरम्यान कॉम्प्यूसर्व्हच्या सबस्क्रायबर्सची संख्या दीड वर्षात १०,००० वर जाऊन पोहोचली, असे असले तरी हा पेपर वाचणे मोठे जिकिरीचे काम होते. बाहेर २० सेंटला मिळणारा छापील पेपर कॉम्प्यूसर्व्हवर पूर्ण डाऊनलोड करायला तब्बल ६ तास लागत. या वेगाने दर सेकंदाला साधारण ३० अक्षरे डाऊनलोड होत. भरीत भर म्हणून दर तासाला कॉम्प्यूसर्व्ह ५ डॉलरप्रमाणे किंमत वसूल करी. असे असूनही कॉम्प्यूसर्व्हच्या सबस्क्रायबर्सची संख्या १९८४ पर्यंत ६०,००० पर्यंत जाऊन पोहोचली.
भारतात ई- पेपरची सुरुवात –
भारतात ई पेपरची सुरुवात १९९६ मध्ये द हिंदू ने केली. पुढच्या दोन वर्षांत जवळपास ४८ वर्तमानपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध होऊ लागली. हाच आकडा २००६ पर्यंत ११६ वॉर जाऊन पोहोचला. मराठीमध्ये आघाडीचे सर्व वृत्तपत्रसमूह ई पेपर उपलब्ध करून देत आहेत. सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, प्रभात, पुढारी अशी अनेक दैनिके ई पेपरच्या माध्यमातून उपलब्ध आहेत.
ई- पेपर आणि वेबसाईटमधील फरक –
एखाद्या पेपरचीची वेबसाईट आणि ई पेपर सारखेच असते असे अनेकांना अगदी अलीकडेपर्यंत वाटे. प्रत्यक्षात तसे नसून ई पेपर हा आपल्या घरी येणाऱ्या पेपरची हुबेहूब प्रतिकृती असते. तर वेबसाईटवर विविध बातम्या लिहून त्या अपलोड केल्या जातात. ही एक न थांबणारी प्रक्रिया आहे. ई पेपर मात्र एकदा अपलोड केला की त्यात बदल करता येत नाहीत. आज ई पेपर अपलोड झाला की थेट दुसऱ्या दिवशीचा ई पेपर अपलोड होईपर्यंत तिथे काहीही बदल घडत नाहीत, असे असूनही ई पेपरला म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. याला कारण म्हणजे रोज सकाळी हातात पेपर घेऊन वाचण्याची सवय. पेपर वाचणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ८०% लोक आजही घरी आलेला पेपर वाचणे पसंत करतात.
ई- पेपर का?
ई पेपर वाचणे हा प्रकार शहरात आणि तेही तरुणाईत थोडाफार लोकप्रिय आहे असे म्हणू शकतो. ई पेपर आपल्या घरी येणाऱ्या पेपरप्रमाणे असल्याने खरोखर पेपर वाचतो आहोत असे वाटते. अनेक ई पेपर पान बदलल्याचा आभास निर्माण करून हे वाचन अधिकाधिक खरे कसे होईल याचा प्रयत्न करतात. परदेशात राहणारे अनेकजण ई पेपरच्या माध्यमातून देशातील घडामोडींचा आढावा घेतात. वेबसाइटवरून बातम्या मिळत असूनही ई पेपर वाचण्यातून आपण खरा पेपर वाचल्याचे आभासी का होईना पण समाधान मिळवतात. माझ्या अमेरिकेतील मित्रांपैकी अनेकजण रोज झोपायला जाण्याअगोदर भारतातील ई पेपर वाचतात.
अनेकजण स्वतःची काहीतरी बातमी छापून आली म्हणून ई पेपर घेतात किंवा त्यातील एखादी बातमी क्रॉप करून घेतात. काहीवेळेस ई पेपरला आलेली बातमी, लेख वेबसाईट उपलब्ध नसतो. अशा वेळी ही ई पेपरमधील क्रॉप केलेली ही बातमीच कामाला येते.
करोना आणि ई पेपर –
करोनामुळे लॉकडाऊन झाल्यापासून भीतीने लोकांनी छापील पेपरही घेणे बंद केले. अनेक मोठमोठ्या सोसायट्यांनी रोज पेपर टाकायला येणाऱ्या मुलांना प्रवेशबंदी केली. अखेरीस या वृत्तपत्रसमूहांनी छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला. देशातील सध्याची परिस्थिती पाहता पेपरची छपाई बंद करणे हा मोठा निर्णय होता. शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागात खात्रीलायक बातमीचा स्रोत म्हणून आजही पेपरकडेच बघितले जाते. असे असताना मग लोकांपर्यंत पोहचणार कसे? हा प्रश्न ईपेपरने सोडवला. आघाडीच्या वृत्तपत्रसमूहांनी अगोदरपासून उपलब्ध असलेल्या ई पेपरवर लक्ष केंद्रित केले. एरवी व्हाट्सअपवर बाकी फालतू मेसेज पाठवणारे लोक गेले २-३ दिवस ई पेपर पाठवू लागले आहेत. हा एका परीने चांगला बदल आहे. या निमित्ताने ई पेपर उपलब्ध असणाऱ्या वेबसाईटला भेट देणाऱ्या लोकांची संख्या वाढली. त्याची आकडेवारी खाली देतोय.
भारतातील आघाडीच्या ई- पेपरचे भारतातील अॅलेक्सा रँकिंग –
- हिंदू – १०६
- हिंदुस्थान टाइम्स – १०८
- टाइम्स ग्रुप – ६३०
- लोकसत्ता – ७५९
- सकाळ – १७७५
- लोकमत – २७३८
- सामना – १२८६२
- तरुण भारत – १५६१३
ई- पेपर भविष्य –
करोना लॉकडाऊनमुळे २४ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत वृत्तपत्रांची छपाई बंद झाली. यामुळे सध्या ई पेपरचा भाव वाढला असला तरी हे सध्यापुरते मर्यादीत नाही. भविष्यातही ह्याला भाव असणार आहे. लॉकडाऊन कालावधीत छपाईच न झाल्याने जगभरात हाहाकार माजवलेल्या या घटनेची सगळी माहिती ई पेपर स्वरूपात असणार आहे. भविष्यात कधी याबाबतची आकडेवारी, एखाद्या पेपरची बातमी, लेख, सरकारची भूमिका याबाबतचे संदर्भ हवे असल्यास ते या ई पेपर माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. यामुळे साहजिकच ह्या ई पेपरच्या अर्काइव्ह्ज म्हणजे संग्रहाला मोठे महत्व लाभणार आहे. अनेक वृत्तपत्रसमूह या अर्काइव्ह्जमधून लाखो रुपये कमावू शकतील.
जगभरातील मोठमोठी वृत्तपत्रे डिजीटल स्वरूपात उपलब्ध होत असताना भारतात मात्र आजही मोठ्या प्रमाणात छापील वृत्तपत्रे उपलब्ध आहेत. छपाईवर बंदी आल्याने वृत्तपत्र विक्रीतून मिळणारा मोठा महसूल बुडत असल्याने वृत्तपत्रसमूहांची कोंडी झाली. काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन १ एप्रिलपासून विक्री पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र या एक आठवड्याच्या लॉकडाऊनमुळे लोकांना ई पेपरचा पर्याय उपलब्ध असतो हे कळले. हा ई पेपर आपल्या घरी येणाऱ्या पेपरसारखाच आहे हे त्यानिमित्ताने समोर आले. त्यामुळे भविष्यात भारतात छापील वृत्तपत्रांचा खप कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ई पेपरला मिळत असलेला मोठा प्रतिसाद असाच राहिला तर सध्या विनामूल्य उपलब्ध असलेले हे ई पेपर वर्गणी घेऊ लागल्याचे पहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.