उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे भरपूर धमाल, मस्ती… तसंच उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे फिरणं, सहलींना जाणं, नवनवीन ठिकाणं पाहणं. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या, मावशीच्या गावाला जाणं व्हायचं. आता दरवेळेस मामाच्या गावालाच जाणं होतं असं नाही. पण तरीही उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी सहलींचे बेत आखले जातातच. एरवी शाळा, अभ्यासात गुंतलेल्या बच्चेकंपनीला आणि ऑफिस आणि घरकामात गुंतलेल्या त्यांच्या आईबाबांना वर्षातली ही मोठी सुट्टी एकत्र वेळ घालवण्यासाठी पर्वणी असते.

तुम्हीही उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबाबरोबर सहलीला जायचा प्लॅन करत असाल तर काही महत्त्वाच्या टीप्स लक्षात ठेवा. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीतली सहल त्रासदायक न ठरता आनंददायी होईल.

१. हवामानाची माहिती घ्या- तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात, त्या ठिकाणी कसं वातावरण असेल, याची पूर्ण माहिती घेऊनच प्लॅन करा. तुमच्या राहण्याच्या ठिकाणापेक्षा तिथे कडक उन्हाळा असतो का हे पूर्ण माहिती करून घ्या. म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या सहलीचं नियोजन करता येईल. त्यानुसार योग्य कपडे, आवश्यक वस्तू घेता येतील.
२. ट्रॅव्हल लाईट- उन्हाळ्यात फिरताना भरपूर घाम येतो. कधीकधी तर अगदी असह्य होतं. त्यासाठीच तुमच्याजवळ कमीत कमी सामान असणं आवश्यक आहे. शक्य तितकं कमी सामान जवळ ठेवा. उन्हाळ्यामुळे स्वेटर वगैरेंचे ओझे नसते. त्यामुळे आवश्यक तेवढेच कपडे जवळ ठेवा. त्याऐवजी टोप्या, रुमाल, गॉगल्स या गोष्टी नक्की घ्या. तसंच फिरत असतानाही हातात कमीत कमी सामान ठेवा. पर्समध्ये एखादी कापडी पिशवी नक्की ठेवा. भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात फिरताना उष्माघाताची शक्यता असते. नवनवीन जागांवर फिरताना आपल्याला जाणवत नाही, पण उन्हात फिरून शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे dehydration वाढू शकते. त्यासाठी सतत पाणी पित राहा. पाण्याने भरलेली बाटली तुमच्याजवळ सतत बाळगा. उन्हामुळे सतत थंड काहीतरी पित राहावे असं वाटतं. पण रस्त्यावरची सरबतं, कोल्डड्रिंक्स पिणे टाळा. शक्य असल्यास स्टीलची बाटली जवळ ठेवा. हॉटेलमध्ये पाणी पिताना शक्यतो बाटलीबंद पाणीच प्या. नारळाचं पाणी, नीरा, लिंबू, कोकम सरबत पित राहा. खूप जास्त चहा-कॉफी किंवा अल्कोहोल पिण्याचं टाळा. उन्हात पिरत असताना पाणी पिऊ नका. एका जागी थांबून, बसून मगच पाणी प्या.
३. खाण्याची काळजी घ्या- सहलीला गेल्यावर तिथले स्थानिक पदार्थ नक्की खाऊन बघा. पण अति तेलकट, अति तिखट, मसालेदार खाणं टाळा. फिरत असताना सोबत संत्री, मोसंबीसारखी फळं आवर्जून ठेवा. लहान मुलं असतील तर थोडासा खाऊ जवळ नेहमी ठेवाच. सतत वेफर्स, चिप्स, फरसाण यासारखे पदार्थ खाऊ नका.

४. त्वचेची काळजी घ्या- उन्हात फिरताना त्वचेवर परिणाम तर होतोच. तुमची त्वचा जर जास्त संवेदनशील असेल तर त्यानुसार जवळ सन स्क्रिन बाळगा. चांगल्या दर्जाचं सनस्क्रिन वापरा. पूर्ण डोके झाकले जाईल अशी टोपी घाला किंवा रुमाल बांधा. उन्हात फिरताना गॉगल लावा. उन्हापासून बचाव करण्यासाठी शक्यतो लांब बाहीचे कपडे घाला. म्हणजे सूर्यकिरणांचा त्वचेवर थेट परिणाम होणार नाही.
५. सुती कपडे घाला- उन्हात फिरताना शक्यतो हलक्या रंगाचे आणि सुती कपडे घाला. घाम शोषून घेणारे कपडे वापरल्यास उन्हाचा त्रास कमी होईल. काळे किंवा खूप गडद रंगाचे, घट्ट कपडे वापरणे टाळा. लहान मुलांनाही अगदी हलके कपडे घाला.
६. आवश्यक औषधे जवळ बाळगा- बाहेर फिरायला गेल्यावर दगदग होते, थकवा येतो. हवेतील बदलामुळे कदाचित आजारीही पडल्यासारखं वाटू लागतं. याचा विचार करून आवश्यक ती औषधे जवळ बाळगा. प्रथमोपचाराचे आवश्यक ते साहित्य असणे गरजेचे आहे. तुमच्याबरोबर जर रातील वृध्द व्यक्ती असतील तर त्यांची औषधे ठेवायला विसरू नका. त्याचबरोबर पोटदुखी, मळमळ,ताप, सर्दी-खोकला यासाठीची सर्वसाधारण औषधे ठेवा. त्याचबरोबर डासांसाठीचे स्प्रे किंवा क्रिम्स ठेवा.

७. पोहताना काळजी घ्या- तुम्ही जर समुद्रकिनारी जाणार असाल तर खूप ऊन असताना समुद्राच्या पाण्यात उतरू नका. शक्यतो पहाटे आणि संध्याकाळी समुद्राच्या पाण्याची मजा घ्या. समुद्राच्या पाण्यात पोहताना शक्यतो खूप खोल जाऊ नका. स्विमिंग पूलमध्ये उतरतानाही खूप काळजी घ्या. वॉटर स्पोर्ट्स करणार असाल तर त्यासाठीही शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळची वेळच निवडा.
८. ऑर्गनायझर ठेवा- तुमच्याजवळ सामानात एक ऑर्गनायझर अवश्य ठेवा. हल्ली अनेक आकाराचे आणि प्रकारांतले ऑर्गनायझर्स उपलब्ध आहेत. तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार त्यातले निवडा. टूथब्रश, पेस्ट, पेपर सोप, फेसवॉश, फेस क्रिम, टिश्यू पेपर अशा गोष्टी एकाच ठिकाणी ठेवा. तसंच आवश्यक औषधे, स्प्रे यासाठी एक ऑर्गनायझर ठेवा. हे ऑर्गनायझर असतील तर तुम्हाला एखादी छोटीशी गोष्ट काढायची असल्यास संपूर्ण बॅग शोधावी लागणार नाही.

या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचीही उन्हाळ्यातली सहल अगदी मस्त आणि अविस्मरणीय अशीच होईल.