रोज सकाळी दूधवाला येतो, पिशव्या ठेऊन जातो. पेपरवाला येतो पेपर टाकून जातो. आपण ह्यांना पाहिलेलं सुद्धा नसतं, फक्तं गृहित धरलेलं असतं. ते शांतपणे काम करत असतात, कर्मयोग्यासारखे. अचानक एक दिवस सकाळी दूधवाला येत नाही, दुधाच्या पिशव्या दिसत नाहीत आणि मग धावपळ सुरू होते. चहाशिवाय सकाळ हा विचार मनाला आणि जिभेला सहन होऊ शकत नाही. चेतेश्वर पुजारा हा अशा प्रकारच्या सर्व अत्यावश्यक, आणिबाणीच्या सेवा पुरवणारा आणि गृहित धरला गेलेला खेळाडू आहे. आपण मोजू शकणार नाही इतक्या वेळेला तो अत्यंत आणिबाणीच्या परिस्थितीत धावून आला आहे. कधी डॉक्टर सारखा कधी आगीच्या बंबासारखा कधी लष्करासारखा. त्या बदल्यात त्याला काय मिळाले? अतिसंथपणे खेळणारा, स्ट्राईक रेट कमी असणारा, कंटाळवाणा खेळाडू अशी अवहेलना!! इंग्लंडमध्ये तर त्याला पहिल्या कसोटीतून वगळण्या पर्यंत उद्दाम संघ व्यवस्थापनाची मजल गेली होती.
अॅडलेड कसोटीत पहिल्या डावात भारताचे पहिले सहा लाईटिंगचे गणपती नुसते फ्लॅश टाकून परत गेल्यावर पुन्हा एकदा धावून आला तो पुजारा नावाचा नवसाला पावणारा गणपती. त्याने भारताला नुसते २५० पर्यंत पोहचवले नाही तर सामनाच सेट करून दिला. दुसऱ्या डावात पुन्हा चिकाटीने सत्तर धावा केल्या. यानंतर त्याने पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत आमची फलंदाजी सुधारली पाहिजे असे सौम्यपणे पण खंबीरपणे सांगितले. सामना संपल्यावर मुलाखतीत त्याचा त्याने पुनरुच्चार केला, त्याने हे कधीतरी बोलून इतरांना आरसा दाखवणे अत्यंत आवश्यक होते.
पुजाराने दोन्ही डावात आणि इतर फलंदाजांनी दुसऱ्या डावात ज्या कौशल्याने नेथन लायनचा मुकाबला केला तो पहाता गेल्या पाच सहा वर्षात भारतीय फलंदाजांचा स्पिनर विरुद्ध संपत चाललेला दरारा पुन्हा स्थापन होईल असे वाटते. लायनने सहा विकेट्स काढल्या पण राहुल, पुजारा, कोहली, रहाणे, अश्विन, रोहित, पंत यांनी उत्तम फूटवर्क दाखवले. चेंडूपर्यंत पोहचून खेळायचे कसब आणि धैर्य भारतीय फलंदाज पूर्ण विसरल्यामुळे गेल्या काही वर्षांत कधी ग्रॅम स्वानने तर कधी मोईन अलीने तर कधी नेथन लायनने भारताला सातत्याने जेरीस आणले आहे. गावस्कर,विश्वनाथ,मोहिंदर, वेंगसरकर नंतर सचिन,द्रविड,लक्ष्मण, सेहवाग,गांगुली यांनी भारतीय फलंदाजीचा स्पिनर विरुद्ध लौकिक शाबूत ठेवला होता. आज जिंकलेल्या कसोटीत लायनविरुद्ध वेगळे यशस्वी धोरण आखल्याबद्दल बॅटिंग कोच संजय बांगरचे सुद्धा अभिनंदन केले पाहिजे.
दुसरी जमेची बाजू म्हणजे भारतीय गोलंदाजानी दाखवलेला संयम. टी-२० मुळे फलंदाज बचाव विसरतात तर गोलंदाज अति वैविध्याच्या आहारी जातात. टी-२० मध्ये यॉर्कर आणि स्लोवर वन वर हुकूमत मिळवून सुद्धा बुमराने या कसोटीत हे दोन्ही चेंडू अगदी क्वचित वापरले. फक्त लाईन आणि लेंथवर सातत्याने गोलंदाजी, १४० च्या आसपास वेग, अधूनमधून काहीना काहीतरी संधी देणाऱ्या खेळपट्टीवर विश्वास असे अतिशय परिणामकारक धोरण इशांत, बुमराह आणि शमीने वापरले, बाऊन्सरचा खुबीने मारा केला. एकंदरीत आपल्या गोलंदाजांचा मानसिक कणखरपणा फारच आवडला.
खेळपट्टीवर लायनला मिळालेला किकिंग बाऊन्स बघता अश्विन काय करतो या विषयी कुतूहल होते. पण लायन इतका स्पिन आणि बाऊन्स त्याला मिळाला नाही. चेंडू हातातून सोडण्याची पद्धत आणि कुकाबरा चेंडूची कमी सवय यामुळे अश्विन कमी परिणामकारक ठरला. कोहली आणि शास्त्री आज जाहीरपणे हे बोलले नसले तरी अश्विनने पाचव्या दिवशी मॅच बरीच आधी जिंकून द्यायला हवी होती हे त्यांना मनातून वाटल्याशिवाय रहाणार नाही. लायनच्या शैलीने ओव्हरस्पिन टाकणारा ऑफस्पिनर भारतात नाही असे नाही. पण प्रस्थापितांना धक्का कोण लावणार? असो…..
एका सांघिक संयमाने मिळवलेल्या विजयाबद्दल भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन. आज प्रत्येक भारतीय क्रिकेट फॅनने पुजाराचा फोटो आपल्या डि. पी.वर ठेवावा असे वाटते.