महिलांच्या कर्तृत्त्वाबद्दल, त्यांची समाजातील भूमिका इत्यादी गोष्टींबद्दल नेहमीच चर्चा केली जाते. भारतीय समाजातील महिलांना कुणी, कितीही बंधनात ठेवले तरी आपला देश संकटात असताना भारतीय महिला या नेहमीच कंबरेला पदर खोचून उभ्या ठाकल्याचे इतिहासाने पहिले आहे. आज इतिहासातील अनेक नामवंत पुरुष स्वातंत्र्यसैनिकांच्या नावांचा उल्लेख आवर्जून केला जातो. परंतु, ब्रिटीश राजवटीविरोधातील स्वातंत्र्याच्या लढ्यात, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिलेल्या असंख्य स्त्रियांची उदाहरणे आहेत. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण होवून आपला देश ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. त्याच निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य लढयातील काही कर्तृत्वान महिलांचा हा घेतलेला आढावा.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील ‘१८५७ चे स्वातंत्र्य युद्ध’ हा इंग्रजांच्या विरोधातील पहिला मोठा लढा म्हणून महत्त्वाचा ठरतो. परंतु इंग्रजांच्या विरोधातील या लढ्यापूर्वी भारताच्या अनेक रणरागिणी ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या अत्याचाराविरोधात उभ्या राहिल्या होत्या. यात प्रामुख्याने भीमाबाई होळकर, कित्तूरची राणी चेन्नम्मा आणि अवधची राणी बेगम हजरत महल यांचा समावेश होतो.
आणखी वाचा: स्वातंत्र्य दिन विशेष: भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील मणिपूरची ‘राणी गाइदिन्ल्यू’ !
विस्मरणात गेलेल्या भीमाबाई होळकर
भीमाबाई या इंदौरच्या यशवंतराव होळकर यांच्या कन्या होत. दुर्दैवाने कमी वयातच त्यांच्या नशिबी वैधव्य आले होते. म्हणूनच भीमाबाई या आपल्या पित्याच्या घरी येवून राहिल्या होत्या. बालवयापासूनच हुशार, पराक्रमी असलेल्या भीमाबाई माहेरी आल्यावर युद्धतंत्रात पारंगत झाल्या. वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या भावाच्या म्हणजेच मल्हाररावांच्या राजकीय सल्लागार म्हणून त्या भूमिका बजावत होत्या. त्या काळात इंग्रजांनी आपल्या कुटील राजकीय खेळींच्या माध्यमातून संस्थाने आपल्या ताब्यात घेण्याची हालचाल सुरु केली होती. म्हणूनच प्रत्येक संस्थानात आपला एक अधिकारी ते रुजू करत असत आणि तैनाती फौजा ठेवत, हे सर्व लॉर्ड वेलस्ली याच्या आदेशाने घडत होते. त्याप्रमाणे इंदौर येथे ही ब्रिटिश प्रतिनिधी रुजू करण्यात आला. या ब्रिटिश अधिकाऱ्याची इंदौरच्या राज्य कारभारातील वाढती लुडबुड पाहून भीमाबाईंच्या सल्ल्याने भावा-बहिणीने इंग्रजांविरोधात युद्ध करण्याची तयारी केली.
आणखी वाचा: भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी काश्मीरमध्ये नेमके काय घडत होते?
त्या युद्धात इंग्रजांच्या हंट आणि हिस्लॉप या अनुभवी सेनानीं सोबत होळकर बंधू-भगिनींचा सामना झाला. ब्रिटिश आधुनिक शस्त्रांनी सज्ज होते. परंतु रणांगणातल्या चण्डिकेसमोर काय त्यांची बिशाद?; भीमाबाई हंटरवर धावून गेल्या, एका बाईला हरवणं सोप म्हणून तोही सरसावला, हंटर युद्धात प्रवीण होता, परंतु साक्षात युद्धदेवतेला हरवणे त्याला शक्य झाले नाही, पहिल्याच तिच्या समशेरीच्या वाराने तो घायाळ झाला, त्याला मारणे सहज शक्य होते, परंतु त्यांनी जा, उपचार घेवून परत ये, असे फर्मान सोडले. ही घटना इंग्रज अधिकारी हंटर याच्यासाठी आश्चर्यचकित करणारी होती. दुसऱ्या दिवशीही युद्ध झाले, यावेळी मात्र हंटरच्या वाराने भीमाबाईंची तलवार त्यांच्या हातातून निसटली, परंतु काल भीमाबाईंनी दाखवलेल्या औदार्यामुळे हंटरने त्या नि:शस्त्र म्हणून त्यांच्यावर वार केला नाही. उलट तलवार उचलून देण्यासाठी तो सरसावला, परंतु भीमाबाईंनी ती तलवार घेण्यास नकार दिला, शत्रूने दिलेल्या तलवारीने लढणे मी माझा अपमान समजते असे त्या म्हणाल्या. या संपूर्ण प्रसंगाच हंटर भीमाबाईंच्या कर्तृत्त्वाने प्रभावित झाला होता, याच पार्श्वभूमीवर इंग्रजांची छावणी भीमाबाईंच्या इंदौरला पडणार नाही ही मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासनही त्याने दिले आणि ते पाळण्यासाठी प्रयत्नही केले. या युद्धांनंतर इंग्रजांनी आपली छावणी इंदौरऐवजी माहुल येथे हलवली, हे विशेष.
कित्तूरची राणी चेन्नम्मा
राणी चेन्नम्मा या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आघाडीवर असलेल्या महिलांपैकी आणखी एक महत्त्वाचे उदाहरण आहे. कित्तूरची राणी. तरुण मुलाच्या मृत्यूनंतर १८२४ मध्ये राज्यावर नियंत्रण ठेवण्याच्या इंग्रजांच्या प्रयत्नाविरुद्ध तिने लढा दिला. तिचे शौर्य एवढे होते की, तिने पहिल्या बंडात इंग्रजांविरुद्ध विजय मिळवला. परंतु, नंतर तिला ईस्ट इंडिया कंपनीने पकडले आणि तुरुंगात टाकले. राणी चेन्नमा यांचा जन्म कर्नाटकाच्या बेळगाव मधील काकटी या गावात झाला. बालपणापासूनच त्या कयप्पुअट्टपू या स्थानिक युध्द तंत्रात पारंगत होत्या. त्यांचा विवाह हा कित्तुरचे राजा मल्लासर्ज यांच्याशी झाला होता. कित्तूरचे साम्राज्य सधन होते. राजखजिन्यात दागदागिने, कोटींची संपत्ती होती. राजा मल्लासर्ज आणि त्यांच्या तरुण मुलाच्या मृत्यूनंतर हे राज्य इंग्रजांनी हस्तगत करण्याचा डाव आखला. परंतु ही इंग्रजांची मनीषा सत्यात उतरून द्यायची नाही असा ठाम निर्धार राणी चेन्नम्मा यांनी केला. राणी चेन्नम्मा आणि इंग्रज यांच्यात १८२४ साली पहिली चकमक झाली. युद्धाच्या सुरुवातीस युद्धराणी चेन्नम्मा याच जिंकत होत्या, परंतु इंग्रजांच्या कावेबाजपणामुळे त्या इंग्रजांच्या हाती सापडल्या. इंग्रजांनी येथेही फोडा आणि राज्य करा हे तंत्र अवलंबिले. चेन्नम्मा यांच्याच जवळच्या लोकांनी त्यांना फसवले. इंग्रजांनी त्यांना बौग्होंगल किल्ल्यात बंदीवासात ठेवण्यात ठेवले. अखेर २१ फेब्रुवारी १८२९ रोजी त्यांचा बंदिवासातच मृत्यू झाला.
अवधची राणी बेगम हजरत महल
अवधची राणी बेगम हजरत महल ही देखील आपल्या समर्थकांसह ब्रिटिशांशी लढली आणि अमर झाली. हजरत महल यांचा जन्म १९२० मध्ये फैजाबाद , अवध येथे झाला. वाजिद अलीशाह या अवधच्या शासकाची ती पहिली बे गम होती. बेगम हजरत महल या मूलतः नर्तकी होत्या. त्यांच्या रूपावर भाळून नवाब वाजिद अली शाह यांनी त्यांच्याशी निकाह केला. असे असले तरी विवाह झाल्यानंतर त्यांनी सैन्य आणि युध्दकौशल्य यांचे ज्ञान संपादन केले. १८५६ साली इंग्रजांनी नवाब वाजिद अली शाहच्या अवध राज्यावर कब्जा केला. त्यावेळी राणी बेगम हजरत महल यांनी आपला मुलगा बिरजीस कादर याला गादीवर बसवून राज्य आपल्या ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु इंग्रजांविरुद्धच्या लढाईत त्यांना पराजय पत्करून राज्य सोडून जावे लागले आणि त्यांनी नेपाळ येथे आश्रय घेतला.
अशा या तीन भारतीय वीरांगना, आपल्या स्वत्त्वाच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढत राहिल्या आणि इतिहासात अमर झाल्या.