– योगेश मेहेंदळे
ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानला लीलया हरवणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी दक्षिण आफ्रिका व अफगाणिस्तान या तुलनेनं कमकुवत संघांपुढे ढेपाळली. अफगाणिस्ताननं तर भारताच्या नाकात दम आणला आणि एका क्षणी तर वाटायला लागलं की भारत हरतो की काय? आफ्रिका व अफगाणिस्तान या दोन्ही सामन्यांमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे हार्दिक पांड्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. आफ्रिकेचं 227 धावांचं माफक आव्हान पार करायला भारताला 48वं षटक लागलं. चौथ्या क्रमांकावर आलेल्या के एल राहूलनं 42 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या, धोनीनं 46 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या व सरतेशेवटी आलेल्या पांड्यानं सात चेंडूंत 15 धावा केल्या. भारताची 48 षटकांमधली धावगती होती 4.8 तर राहूल व धोनी दोघांची मिळून 15 षटकांतली धावगती होती अवघी 4.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा डाव 224 धावांमध्ये गुंडाळला गेला. भारत हा सामना अफगाणिस्तानच्या दुबळ्या फलंदाजीमुळे जिंकला. पण भारताच्या धावा मुळात कमी झाल्या, त्याचं कारण पांड्याला खूप उशीरा खेळवलं गेलं. विराट कोहली वगळता एकाही फलंदाजानं चांगल्या धावगतीनं खेळ केला नाही. कोहलीनं 63 चेंडूंत 67 धावा केल्या. या आधी चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी केलेल्या पांड्याला चक्क सातव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. विजय शंकर चौथ्या क्रमांकावर आला. त्यानं 41 चेंडूंमध्ये 4.2 च्या धावगतीनं 29 धावा केल्या. तर पाचव्या क्रमांकावर आलेल्या धोनीनं 52 चेंडूंमध्ये 3.2 च्या धावगतीनं 28 धावा केल्या व केदार जाधवनं 68 चेंडूंमध्ये 4.6 च्या धावगतीनं 52 धावा केल्या. धोनी व जाधवनं धावांची गती अपेक्षेपेक्षा कमी राखल्याची टिका गावस्करांनीदेखील केली. पांड्याला फारसं खेळायलाच मिळालं नाही, षटकं संपायला आलेली असताना 9 चेडूंमध्ये त्यानं 7 धावा केल्या. फलंदाजांनी गमावलेला हा सामना अफगाणिस्तानच्या दुबळ्या फलंदाजीमुळे व बुमराह व शामीच्या चांगल्या गोलंदाजीमुळे भारताला जिंकता आला. फलंदाजांनी जर आपलं काम चोख केलं नाही तर गोलंदाजांवर कसं दडपण येतं याचं हा सामना म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आहे.
ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यांमध्ये हार्दिकला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात आलं. ऑस्ट्रेलियासमोर भारतानं 352 धावांचं आव्हान ठेवलं. धवनचं शानदार शतक नी कोहलीच्या 82 धावा महत्त्वाच्या ठरल्या. पण चौथ्या क्रमांकावर आलेल्या पांड्यानं 27 बॉलमध्ये 48 केल्या. नंतर आलेल्या धोनीनं 14 बॉलमध्ये 27 धावा केल्या ज्यामुळे खऱ्या अर्थी मोठ्या धावसंख्येचं लक्ष ठेवता आलं. तर, पाकिस्तानविरोधातला सामना मुख्यत: गाजवला रोहित शर्मानं. त्याच्या 140 धावा व कोहलीच्या 77 धावांमुळे भारतानं 336 धावांचा डोंगर उभा केला नी पाकिस्तान 212 धावांमध्ये लुढकलं. इथंही 39 व्या ओव्हरमध्ये चौथ्या क्रमांकावर आलेल्या पांड्यानं 19 बॉलमध्ये 26 धावांची त्यावेळेला साजेसी खेळी केली. नंतर आलेला धोनी 2 चेंडूत एक धाव करून बाद झाला. जाधवनं 8 चेंडूत 9 धावा केल्या. त्यामुळे या सामन्यातही पांड्याच्या जवळपास 9 धावगतीच्या 26 धावा मोलाच्या होत्या.
भारतानं उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवणं हा केवळ सोपस्कार राहिलेला आहे. परंतु उपांत्य फेरी व नंतर अंतिम फेरीत भारताला विजय मिळवायचा असेल तर मधल्या षटकांमधल्या खेळांमध्ये चांगली धावगती राखायला हवी व त्यासाठी हार्दिक पांड्याच्या फलंदाजीचा पुरेपूर वापर करून घ्यायला हवा. पहिल्या आठ दहा षटकांत दोन गडी बाद झाले तर खेळ सावरण्यासाठी धोनीला पाठवणं योग्य ठरू शकतं. परंतु 25 ते 35 षटकांच्या दरम्यान चौथ्या क्रमांकावरील फलंदाज मैदानावर उतरणार असेल तर त्यासाठी धोनी व जाधवच्या नंतर न आणता हार्दिकला चौथ्या क्रमांकावर खेळवायला हवं. आत्तापर्यंत 48 एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ 33 सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळालेल्या हार्दिकनं अजून एकही शतक झळकावलेलं नाही, मात्र चार अर्धशतकं झळकावली आहेत.
अत्यंत स्फोटक खेळी करण्याची क्षमता असलेल्या हार्दिकला मोठी खेळी खेळायची संधी मिळाली व त्याचं त्यानं सोनं करत शतक झळकावलं तर त्याच्यासाठीच नाही तर विश्वचषक जिंकण्याची आशा असलेल्या भारतासाठीही ही अत्यंत आनंदाची बाब असेल. कारण, हार्दिकचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा खूपच चांगला असलेला स्ट्राइक रेट. महेंद्र सिंह धोनी भारताच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे यात काही वाद नाही. अनेक सामने त्यानं भारताला जिंकून दिलेत यातही काही संशय नाही. त्याचं मैदानावर असणं हेच अनेकांना प्रेरणा देतं हे ही सत्यच. परंतु वय वाढतं तसं कामगिरीवर थोडाफार परिणाम होतोच. त्यातही विश्वचषकासारख्या चार वर्षांनी एकदा मिळणाऱ्या संधीचं सोनं करायचं असेल तर थोडं कठोर होत, धोनीला मागे ठेवावं लागेल. कारण, विराट कोहलीप्रमाणेच हार्दिककडेही कमी चेंडूंमध्ये जास्त धावा काढण्याची क्षमता आहे, तिचा चोख वापर व्हायला हवा!