आषाढी एकादशीची सांगता होवून चातुर्मासास आरंभ अलीकडेच झाला आहे. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या चार महिन्यांच्या काळास ‘चातुर्मास’ असे म्हणतात. कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायन सुरू होते. पौराणिक कथांनुसार दक्षिणायन ही देवांची रात्र, तर उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो. म्हणजेच देवांची रात्र कर्क संक्रांतीला आषाढ महिन्यात सुरू होते. आणि इथूनच चातुर्मासाची सुरूवात होते. या चातुर्मासाच्या कालावधीत आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या महिन्यांचा समावेश होतो.
मनुष्य हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच भारतीय परंपरेतील सण-उत्सव हे निसर्गपरिवर्तनाशी सांगड घालून साजरे करण्यात येतात.
हिंदू धर्मातील चातुर्मास
हिंदू धर्मातील परंपरेनुसार या चातुर्मासाच्या कालावधीत देव झोपी जातात, असे मानले जाते. म्हणजेच ते सृष्टीच्या कोणत्याही कार्यात हस्तक्षेप करत नाहीत. चातुर्मासाची खरी सुरुवात आषाढ शुद्ध एकादशी पासून होते. याच एकादशीला देवशयनी, विष्णुशयनी किंवा हरिशयनी एकादशी असेही म्हणतात. पौराणिक संदर्भानुसार या चार महिन्यांच्या कालखंडात श्रीविष्णू हे चिरनिद्रेत असल्याने ही एकादशी विष्णुशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या शिवाय इतर पौराणिक संदर्भानुसार हरी हा शब्द सूर्य, चंद्र, विष्णू या सर्वांसाठीच वापरला जातो म्हणून ही एकादशी हरिशयनी म्हणूनही ओळखली जाते.
आणखी वाचा: चातुर्मास: सूर्याच्या उपासनेचा भारतीय उपखंडातील इतिहास!
मुख्यतः चातुर्मासाचा कालावधी हा पावसाचा असतो. या महिन्यांमध्ये पर्जन्याची तीव्रता अधिक असते. ढगाळ वातावरणामुळे चन्द्र, सूर्य हे आकाशात दिसेनासे होतात. म्हणूनच देव झोपी जातात ही संकल्पना रूढ झाली असावी, असे अभ्यासक मानतात. सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव हा या कालखंडात सृष्टी निर्मितीच्या कार्यात व्यग्र असतो, अशी धारणा आहे. येथे प्रामुख्याने लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, हिंदू सण, उत्सव, व्रत-वैकल्य हे सृष्टीतील- वातावरणातील बदलांनुसार साजरे करण्यात येतात; त्यामुळेच अति पावसाच्या काळात शेतीची कुठली ही कामे होत नाहीत, आधीच झालेल्या पेरणीला पाऊस-पाणी मिळून शेतीतून जे नवीन उत्पन्न येईल याची वाट शेतकरी या कालखंडात पाहात असतो. हाच सृष्टी बदलाचा नियम आपल्या धार्मिक कथांमधूनही दिसतो. इतर देव झोपी गेले तरी या सृष्टीचा निर्माणकर्ता ब्रम्हदेव मात्र नवनिर्मिती करत असतो. अश्विन महिन्यात पिकांची कापणी होते, आणि कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानची म्हणजेच देवांच्या उठण्याची वेळ होते, अशी धारणा हिंदू परंपरेत आहे.
जैन धर्मातील चातुर्मास
जैन धर्मात चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. हिंदू धर्माप्रमाणे जैन धर्मातील चातुर्मासाचे संदर्भ वेगवेगळ्या जैन धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतात. ‘धर्मसिंधु’ हा याच परंपरेतील मुख्य जैन ग्रंथ आहे. या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे जैन धर्माचे २२ वे तीर्थंकर ‘नेमिनाथ’ हे श्रावण महिन्यात जन्माला आले होते, तसेच त्यांनी याच महिन्यात जैन धर्माची दीक्षा घेतली होती. आणि आषाढ महिन्यात त्यांचे निर्वाण झाले. नेमिनाथ व विठ्ठल यांचा जवळचा संबंध असल्याचे अभ्यासक मानतात. विठ्ठल व नेमिनाथ यांच्या रूप, गुण व चरित्रामध्ये काही प्रमाणात साम्य आहे. विठ्ठल हा श्रीकृष्णाचेच रूप असल्याची हिंदूंची श्रद्धा आहे. पौराणिक कथांनुसार श्रीकृष्ण व नेमिनाथ यांचे ऋणानुबंध जवळचे आहेत. जैन संदर्भ ग्रंथानुसार त्या दोघांचा जन्म यदुकुळात झाला होता. नेमिनाथ व कृष्ण हे दोघेही चुलत भाऊ होते. श्रीकृष्ण हा वसुदेवाचा पुत्र होता तर, नेमिनाथ वसुदेवाचा भाऊ समुद्रविजय याचा पुत्र होता. नेमिनाथांचे बालपण द्वारकेत गेले होते. भगवान श्रीकृष्ण हे ‘गोरक्षक’ होते तर नेमिनाथ ‘पशुरक्षक’ म्हणून प्रसिद्ध आहेत.
इतकेच नव्हे तर दोघांच्याही मूर्ती विज्ञानात बरेच साम्य असल्याचे आढळते. दोघांचाही वर्ण काळा-सावळा आहे. त्यामुळेच जैन धर्मात चातुर्मासाचे महत्त्व हिंदू धर्माप्रमाणे अनन्यसाधारण आहे. पंढरपूर वारीनंतर हिंदू धर्मात चातुर्मासास आरंभ होतो, त्याच प्रमाणे जैन धर्मातही आषाढ महिन्यातच चातुर्मासाची सुरूवात होते.
आणखी वाचा: सौंदर्याचा प्राचीन वारसा!
चातुर्मासाच्या कालावधीत जैन साधूंचा मुक्काम एका जागी असतो. पूर्वी जैन साधू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत प्रवास करत असत. चातुर्मासाचा काळ पावसाचा असल्याने या काळात त्यांना एका ठिकाणी वास्तव्याची मुभा होती. चातुर्मासात जैन यतीला वपन वर्ज्य सांगितलेले आहे. इतकेच नव्हे तर या कालखंडात गृहस्थाला आहारातील काही पथ्य पाणी सांभाळावी लागतात.
जैन धर्मात रूढी परंपरेनुसार विशिष्ट पर्व साजरे केले जाते. या पर्व काळात जैन साधू एकाच ठिकाणी राहून धर्माचरण आणि धर्मोपदेश करतात. चातुर्मासाच्या कालखंडातील अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा व अमावस्या हा पर्व काळ मानला जातो. याशिवाय याच काळातील पर्यूषण पर्व हे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. या पर्वाचा कालखंड हा जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर पंथाप्रमाणे वेगवेगळा असतो. श्वेतांबर पंथात ८ दिवस तर दिगंबर पंथात हा कालावधी १० दिवसांचा असतो. या कालखंडात जैन श्रावक आपल्या यती- मती प्रमाणे व्रत- उपवास करतात, तसेच तत्त्वार्थाधिगमसूत्रासारख्या ग्रंथांचे पठण करतात. पर्यूषण या शब्दाचा अर्थ मनातील विकारांचे शमन करणे असा होय. या पर्वाला दशलक्षण पर्व असेही म्हणतात. क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, आकिंचन्य आणि ब्रह्मचर्य या दशधर्मांचे काटेकोर पालन करणे हा या पर्वाचा मुख्य उद्देश आहे.
बौद्ध धर्मातील चातुर्मास
हिंदू व जैन धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातही चातुर्मासाचे पालन केले जाते. आषाढी पौर्णिमेला बौद्ध धर्मात विशेष महत्त्व आहे. बौद्ध धर्माच्या धारणेनुसार गौतम बुद्धांची आई मायादेवी हिला या दिवशी गर्भधारणा झाली. म्हणूनच चातुर्मासातील हा दिवस बौद्ध धर्मात महत्त्वाचा मानला जातो. प्रचलित कथेनुसार शुद्धोधन राजाला म्हणजेच गौतम बुद्धांच्या पित्याला दोन पत्नी होत्या. एक महामाया तर दुसरी प्रजापती गौतमी. परंतु एकिलाही पुत्रप्राप्ती न झाल्याने, राणी महामायेने अपत्यप्राप्तीसाठी चातुर्मासात व्रत केले होते. राणीने आषाढ पौर्णिमेच्या दिवशी राजवाडा स्वच्छ केला, घरात गोडाधोडाचा नैवेद्य केला. आणि पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. त्याचीच फलप्राप्ती म्हणून त्याच रात्री राणीला स्वप्नात दृष्टांत झाला. सुमेध नावाचा बोधिसत्त्व स्वप्नात हत्तीच्या रूपाने प्रकट झाला, त्याने आपल्या सोंडेने कमळाचे फूल मायादेवीला देवून ‘माते, मी माझा शेवटचा जन्म तुझ्या कुशीत घेणार आहे’असे सांगितले आणि त्यानंतर त्याने राणीच्या गर्भात प्रवेश केला. पुढे जावून राणीला गौतम नावाचा मुलगा झाला, आणि त्याने बुद्धपद प्राप्त केले म्हणूनच बौद्ध धर्मात हा कालखंड पवित्र मानला जातो.
एकूणच भारतीय संस्कृतीतील वेगवेगळ्या धर्म, संप्रदायामध्ये चातुर्मासाचे पालन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे लक्षात येते.