-केशव उपाध्ये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसा मी जीम वेडा. कामाच्या व्यापातून रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी मी जीम ला जाणे टाळत नाही. बाहेर मुसळधार पाऊस पडत असेल, किंवा थंडी असेल तर शाल आणखी घट्ट लपेटून झोपावं आणि जीम ला खुशाल दांडी मारावी असं एक मन मला जाण्यापासून परावृत्त करत असलं तरी मी त्याच काही एक चालू न देता निमूटपणे जातोच. पण एक गोष्ट मात्र माझ्या फिटनेस च्या आड येते ते म्हणजे डाएट. अनेक डाएट प्लॅन्स नी माझ्या समोर सपशेल शरणागती पत्करली आहे. fitness साठी व्यायामा सोबत योग्य आहार हवा तोही ठरलेल्या वेळेत. त्यात मी foodie. चांगलचुंगल शोधून खायला मला आवडते. ‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’ हे मी मानणारा. एखाद्या दौऱ्यावर गेल्यावर मिसळीवर मी आडवा हात मारतो किंवा चुलीवरची भाकरी हिरव्या मिरच्या भरलं वांग असलं की माझी रसना तृप्त च म्हणून समजा. कधी तरी श्रीखंड पुरी हाय हॅलो करून पोटात शिरते तर कधी कधी थाई करी आणि राईस सुध्दा दिमाखात माझ्या ताटातून पोटात जातात. याशिवाय माझे working प्रोफेशन. माझ्या कामाचे स्वरूप राजकीय, हे तर जेवणाच्या वेळापत्रकाला वाकुल्या दाखवणारे. दिवसभर बैठका, त्यात होणारा चहा व खाणे, शनिवार रविवार दौरे, त्यात होणारे ठिकठिकाणच आग्रहाचे खाणे, खाण्याच्या अनिश्चित वेळा यामुळे डाएटिंग चे तीन तेरा होणार हे नक्की. पण या सगळ्या अडचणी वर मात करत, चालणं आणि जिम यातून थोडीफार वजनासोबतची लढाई जिंकण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत आलो आहे.

काही महिन्यांपूर्वी मी जीम बदलली आणि तिथे माझी नवीन प्रकारांची भेट झाली. ते म्हणजे Pilates आणि योगा. मग तिथे योगासन सुरू केली. पण लक्षात आले शरीर जिम व अन्य कारणाने कमालीच stiff झाले आहे. सूर्यनमस्कारात इतर लोक सहजपणे पायाच्या अगंठ्याला हात लावतात मात्र आपले हात तर साधे गुढग्यापर्यंतही पोहचत नाहीत. हे पाहून फारच वैषम्य वाटायचे. तरी मी प्रयत्न सोडले नाहीत आणि एक दिवस मला जमेल या आशेने रोज योगासने करत राहिलो. एकही दिवस खंड न पडता हे सुरू होतं. मग अचानक सुरू झाला लाँकडाऊन. जीम बंद झाली, तिथली योगासने बंद झाली.

पहिले १-२ दिवस नुसते घरी बसून झाले. बैठका सुध्दा घरातून ऑनलाईन, चालणे बंद, व्यायाम बंद पण खाणे सुरू. हे असच सुरू राहिले तर पोटावर पृथ्वीचा गोल यायला वेळ लागणार नव्हता. मग मी घरी व्यायाम करायचा असे ठरवले. अर्थात दुसरा पर्याय पण नव्हता. मग रोज सूर्यनमस्कार करायला सुरू केले. आता रोजची सकाळ व्हायला लागली ती नियमित सूर्यनमस्काराने. सुरुवातीला प्रत्येक pose ला काही वेळ थांबायचो. ३-४ मिनिटानतंर अंगातून घामाच्या धारा वाहू लागायच्या. टीशर्ट ओलाचिंब होऊ लागला. श्रीखंड, मिसळी मुळे हळूच डोकावणारे फॅट्स नाईलाजाने सोडून जायला लागले. सकाळचा तास दीडतास कधी संपायचा कळायच नाही. आणि काही दिवसातच परिणाम पण दिसायला लागले. वजन उतरत्या मार्गावर लागले. या दरम्यान मी घरी असल्यामुळे डाएट वेळच्यावेळी follow करू शकलो. सकाळचा तास दीडतास कधी संपायचा कळायच नाही. आणि काही दिवसातच परिणाम पण दिसायला लागले. वजन उतरत्या मार्गावर लागले. लक्षात याव इतका लक्षणीय फरक दिसायला लागला.

त्यामुळे उत्साह अधिकच वाढला. दरम्यान थोडफार स्टीफनेसही कमी व्हायला लागला. लवचिकता वाढली. गुडद्यापर्यत न पोहचणारा हात आता पायाचा अंगठा सहज पकडू लागला. काही आसने जमू लागली. पद्मासनात तर बसता यायला लागलच पण शीर्षासन, बकासनासारखी अवघड आसने ही जमायला लागली.

अर्थात अजूनही मी योगाच्या पहिल्या टप्प्यावरही नाही याची जाणीव आहेच. कारण योग म्हणजे फक्त काही आसने अस मानणाऱ्यातला मी नाही. अजून बराच लांब पल्ला बाकी आहे व तो गाठणे महाकठीण. एकदा सगळे दैनंदिन कार्यक्रम सुरू झाल्यावर हा उत्साह टिकवणे आवश्यक आहे. योग 21 जून या एका दिवसापुरता मर्यादित नाही तर तो दिनक्रमाचा भाग बनावा हे ऐकायला छान वाटणारे आहे पण प्रत्यक्षात प्रचंड अवघड. हे निदान माझ्याबाबत तरी खर होते. लॉकडाउन मुळे हे कठीण काम आवडीचे बनले आहे. योग ही एक खडतर साधना आहे आणि ती साध्य करण्यासाठी आवडीने प्रयत्नात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. आवड तर निर्माण झाली आता सातत्य किती राहते हा एक भाग आहेच. पण एक गोष्ट नक्की यामुळे शारीरिक स्वास्थ्यासोबत मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास खूप मदत होते आहे. जीम बरोबरच आता योगाने माझ्या मनाचा ताबा घेतला असे म्हणायला काही हरकत नाही.

(लेखक सह मुख्यप्रवक्ता भाजपा महाराष्ट्र आहेत)