आयपीएलच्या आतापर्यंत झालेल्या १२ हंगामांचा इतिहास तपासला तर एक संघ नेहमी क्रिकेट प्रेमींमध्ये थट्टेचा विषय बनतो. हा थट्टेचा विषय त्यांच्या खराब खेळामुळे नाही तर चुकीचे निर्णय, मोक्याच्या क्षणी कच खाणं आणि हातात आलेली संधी गमावणं यामुळे होतो. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची यंदाच्या हंगामातली कहाणी अशीच काहीशी आहे. कधी नव्हे ते यंदा विराटच्या संघाने साखळी सामन्यांत आश्वासक कामगिरी करत पहिल्या चार संघांमध्ये आपलं स्थान राखलं. पण कामगिरीत सातत्य राखता येईल तर तो RCB चा संघ कसला….आयपीएलसारख्या स्पर्धेत नशीब पालटायला फार वेळ लागत नाही. सुरुवातीच्या टप्प्यांत धडाकेबाज कामगिरी करणारा RCB चा संघ अखेरच्या टप्प्यात सातत्याने पराभवाचा सामना करत राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैदराबादविरुद्ध सामन्यात करो या मरो च्या सामन्यात RCB ने चांगली लढत दिली. परंतू त्यांचे हे प्रयत्न सरतेशेवटी तोकडेच पडले. सलग पाच पराभवांसह विराट कोहलीच्या संघाचं यंदाच्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. पहिल्या विजेतेपदाचं स्वप्न घेऊन मैदानात उतरलेल्या RCB ला अजुन थोडी वाट पहावी लागणार आहे. परंतू गेल्या काही सामन्यांमधला संघाचा खेळ पाहता विराटला आणि RCB ला संघ नव्याने बांधण्याची वेळ आलेली आहे.

होय, हा संघ विराट आणि एबी डिव्हीलियर्सवरच अवलंबून –

स्पर्धेच्या सुरुवातीला RCB चा गोलंदाज उमेश यादवने प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आमचा संघ विराट आणि डिव्हीलियर्सवर अवलंबून नाही. संघात इतरही खेळाडू आहेत आणि ते ही चांगली कामगिरी करतात अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं. आता ही गोष्ट वेगळी आहे की हा आत्मविश्वास दाखवणारा उमेश नंतरच्या सामन्यात राखीव खेळाडूंच्या बाकावर होता. परंतू यंदाच्या हंगामातला RCB चा प्रवास पाहिला तर ज्या सामन्यांत विराट-एबीडी चमकले तिकडे RCB ने बाजी मारली…आणि ज्या सामन्यांपासून या खेळाडूंचा बॅडपॅच सुरु झाला तिकडे RCB ने सपशेल शरणागती पत्करायला सुरुवात केली.

देवदत पडीकलचा अपवाद वगळता RCB कडून एकाही फलंदाजाला आपली चमक दाखवतात आली नाही. पडीकलने यंदा आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं खरं…आपण आपली खेळी करताना त्याला दुसऱ्या बाजूने भक्कम साथ हवी असते. ही साथ ज्यावेळी त्याला मिळत नाही तिकडे तो लवकर बाद होतो. हैदराबादविरुद्धचा सामना याचं उत्तम उदाहरण आहे. पॉवरप्लेमध्ये धावा होत नसल्याचं पाहून फटकेबाजीचा प्रयत्न करायला गेलेल्या पडीकलने आपली विकेट गमावली. याचाच अर्थ पुढील हंगामाचा विचार करताना RCB ला पडीकलवर अधिक जबाबदारी टाकून त्याला तयार करावं लागणार आहे.

संघाची घडीच बसली नाही –

विराट आणि एबी डिव्हीलियर्सवर संघ अवलंबून असतो म्हणून टीम मॅनेजमेंटने यंदा फिंच आणि ख्रिस मॉरिस यांना संघात स्थान दिलं. फिंचकडून यंदा संघाला प्रचंड अपेक्षा होता…पण दुर्दैवाने त्याला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे ओपनिंग कॉम्बिनेशन बिघडवत RCB ने जोशुआ फिलीप तर हैदराबादविरुद्ध विराटला सलामीला संधी दिली. पण, RCB चे हे सर्व प्रयोग फसले, आणि याचाच फटका संघाला बसला.

जी गोष्ट फलंदाजीची तीच गोलंदाजांचीही…डेल स्टेन हा अनुभवी गोलंदाज आहे यात वाद नाही. पण त्याच्या गोलंदाजीत आता पूर्वीसारखी धार राहिलेली नाही हे RCB ला कळायला हवं होतं. अंतिम ११ जणांचा संघ निवडताना ५ गोलंदाज घेऊन खेळायचं की एका अष्टपैलूला संधी द्यायची हा घोळ अखेरच्या सामन्यापर्यंत कायम होता. दुर्दैवाने विराटला आणि RCB च्या टीम मॅनेजमेंटला यावर ठोस उत्तर शोधता आलेलं नाही.

प्रयोग करुन पहायला काय हरकत आहे??

आतापर्यंत पार पडलेल्या १२ हंगामांमध्ये २००९ आणि २०१६ चा अपवाद वगळला तर RCB चा संघ एकदाही अंतिम फेरीपर्यंत पोहचलेला नाही. विराट कोहली संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे, त्याच्यावर पूर्ण संघाची जबाबदारी आहे यात तिळमात्रही शंका नाही. पण तो तितकाच चांगला कर्णधार आहे का?? अशी शंका घेण्यासाठी पूर्णपणे वाव आहे. गोलंदाजीतले बदल, संघात खेळाडूंनी निवड, कठीण प्रसंगांत चेहऱ्यावर दिसणारा ताण या सर्व गोष्टी पाहिल्या की विराटला कर्णधारपदाचा भार झेपतोय का असं वाटायला लागतं. विराट आणि रोहित हे समवयस्क खेळाडू आहेत…पण रोहित ज्या शिताफीने संघावर आपली पकड बसवली आहे त्या शिताफीने विराटला RCB वर ती बसवता आलेली नाही.

कर्णधार हा संघाचा नायक असतो, मोक्याच्या क्षणी जर तो भडकला, चिडला, त्याला धीर खचला तर संघातील इतर खेळाडूंवर त्याचा काय परिणाम होणार आहे हे आपल्याला वेगळं काही सांगायला नको. यात विराटच्या आक्रमक स्वभावाला दोष देण्याचा हेतू नाही…पण संघाचं नेतृत्व करताना विनाकारण दाखवलेला आक्रमकपणा RCB ला ऐनवेळेला नडतो की काय असं वाटायला लागलं आहे. त्यामुळे पुढच्या हंगामांचा विचार करायचा असेल तर RCB ला आतापासून विराटचा उत्तराधिकारी शोधावा लागेल.

युवा गोलंदाजांची आश्वासक कामगिरी, पण…

मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर यासारख्या तरुण गोलंदाजांनी यंदा संघाकडून चांगली कामगिरी केली आहे. मोहम्मद सिराजला तर भारतीय कसोटी संघाचं तिकीटही मिळालं आहे. हे खेळाडू आश्वासक कामगिरी करत असले तरीही खडतर प्रसंगात ते लगेच दबावाखाली येतात. हैदराबादविरुद्ध सामन्यात बंगळुरुच्या गोलंदाजांनी चांगली लढत दिली, पण हैदराबादच्या होल्डर-विल्यमसन जोडीला माघारी धाडण्यात ते अपयशीच ठरले.

गेल्या काही हंगामांपासून गुणतालिकेत तळातल्या स्थानावर असलेल्या RCB च्या संघाने यंदा आपल्या चाहत्यांना विजेतेपदाची स्वप्न दाखवली होती. परंतू मोक्याच्या क्षणी कच खात लागोपाठ झालेले पराभव, दोन खेळाडूंवर संपूर्ण संघाचा डोलारा उभा करणं यासारख्या अनेक गोष्टी यंदाही RCB ला चांगल्या महागात पडल्या. यामधून सावरायचं असेल तर विराटला आणि पर्यायाने संघाला नव्या विचाराची गरज आहे.

  • आपल्या प्रतिक्रिया prathmesh.dixit@indianexpress.com वर पाठवू शकता.