विषय तसा जुनाच आहे…पण आयपीएलमध्ये आपला पहिला सामना खेळणाऱ्या संजू सॅमसनने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत पुन्हा एकदा तो विषय चर्चेला आणला आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेले काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. परंतू आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी भारतीय संघाने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. यावेळी टीम इंडियात यष्टीरक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवायची हा प्रश्न साहजिकच चर्चेला येईल. सुरुवातीला भारतीय संघ कसोटी मालिका खेळणार असल्यामुळे साहजिकच वृद्धीमान साहा आणि ऋषभ पंत यांची नाव पुढे येतील. परंतू आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धची खेळी पाहिल्यानंतर, बीसीसीआय संजू सॅमसनवर अन्याय करतय का?? असा प्रश्न मनात येतो.

३२ चेंडूत १ चौकार आणि ९ षटकारांची बरसात करत संजू सॅमसनने ७४ धावा केल्या. संजूची ही फटकेबाजी पाहण्यासारखी होती. योग्य टप्प्यावर चेंडू पडायची वाट पाहून सॅमसन बॉलला थेट मैदानाबाहेर पाठवत होता. कॉमेंट्रीच्या भाषेत सांगायचं झालं तर एकदम क्लिन हिटींग…हे झालं फलंदाजीचं. यष्टीरक्षणातही सॅमसनने आपली कामगिरी चोख बजावली. दोन स्टम्पिंग आणि केदार जाधवचा उडी मारुन घेतलेला सुरेख झेल यामुळे शारजाचं मैदान संजू सॅमसनने गाजवंल. इतका चांगला खेळ करुनही भारतीय संघाची दारं संजूसाठी नेहमी बंदच का असतात?? जरी संघात स्थान मिळालं तरी अंतिम ११ साठी संजू सॅमसनचा विचार केला जात नाही. धोनीच्या निवृत्तीनंतर त्याचा वारसदार म्हणून ऋषभ पंतकडे पाहिलं जातं. २०१९ विश्वचषकानंतर वर्षभराच्या कालावधीत पंतला सातत्याने संधी मिळत आलेली आहे. वन-डे, टी-२० आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारात पंतला संधी मिळत गेली. परंतू निराशेच्या व्यतिरीक्त भारतीय संघाच्या हाती काहीच लागलं नाही.

ढिसाळ क्षेत्ररक्षण…बेजबाबदार फटकेबाजी यामुळे प्रत्येकवेळी पंत टीकेचा धनी होत गेला. कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट गरजेची असते ती म्हणजे संधी. एका मालिकेत एखादा सामना देऊन त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणं हे योग्य ठरणार नाही. परंतू सातत्याने निराशा पदरी पडत असल्यामुळे भारतीय संघाने निर्णय घेत न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत लोकेश राहुलला यष्टीरक्षणाची संधी दिली. अशावेळी मनात प्रश्न येतो की असं काय करावं लागेल की ज्यामुळे संजू सॅमसनचा भारतीय संघासाठी विचार केला जाईल. २०१५ साली संजू सॅमसनला पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळायला मिळाला. यानंतर ५ वर्षांच्या कालावधीत संजूच्या वाटेला फक्त ४ टी-२० सामने मिळाले. सध्या संजूचं वय २५ आहे…उमेदीच्या काळात जर चांगली कामगिरी करुनही त्याला संधी मिळणार नसेल तर कुठेतरी काळंबेरं आहे असं म्हणायला नक्की वाव आहे.

संघनिवड ही प्रक्रिया फार मोठी जटील आहे. संघात आपलं स्थान कायम राखण्यासाठी चांगल्या कामगिरीसोबत…खेळाडूंना आपला PR स्ट्राँग ठेवणं गरजेचं असतं. संघात कर्णधार किंवा सिनीअर खेळाडूंच्या मर्जीत रहावं लागतं. ऋषभ पंत आणि विराट कोहली हे स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतात त्यामुळे आतापर्यंत ऋषभ पंतला मिळालेली संधी ही कोणाच्याही लक्षात येईल. मधल्या काळात संजूच्या हातूनही काही चुका झाल्या असतील. ज्या सामन्यांत संधी मिळाली तिकडे तो आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवू शकला नाही हे देखील खरं आहे. परंतू ४ सामन्यांत संधी देऊन संजूने काहीतरी चांगली कामगिरी करुन दाखवावी अशी अपेक्षा ठेवायची आणि दुसरीकडे वर्षभर संघात स्थान देऊन खराब कामगिरी करुनही पंतला धोनीचा वारसदार म्हणून प्रमोट करायचं हा दुर्दैवी प्रकार म्हणावा लागेल.

महेंद्रसिंह धोनीने एक काळ गाजवला. सर्वोत्तम कर्णधार, यष्टीरक्षक म्हणून त्याने भारतीय संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. परंतू योग्य वेळेत धोनीचा वारसदार शोधण्यास बीसीसीआय कमी पडलं आणि २०१९ विश्वचषकादरम्यान झालेलं महाभारत आपण सर्वांनी अनुभवलं आहे. धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर अजुनही भारतीय संघात यष्टीरक्षण कोण करणार याचं ठोस उत्तर निवड समिती आणि बीसीसीआयला मिळू शकलेलं नाही. पुन्हा एकदा सांगतो एका खेळीच्या जोरावर संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांची तुलना करणं योग्य नाही…परंतू चांगली कामगिरी करत असणाऱ्या खेळाडूला योग्य संधी देणंही तितकच गरजेचं आहे. असं होत नसेल तर मग शंकेला नक्कीच वाव आहे…की संजूवर आपण अन्याय तर करत नाही ना??

Story img Loader