लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीचं मत जर आपल्याला पटलं नाही तर ते सभ्य भाषेत खोडून काढून आपलं मत मांडण्याचा अधिकारीह आपल्याला लोकशाहीने दिला आहे. परंतू गेल्या काही वर्षांत भारतात सोशल मीडियाचं बदललेलं स्वरुप या सर्वाला छेद देणारं ठरतंय. विशेषकरुन आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपला आवडता संघ किंवा खेळाडूंविरोधात काही बोललं गेलं तर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करणारी एक नवीन पिढी तयार झाली आहे. आता वरकरणी बघायला गेलं तर ट्रोलिंग हे काही नवीन नाही. याआधीही हा प्रकार व्हायचा. परंतू गेल्या काही दिवसांत या ट्रोलिंगमागचा विखार वाढत चालला आहे, सध्याचं वातावरण पाहता भविष्यात हा चिंतेचा विषय ठरु शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यात विराट कोहलीच्या संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात कर्णधार आणि खेळाडू म्हणूनही विराटची कामगिरी खराब झाली. क्षेत्ररक्षणादरम्यान विराटने शतकवीर लोकेश राहुलने दोन सोपे कॅच सोडले…ज्याचा फायदा पंजाबला मिळाला. तर धावसंख्येचा पाठलाग करताना विराट एक धाव काढून माघारी परतला. यावेळी समालोचन करत असलेल्या सुनील गावसकर यांनी विराटच्या कामगिरीचं विश्लेषण करताना, “ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने”…अशी टीका केली. यावरुन सुनील गावसकर सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरले. महिलांविषयी असं वक्तव्य कसं करता?? अनुष्का आता गरदोर आहे…थोडा तरी विचार करा…अशा एक ना अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहायला मिळतायत.
या प्रकरणात सर्वात महत्वाची बाजू समजावून घ्यावी लागेल ती म्हणजे सोशल मीडियावर गावसकरांच्या विधानाचा पूर्णपणे चुकीचा अर्थ लावला गेला. लॉकडाउनमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या मुंबईतील घराच्या बाल्कनीत क्रिकेट खेळत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला होता. एरवी दिवसाचे २४ तासही कमी पडावेत एवढा वेळ सोशल मीडियावर पडीक असणाऱ्या या ट्रोलर्स गँगने त्यावेळी अनुष्का आणि विराटचं कौतुक केलं. पण गावसकरांवर टीका करताना सोशल मीडियावरचे ट्रोलभैरव, “इन्होंने लॉकडाउनमे तो बस अनुष्काकी गेंदों की प्रॅक्टिस की है” हे वाक्य गावसकरांच्या तोंडी घालत त्यांच्यावर वाट्टेल ती टीका करत सुटले. एक व्यक्ती म्हणून तुम्हाला गावसकरांनी विराटवर केलेली टीका न आवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण उगाच ट्रोल करण्यासाठी अर्थाचा अनर्थ करुन आपल्या मनाची वाक्य इतरांच्या तोंडी घालून टीका करण्यात कसला आलाय मोठेपणा?? गावसकरांवर टीका करणाऱ्या एकाही जणाला लॉकडाउनमध्ये विराट आणि अनुष्काने गॅलरीत खेळलेल्या क्रिकेटच्या व्हिडीओची आठवण झाली नाही का?? की सोशल मीडिया हातात आहे आणि व्यक्त व्हायचा अधिकार मिळालाय म्हणून काहीही बरळत सुटायचं??
गावसकर हे ट्रोलिंगला बळी पडणारे काही पहिले व्यक्ती नाहीत. संजय मांजरेकरांनाही या ट्रोलर्सचा चांगलाच फटका बसला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर कॉमेंट्री कडे वळलेले मांजरेकर हे नेहमी आपल्या परखड मतांसाठी ओळखले जातात. अनेकदा कॉमेंट्री दरम्यान त्यांनी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवरही टीका केली आहे. रविंद्र जाडेजावर केलेली टीका, कॉमेंट्री बॉक्समध्ये हर्षा भोगलेंसोबत रंगलेलं द्वंद्व अशा अनेक गोष्टींमुळे मांजरेकर वादात अडकले होते. साहजिकच त्यांची मतं न पटणाऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावर धारेवर धरलं. तुमचा अनुभव तरी काय?? ते पार तुम्ही खेळत असताना काय दिवे लावलेत हे आम्हाला माहिती आहे अशा शब्दांत मांजरेकरांचा उद्धार करुन झाला. शेवटी व्हायचं ते झालंच…सोशल मीडियावरचा दबाव आणि बीसीसीआयची नाराजी यामुळे मांजरेकरांना कॉमेंट्री पॅनलमधून हटवण्यात आलं.
बरं कॉमेंट्री पॅनलमधून हटवण्यात आल्यानंतर मांजरेकरांनी आपलं काम थांबलंय का?? तर नाही…ते डिजीटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, वृत्त वाहिन्यांमधून आपलं काम करतच आहेत. आपल्यावर होत असलेल्या टीकेला मांजरेकरांनी एका वाक्यात समर्पक उत्तर दिलं. “भारतात लोकांना स्पष्ट बोललेलं आवडत नाही, त्यामुळे त्यावर फार न बोललेलं बरं.” वरकरणी मांजरेकरांना सहज नजरअंदाज करता येईल. परंतू ज्यावेळी एखाद्या खेळाडूच्या कामगिरीचं समीक्षण करायचं असेल तर सगळचं कसं चांगलं आहे आणि तो खेळाडू किती भारी खेळतो असं बोलून कसं चालेल?? जर एखाद्या सामन्यात किंवा एखाद्या मालिकेत भारतीय संघ वाईट कामगिरी करत असेल किंवा एखादा खेळाडू खराब खेळला असेल तर त्यावर टीका व्हायलाच हवी. त्या टीकेचं उत्तर टीकेतून आलं तर कधीही स्वागतार्हचं असेल…पण केवळ आपल्या आवडत्या खेळाडूविरोधात बोललं म्हणून समोरच्याची माप काढायची हे योग्य नाही. तुमच्यासाठी गावसकर, मांजरेकर हे फार मोठे खेळाडू नसलतीलही कदाचीत…पण आपला जन्म व्हायच्या आधी हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व करुन मैदान गाजवून आले आहेत. त्यामुळे तुम्हाला आवडलं नाही तरी त्यांच्या मताला काहीच किंमत नाही असं होतं नाही.
समजा गावसकरांनी कॉमेंट्री करताना खरंच एखादा वेडावाकडा शब्द उच्चारला तर त्यावर जरुर टीका करावी. काही दिवसांपूर्वी कॉमेंट्री पॅनलमध्ये हर्षा भोगलेंना मांजरेकरांनी अशाच पद्धतीने क्रिकेट खेळण्याच्या अनुभवावरुन टोमणा मारला होता. ज्यावरुन मांजरेकरांवर टीका झाली आणि तो योग्यही होती. त्यावेळी कोणीही मांजरेकरांची बाजू घेतल्याचं मला आठवत नाही. जशी चांगली कामगिरी केल्यानंतर ज्येष्ठांकडून होणारं कौतुक ऐकायला आवडतं, तसंच माती खाल्ल्यानंतर त्यांचा ओरडा खाण्याची तयारीही ठेवायला हवी. अर्थाचा अनर्थ करुन समोरच्याला ट्रोल करायचं ठरवलं तर काहीही करता येईल…पण या प्रकारातून आपण विचार करण्याची आणि वेगळं मत मांडण्याची प्रक्रिया संपवतोय हे लक्षात घ्यायला हवं. काल मांजरेकर होते…आज गावसकर आहेत…उद्या आपल्यापैकी कोणीतरी एक असेल.