कलेला मरण नसतं म्हणतं हे अगदी खरंय. दीपावलीचा सणामुळे आता बाजारपेठांमध्ये रेलचेल सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वी करोनामुळे रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये पसरलेली भयाण शांतता आता दूरही होऊ लागली आहे. गणेशोत्सव, नवरात्र आणि आता येऊन ठेपलेला दिवाळी हा सण. सगळीकडचं वातावरण सकारात्मक करण्यास कारणीभूत ठरत आहे. अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली. दीपावली निमित्त बाजारपेठा सजल्या असून अनेक ठिकाणी लोकांकडून कंदील, शोभेच्या वस्तू घेण्यासही गर्दी होताना दिसत आहे. नुकताच बाजारात फिरत असताना माझी नजर रस्त्यावर असलेल्या एका छोट्या स्टॉलकडे गेली. पारंपारिक कंदिलांव्यतिरिक्त आपली क्रिएटिव्हीटी वापरून तयार केलेले कंदील शोभेच्या वस्तू त्या ठिकाणी दिसल्या. अक्षरश: मनमोहक अशा त्या वस्तू होत्या. आपण कदाचित विचारही करणार नाही अशा वस्तू एकत्र करून त्या शोभेच्या वस्तू तयार केल्या होत्या. सांगायचंच झालं तर दुधाच्या टाकाऊ बाटल्यांना लोकरीनं गुरफटून त्यावर केलेली सजावट असेल किंवा निरनिराळ्या आकाराचे कंदीलही असतील. अशा अनेक वस्तू त्या छोट्या स्टॉलवर अगदी व्यवस्थित मांडून ठेवल्या होत्या.
एक हसतमुख चेहरा त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाशी आदरानं बोलत होता. स्टॉलवर येणाऱ्याला काय हवं काय नको याची विचारपूसही सुरू होती. कोणी ऑर्डर दिली तर ती कशी हवी त्यात आपली क्रिएटिव्हीटी वापरून कसे बदल करता येतील या सर्व गोष्टी तो चेहरा हसतमुखपणे सांगत होता. मलाही कंदील घ्यायचाच होता. त्या निमित्तानं जवळ जाऊन त्याची कंदीलाबद्दल माहिती घेतली. बोलता बोलता ती व्यक्ती जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून पासआऊट झालं असल्याचं समजलं. जे.जे. चा विद्यार्थी म्हटल्यावर मला आणखी आकर्षण वाटलं आणि काही गोष्टी त्याच्याकडून जाणून घेण्याचाही प्रयत्न केला.
साहिल गीते असं या कलाकाराचं नाव. वडीलही कलाप्रेमी. त्यामुळं लहानपणापासून कलेबद्दल त्याला प्रेम निर्माण झालं ते त्याच्या वडिलांमुळेच. वडिलांचाच कलेचा वारसा पुढे सुरू ठेवायचा ही इच्छा मनात बाळगून त्यानं या दिशेनं आपला प्रवास सुरू केला. सुरवातीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साहिलनं जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये फाईन आर्ट्सचं शिक्षण घेतलं. जे.जे सारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. तसंच साहिलचंही ते होतं आणि जिद्दीच्या जोरावर त्यानं ते पूर्णही केलं. आपली कला इतरांपर्यंत पोहोचावी आणि कलेची इतरांच्या मनातही कलेची आवड निर्माण व्हावी अशी साहिलची इच्छा होती. त्यासाठी क्लासेस घेण्यास सुरूवात केली. परंतु शिकवायचं असेल तर पहिले आपल्यालाही शिक्षकी पेशाशी निगडीत शिक्षण घ्यायला हवं म्हणून त्यानं हृषिकेश कला विद्यालयातून याचं शिक्षणही घेतलं. त्यानंतर खऱ्या अर्थानं त्याचा प्रवास सुरू झाला. त्यानं आपल्या घरातच अगदी माफक दरात क्लासेस घेण्यास सुरूवात केली. हळूहळू आलेल्या अनुभावातून त्याला कला शिक्षक म्हणून नोकरीही मिळाली.
कुठेतरी आता चांगली सुरूवात होतच होती. पण… पण काही महिन्यांपूर्वी करोनाची महासाथ आली आणि सर्वकाही बदलून गेलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्वकाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. करोनामुळे शाळाही बंद करण्यात आल्या. क्लासेसनाही परवानगी नाकारण्यात आली आणि त्याच मोठा फटका साहिललाही बसला. शाळा क्लासेस सर्वकाही बंद असल्यामुळे पुढे काय हा प्रश्न त्याच्यासमोर होता. आता याला सात महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही शाळा, क्लासेस हे बंदच आहेत. पण किती संकटं आली तरी संकटातून चांगली संधी शोधता आली पाहिजे. कोणत्याही संकटासमोर हार न मानता त्याचा सामना केला पाहिजे असं साहिल आवर्जून सांगतो.
करोनामुळे सर्वजण घरातच असल्यानं सर्वांच्या वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय आपण घेतल्याचं साहिल म्हणाला. आई, वडील, बहिण आणि पत्नीच्या मदतीनं आपल्या कलेचा उपयोग करत त्यानं अनलॉकनंतर शोभेच्या वस्तू तयार करण्यास सुरूवात केली. जसजसं लोकांनाही कळू लागलं तशी त्याची मागणीही वाढू लागली आणि आर्थिक प्रश्नही थोड्या प्रमाणात कमी होऊ लागला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कंदील आणि शोभेच्या वस्तू तयार करून त्यांची विक्री करण्याचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा त्यानं निर्णय घेतलं. यासाठी त्यानं बाजारात एक छोटा स्टॉल सुरू करून लोकांच्या पसंतीनं किंवा आपल्या किएटिव्हीटीनुसार कंदील, शोभेच्या वस्तूंची विक्री करण्यास सुरूवात केली. कोणतीही जागा छोटी अथवा मोठी नाही. कायमच आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत आणि त्यातूनच आपल्याला मार्ग सापडत जातो असंही साहिलनं बोलताना सांगितलं.
सध्या साहिल कांदिवलीतील चारकोप परिसरात आपला व्यवसाय करत आहे. ग्राहकांनाही त्याची कला मनापासून आवडत आहे. त्यामुळे आता ग्राहकांचा ओघही मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. याव्यतिरिक्त साहिल हा उत्तम वॉल पेटिंग, विवाह सोहळे किंवा अन्य सोहळ्यांमध्ये नावं लिहून देणं तसंच गरजू विद्यार्थ्यांना मदत आणि अनेक पेटिंग्सही काढतो. साहिलनं आजही आपली कला जपली आहे आणि त्या कलेवर मनापासून प्रेम असल्यानं कलेनंही साहिलला जपलं आहे. साहिलचा पुढचा प्रवास असाच उत्तमोत्तम होत हिच आशा.