Vardhman Mahavir History इसवी सनपूर्व सहाव्या शतकात भारतीय इतिहासात अनेक आश्चर्यकारक घटना घडल्या. या घटनांनी भारतीय इतिहास व संस्कृती यांना कलाटणी देण्याचे काम केले. इसवी सनपूर्व सहावे शतक म्हणजे आजपासून २८०० वर्षांपूर्वी दोन महान तत्त्ववेत्त्यांनी या भूमीत जन्म घेतला. त्यांपैकी एक होते वर्धमान महावीर. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर आहेत. वर्धमान महावीर यांनी इसवी सनपूर्व सहाव्या शतकात जैन धर्माचे पुनरुत्थान केले. जैन धर्माच्या धार्मिक व आध्यात्मिक धारणेनुसार वर्धमान महावीर हे या कल्पातील (युगातील) शेवटचे तीर्थंकर होत. यापूर्वी म्हणजेच इसवी सनपूर्व सहाव्या शतकापूर्वी जैन परंपरेत २३ तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान महावीर यांचे वडील सिद्धार्थ हे क्षत्रिय कुलीन इक्ष्वाकू राजवंशातील होते तर त्यांची आई त्रिशला ही लिच्छवी गणराज्याची राजकन्या होती. हे दोघेही जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे भक्त असल्याचा संदर्भ जैन साहित्यात सापडतो. महत्त्वाचे म्हणजे महावीरांचा जन्म ज्या इक्ष्वाकू राजवंशात झाला तोच राजवंश प्रभूरामचंद्रांचादेखील आहे व याच वंशाची स्थापना पहिल्या जैन तीर्थंकरांनी केली अशी धारणा जैन धर्मात आहे.
महावीरांचा जन्म इसवी सनपूर्व ५९९ मध्ये चैत्र शुक्ल त्रयोदशीला झाला. या वर्षी ही तिथी ४ एप्रिल २०२३ रोजी म्हणजेच आज, मंगळवारी आहे. भारतीय संस्कृती व इतिहास यांमध्ये जैन धर्माचे मोठे योगदान आहे. केवळ इतिहासच नाही तर कला, स्थापत्य यांच्या माध्यमातून जैन धर्माने भारतीय संस्कृतीला मोठा अद्भुत वारसा प्रदान केला आहे. या दृश्य स्वरूपाच्या कला व स्थापत्याच्या माध्यमातून भारतीय समृद्ध सांस्कृतिक परंपरेविषयी जाणून घेण्यास मदत होते. याच समृद्ध परंपरेतील अनेक दुवे महाराष्ट्र राज्याने आपल्या भूमीत जोपासून ठेवले आहेत. महाराष्ट्र भूमीला जैन तत्त्वज्ञानाची आद्यपरंपरा आहे. याच परंपरेतील अनेक सांस्कृतिक दुवे आजही या भूमीत आपल्या अस्तित्वाने ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेची साक्ष देत आहेत.
आणखी वाचा: विश्लेषण : पुरातन वस्तू कायद्याचे महत्त्व काय?
जैन परंपरेतील कला व स्थापत्याच्या शृंखलेतील काही मोती हे दक्षिण कोकणात आजही आपण पाहू शकतो. जैन धर्माचा इतिहास हा भारतीय प्राचीन व्यापाराच्या बरोबरीने जाणारा आहे. कोकण किनारपट्टीचे संबंध प्राचीन काळापासून व्यापाराच्या निमित्ताने जगातील इतर देशांसोबत होते. ग्रीक, रोम, इजिप्त यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रदेशांसोबत इसवी सनपूर्व काळापासून कोकण किनारपट्टीचे व्यापारी संबंध होते हे सांगणारे पुरातत्त्वीय पुरावे आज उपलब्ध आहेत. म्हणूनच कोकणातील जैन परंपरेचा इतिहास हा कोकणाच्या इतिहासातील व्यापारी परंपरेशी सलंग्न आहे. दक्षिण कोकणात जैन पंथाचा इतिहास सांगणारी अनेक ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळे आहेत. विशेष म्हणजे ही सर्व स्थळे प्राचीन व्यापारी मार्गांवर व बंदरांच्या तसेच बाजारपेठांच्या जवळ आहेत. खारेपाटण, खवणे, पेंडूर यांसारख्या अनेक स्थळांचा या यादीत समावेश होतो.
दक्षिण कोकणात असणारे जैन परंपरेचे पुरावे मध्ययुगीन आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील खवणे या गावात खवणेश्वर मंदिरात जैन परंपरेचा कोकणातील इतिहास सांगणारी सहा शिल्पे आहेत. त्यातील मुख्य प्रतिमा ही भगवान महावीरांची आहे. या महावीरांच्या दोन्ही बाजूंस चवरीधारक स्त्री-प्रतिमा आहेत. महावीरांचे शिल्प हे ध्यानस्थ मुद्रेत असून त्यांच्या आसनाच्या पादपीठावर तीन सिंहप्रतिमा कोरलेल्या आहेत. तसेच व्याल व मकरांच्या प्रतिमांचाही आसनाच्या सुशोभीकरणासाठी वापर करण्यात आलेला आहे. महावीरांच्या मूर्तीशिवाय जैन परंपरेतील यक्षी अंबिका व यक्ष यांच्या प्रतिमादेखील येथे पाहू शकतो. स्थानिक ग्रामस्थ महावीरांची उपासना खवणेश्वर म्हणून करतात. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडजवळ असलेल्या कोंझर येथील एकपाषाणीय जैन मंदिर हे खवणोबा या नावानेच प्रसिद्ध आहे. दक्षिण कोकणातील जैन परंपरा सांगणारा अजून एक मुख्य दुवा सापडतो तो खारेपाटण या गावात. वाघोटन खाडी ओलांडल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यात जे प्रथम गाव लागते ते म्हणजे खारेपाटण. या ठिकाणी अठराव्या शतकात शुक नदीच्या पात्रात काळ्या पाषाणात कोरलेले पार्श्वनाथाचे शिल्प सापडले. त्यानंतर जैन धर्माशी संबंधित, दगड व धातूच्या अनेक प्रतिमा याच गावात उघडकीस आल्या. सध्या या सर्व प्रतिमा चंद्रप्रभा या जैन मंदिरात आहेत. खारेपाटण हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राचीन जैन वस्तीसाठी प्रसिद्ध आहे. केवळ इतकेच नव्हे तर या गावाला किमान २००० वर्षांचा इतिहास आहे. या गावाचे सर्वात प्राचीन संदर्भ इसवी सनाच्या पहिल्या शतकातील आहेत.
आणखी वाचा: विश्लेषण : ॲरिस्टॉटल ते २१ वे शतक : कांद्याचा रोचक प्रवास
प्राचीन काळापासून खारेपाटण हे बंदर प्रसिद्ध होते. खारेपाटण हे गाव विजयदुर्ग किल्ल्यापासून ४० किमी अंतरावर आहे. प्राचीन काळी खारेपाटण या गावापर्यंत मोकळ्या समुद्रातून विजयदुर्ग बंदरामार्गे मोठी मालवाहतूक करणारी जहाजे येत असत. या बंदरावर ही जहाजे मालउतार होत व पुढे हा व्यापारी माल बावडा-फोंडा घाटमार्गे देशावरील बाजारपेठांपर्यंत पोहचवला जात असे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’ या ग्रीक संदर्भग्रंथात खारेपाटणचा उल्लेख ‘पालाइपाटमइ’ असा केल्याचे अभ्यासक मानतात. टॉलेमी या ग्रीक भूगोल अभ्यासकाने खारेपाटणचा उल्लेख ‘बलीपटन’ असा केला आहे. तर शिलाहारकालीन पुराभिलेखांमध्ये खारेपाटणचा उल्लेख ‘वलीपट्टन’ असा सापडतो. शिलाहार राजा दामियार याने खारेपाटण हे दक्षिण शिलाहारांच्या राजधानीचे ठिकाण म्हणून निवडले होते. १५१४ मध्ये कोकणाला भेट देणाऱ्या बार्बोसाने खारेपाटणचा उल्लेख आरपटनी असा केला असून मलबारी जहाजे स्वस्त तांदूळ व भाजीपाला घेण्यासाठी येथे थांबत होती, असे तो नमूद करतो. सध्यादेखील खारेपाटणहून लाकूड, मंगलोरी कौले, मीठ यांची ने-आण केली जाते. खारेपाटण हे कोकण किनारपट्टीवरील मध्यवर्ती बंदर होते. त्यामुळे या बंदराच्या सभोवती विकसित झालेल्या शहराचा दर्जा हा व्यापारी शहर म्हणून होता. याच व्यापारी शहरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आद्य जैन वस्तीचे पुरावे आहेत. किंबहुना मध्ययुगीन जैन साहित्यात या गावाचा आवर्जून आलेला उल्लेख कोकणातील जैन पंथाचा समृद्ध इतिहास समजण्यास मदत करतो.