तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील एक लढाई १ जानेवारी, १८१८ रोजी कोरेगाव भीमा परिसरात झाली. लढाईच्या स्मरणार्थ इंग्रजांनी जयस्तंभ बांधला. लढाईत जखमी झालेले आपले शूर सैनिक जमादार खंडोजीबीन गजोजी माळवदकर यांना इंग्रजांनी सनद देऊन जयस्तंभाचे ‘इन -चार्ज’ नेमले. त्यांचे सातवे वंशज अ‍ॅडव्होकेट रोहन जमादार यांनी कष्टाने जमविलेल्या समकालीन संदर्भ पुराव्यांच्या आधारे ‘१ जानेवारी, १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ ही पुस्तिका लिहिली आहे. १८ जानेवारी रोजी नागपूरचे श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन पुण्यात झाले. पुस्तिकेतील माहितीनुसार संदर्भासह काही मुद्दे पुढील प्रमाणे –

कोरेगाव भीमाची लढाई कोणीही जिंकले नाही :

१ जानेवारी, १८१८ पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे जवळपास ७७५ इंग्रज सैन्य आणि पेशव्यांची २८००० फौज आमने सामने आले. पेशव्यांकडून लढणाऱ्या अरबी सैनिकांच्या तुकडीने इंग्रज सैन्यावर हल्ला केला. दिवस भर लढाई चालली आणि रात्री अनिर्णायक अवस्थेत थांबली. दरम्यान १ जानेवारीच्या रात्री इंग्रज अधिकारी कॅप्टन स्टॉंटन याने वरिष्ठाना पत्र धाडले ज्यात म्हटले “आम्हाला पेशव्यांच्या सैन्याने संपूर्ण घेरलेलं आहे आणि आम्ही रात्रीपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. आमचे बरेच सैनिक आणि अधिकारी मारले गेले आहेत. आम्हाला लवकर मदत पाठवा नाहीतर हे उद्यापर्यंत आम्हाला मारून टाकतील.”

Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

मात्र लढाई थांबली. मराठ्यांचे सैन्य सातारच्या दिशेने निघून गेले. राज्य सरकारने प्रकाशित केलेल्या ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्ज अँड स्पिचेस’, खंड १७ भाग ३ मधील वाक्य असे, “रात्री ९ वाजता, निर्णायक यश टप्प्यात असताना देखील पेशव्यांच्या सैन्याने हल्ला थांबवत कोरेगाव येथून माघार का घेतली हे सांगणे अवघड आहे.” तेंव्हा कोरेगाव भीमा लढाईत इंग्रजांकडील ५०० महार सैनिकांनी २८००० ब्राम्हण पेशवे सैनिकांना मारले हा प्रचार अनैतिहासिक आहे.

वीर शिदनाक महार कोरेगावच्या लढाईत नव्हते, ही जातीअंताची लढाई नव्हती :

महार सैनिक शूर होते व आहेत. आणि पेशेवे काळात जातीवाद होता हे ही खरे. परंतु या जातीवादाचा अंत करण्यासाठी शिदनाक महार यांच्या नेतृत्वात ५०० महार सैनिक इंग्रजांना सामील झाले आणि पेशव्यांच्या विरोधात लढले, हे चूक आहे. शिदनाक महार हे मराठ्यांकडील शूर योद्धा होते. ते कधीच इंग्रजांच्या बाजूने किंवा पेशव्यांविरुद्ध लढले असा पुरावा नाही. पेशव्यांच्या सैन्यात अरब तसेच मांग, रामोशी, भिल्ल समाजाचेही सैनिक होते. सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले दुसरे बाजीराव पेशवेंसह फौजेसोबत होते. इंग्रजांकडे महार तसेच खंडोजीबीन गजोजी यांसारखे मराठा व अन्य जाती धर्माचेही सैनिक होते. ब्राह्मण पेशवे जातीवादी आहेत म्हणून त्यांच्या विरोधात जातीअंताच्या लढाईसाठी महार सैनिक इंग्रजांना जाऊन मिळाले असा कोणताही समकालीन पुरावा नाही.

१ जानेवारी, १८१८ कोरेगाव भीमा लढाई म्हणजे १६८९ सालच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला – असा साफ खोटा प्रचार काही जण करतात. कोरेगाव भीमा लढाई आणि त्याच्या १२९ वर्षांपूर्वी जवळच्या वढू बुद्रुक गावात छत्रपती संभाजी महाराजांची हत्या या घटनांचा काही संबधं नाही.कोरेगाव भीमा लढाईत महार रेजिमेंट नव्हती. या लढाईत इंग्रजांकडून ‘सेकण्ड बटालियन फर्स्ट बॉम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री, “द पूना ऑक्झीलरी हॉर्स” व “मद्रास आर्टिलरी” या तीन युनिट्स लढल्या. महार रेजिमेंटची स्थापना १९४१ साली झाली.

इंग्रजांचा जातीवाद : कोरेगावच्या लढाईतील पूना ऑक्सिलरी हॉर्स पलटण बांधणीच्याच वेळी इंग्रजांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये “Men of low caste not to be admitted (खालच्या जातीचे सैनिकांना प्रवेश नाही)”, असे म्हटले होते. (संदर्भ ” पूना हॉर्सेस ” हे पुस्तक) तसेच जयस्तंभ इन -चार्ज नेमण्यासाठी परवारी (म्हणजेच महार) जातीचा प्रतिनिधी नको” असे इंग्रजांच्या समकालीन कागदपत्रात आहे. यावरून इंग्रजांचा जातीवाद दिसून येतो.

डॉ आंबेडकरांची जयस्तंभ भेट, इंग्रजांच्या जातीवादी धोरणाविरुद्ध आंदोलन :

१८१८च्या पूर्वी व नंतरही इंग्रजांच्या लष्करात अनेक महार सैनिक होते, व त्यांनी अनेक युद्धांमध्ये शौर्य गाजविले. तरीही जातीवादी धोरण अवलंबून इंग्रजांनी तत्कालीन अस्पृश्य महार बांधवाना लष्करात प्रवेश बंदी केली. इंग्रजांना विश्वासघाताची जाणीव व्हावी म्हणून कोरेगावच्या लढाईत इंग्रजांसाठीच लढलेल्या महार सैनिकांच्या शौर्याची आठवण करून देण्यासाठी डॉ आंबेडकरांनी जयस्तंभाची जागा निवडली होती. १ जानेवारी १९२७ रोजी जयस्तंभाला सभा घेऊन डॉ आंबेडकरांनी आपल्या भाषणात इंग्रजांनी केलेल्या विश्वासघाताचा तीव्र निषेध केला आणि त्याविरोधात बंड पुकारले.
जयस्तंभ येथील भाषणात डॉ आंबेडकर म्हणाले, “ब्रिटीशांच्या बाजूने महार सैनिकांनी लढावे ही काही विशेष अभिमानाची गोष्ट आहे असे नाही हे खरे; पण ते ब्रिटिशांच्या मदतीस गेले का? स्पृश्य हिंदू नेत्यांनी नीच मानून कुत्र्यामांजरापेक्षा वाईट वागविले म्हणून!पोट भरण्याचे काही साधन नसल्यामुळे नाइलाजाने ते ब्रिटिशांच्या फौजेत भरती झाले हे लक्षात ठेवले पाहिजे.” पुढे ३ महिन्यांनी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह ठिकाणी भाषण करताना डॉ आंबेडकर म्हणाले, “नेपोलियनने ज्या इंग्लंड देशाला ‘ दे माय धरणी ठाय ‘ असे केले, त्या देशाने मराठेशाहीचे उच्चाटन केले ह्याचे कारण मराठ्यांतील जातीभेदाची तेढ व आपसातील दुही हे नसून ब्रिटिशांनी एतद्देशीयांचे सैन्य उभारले हे होय. पण ते सैन्य असे अस्पृश्य जातीचे. अस्पृश्यांचे बळ जर इंग्रजांच्या पाठीशी नसते तर हा देश त्यांना केंव्हाच काबीज करता आला नसता.” (संदर्भ : धनंजय कीर लिखित डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र)

डॉ आंबेडकरांनी कधीही कोरेगाव भीमा लढाईला जातीअंताचा संघर्ष म्हटले नाही. तसेच ५०० महार सैनिकांनी २८००० ब्राह्मण पेशवे सैनिकांना मारले, अशा आशयाचे विधानही त्यांनी केले नाही. डॉ आंबेडकर १९२७ नंतर पुढे कधीही जयस्तंभाला गेल्याचे समकालीन पुरावे नाहीत. अस्पृश्यांच्या लष्कर भरतीसाठी जी ऐतिहासिक इंग्रज विरोधी चळवळ झाली त्यातील एक महत्वाची घटना म्हणून डॉ आंबेडकरांच्या जयस्तंभ भेटीचे स्मरण करणे उचित ठरेल.

हे व असे इतर मुद्दे पुस्तिकेत संदर्भासह मांडले आहेत. लेखकाने भाषेत नम्रपणा जपला आहे. आंबेडकरी चळवळीसह विविध विचारांच्या अभ्यासक, विचारवंतांनी ही पुस्तिका जरूर वाचावी. त्यातील संदर्भ तपासावेत. प्रसारमाध्यमे, इतिहास संशोधक, सामाजिक कार्यकर्त्यांनी १ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाई विषयी सर्वांगाने चर्चा घडवून आणावी. पुस्तिकेतील मुद्दे कोणाला आवडतील तर कोणाला पटणार नाहीत, पण त्याबद्दल स्नेहभावनेने, संविधानिक मार्गाने वाद प्रतिवाद करावा. कोणी पुराव्यांसह चूक दाखवून दिल्यास दुरुस्ती करण्याचे आश्वासन लेखकाने दिले आहे. पुस्तिका अमेझॉन, फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे

कोरेगाव भीमा लढाई विषयी अनेक समज गैरसमज आहेत. तसेच १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा परिसरात हिंसाचाराचे गंभीर पडसाद समाजात उमटले. म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलिसांनी ऍड रोहन जमादारांना १ जानेवारी २०२२ नंतर पुस्तक प्रकाशन करावे अशा नोटिसा बजावल्या. लेखकाने नोटीसचे पालन केले. मात्र पुस्तक न वाचताच अनेक जण लेखकाला फोन करून शिवीगाळ, दमदाटी करत आहेत. औरंगाबाद येथे एका तरुणाने पुस्तिकेसंबधी व्हाट्सअप स्टेट्स ठेवला तर त्यास पोलीस ठाण्यात माफी मागायला लावून तसा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. हे प्रकार थांबायला हवेत. त्यासाठी सर्वप्रथम पोलिसांनी ही पुस्तिका वाचावी. आणि जे कोणी कायद्याचा भंग करतील त्यांच्यावर कारवाई करावी. लेखकाला राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण झाले पाहिजे. सत्यमेव जयते !

Story img Loader