सॅबी परेरा
स्वार्थ ही माणसाची नैसर्गिक प्रेरणा आहे. एका ठराविक मर्यादेपर्यंत स्वार्थी असणे आपल्या वैयक्तिक विकासासाठी समर्थनीय मानले जात असले तरी ही ‘ठराविक मर्यादा’ ठरवायची कुणी हा कळीचा मुद्दा असल्याने, ज्याच्या स्वार्थाला उत्कर्षाची फळे येतात त्याचं कौतुक आणि ज्याचा स्वार्थ विनाशाकडे घेऊन जातो त्याची अवहेलना करणे हा दिगंत काळापासून जगाचा नियम आहे. सत्तेची किंवा अधिकारपदाची इच्छा किंवा हाव ही कुणा एका वर्गाची मक्तेदारी नसून कमीअधिक प्रमाणात ती प्रत्येकाच्या आत सुप्तावस्थेत असतेच. त्या सत्तेच्या किंवा अधिकारपदाच्या प्राप्तीसाठी कुणी कुठल्या थराला जायचं याचं उत्तर मात्र प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्न असतं. कौटुंबिक संस्कार, सामाजिक बंधनं, धर्माचा पगडा आणि कायद्याचा धाक बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना आपल्या स्वार्थावर काबू ठेवायला भाग पाडतो. पण आपल्या उत्कर्षाचा शॉर्टकट धुंडाळणाऱ्या काहीकांना कौटुंबिक संस्कार, सामाजिक बंधनं, धर्माचा पगडा किंवा कायद्याचा धाक यापैकी कुणीच रोखू शकत नाही. आपल्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी ते आपले कुटुंब, आपले नातेसंबंधही पणाला लावतात. आपल्या स्वार्थाच्या पूर्तीसाठी हिंसेचा अवलंब करायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत आणि परिणामी आपल्या सोबत आपल्या परिवारालाही एका अटळ शोकांतिकेकडे घेऊन जातात.

एकदा का माणसाच्या मेंदूचा ताबा त्याच्या स्वार्थाने घेतला आणि पर्यायाने त्याच्या आत दडलेल्या हिंसक भावनेचा उद्रेक झाला की तो कुठल्या थराला जाऊ शकतो यावर शेक्सपिअरचं मॅकबेथ हे क्लासिक नाटक बेतलेलं आहे. बदलत्या काळानुसार माणसाची जगायची पद्धती, रीतीरिवाज बदलले, तरीही विकृत मानसिकता बदलली नाही. त्यामुळे आजवर जगभरातील विविध भाषांत ‘मॅकबेथ’वर आधारित डझनावारी नाटकं, सिनेमे झाले आहेत. पाच-सहाशे वर्षांपूर्वी शेक्सपिअरने लिहिलेल्या या कलाकृतीला सद्य काळाचे मापदंड लावून आधुनिक मानवाची मानसिकता, त्याचे विचार-विकार-विकृती यावर भाष्य करण्याचं काम करण्याचे प्रयोग झालेले आहेत, होत आहेत आणि पुढेही होत राहतील. त्यापैकीच एक प्रयोग म्हणजे अ‍ॅमेझॉन प्राईम वरील दिलीश पोथान दिग्दर्शित “जोजी” हा मल्याळम सिनेमा.

स्वतंत्रपणे पाहू गेल्यास “जोजी” एक चांगला सिनेमा आहे. पितृसत्ताक पध्दतीत चालणारं ग्रामीण केरळ मधील एक संपन्न घर. कुटुंबप्रमुख असलेल्या कुट्टपनची तीन प्रौढ मुलं.. टीनएजर मुलाचा बाप असलेला थोरला घटस्फोटित आहे, दुसरा विवाहित असून आपल्या बायकोसमवेत त्या घरात राहतोय आणि धाकटा अविवाहित आहे. घरात कुट्टपनबद्दल आदरयुक्त दरारा आहे. आपल्या मुलांच्या स्वार्थी वृत्तीची कल्पना असल्याने असेल कदाचित, कुट्टपन आपल्या मुलांना धाकात ठेवून आहे. घरातील थोरले दोघे अंगापिंडाने वडिलांसारखे धिप्पाड असले तरी बापासमोर बोलण्याची कुणाची टाप नाही. धाकटा तर अगदीच किरकोळ, निस्तेज, आत्मविश्वासाचा पूर्ण अभाव असलेला, बोलतानाही घाबरणारा, चाचरत बोलणारा, एकाकी रहाणारा, इंजिनिअर होऊन सुद्धा घरात बेकार बसून असलेला, आपल्याला मनासारखं करिअर करता येत नाही म्हणून मनातल्या मनात कुढणारा आणि सगळ्यांकडून हिडीसफिडीस केला जाणारा; जोजी.

धडधाकट कुट्टपनला एके दिवशी अचानक अर्धांगवायूचा झटका येतो. त्याला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं जाते. या आजारातून कुट्टपन वाचणारच नाही असा सगळ्यांचा समज होतो. आणि या गोष्टीचं वाईट वाटण्याऐवजी ते संपूर्ण कुटुंबच सुटकेचा सुस्कारा टाकतं. कुट्टपनच्या अनुपस्थितीत मिळालेल्या स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतं. पण अनपेक्षितपणे हॉस्पिटलमधून घरी आलेल्या कुट्टपनला पाहून, आपल्याला काही दिवस मिळालेलं स्वातंत्र्य पुन्हा हिरावलं जाणार याची जाणीव होऊन घरातले सगळे नाराज होतात. जोजी केवळ नाराज होत नाही तर बिथरतो. त्याचं हे बिथरणं किती टोकाला जातं आणि त्यामुळे त्या कुटुंबाचा कसा सर्वनाश होतो हे जोजी हा सिनेमा दाखवतो.
जोजीची हाताळणी संथ असली तरी त्यातील लय टिकवून ठेवण्याचं काम जस्टीन वर्गीसच्या पार्श्वसंगीताने चोख केलं आहे. सुंदर कॅमेरा-वर्क हे हल्लीच्या सगळ्या मल्याळी सिनेमाचं वैशिष्ट्यच झालं आहे. जोजी साकारणाऱ्या फहाद फासिलच्या अभिनय क्षमतेविषयी वाद नसला तरी इथे तो नको इतका सहज वावरलाय असे वाटते. रासवट कुट्टपनच्या भूमिकेत व्ही.पी. सनी उत्तम जमलाय आणि घरस्वामींनी असूनही आपल्याला काहीच किंमत किंवा अधिकार नसल्याने आतल्या आत कुढणारी बिन्सी, उन्नीमाया प्रसादने मोजक्या संवादात आणि शारीरभाषेत सुंदर उभी केली आहे.

प्रत्येक सिनेमा ही एक स्वतंत्र कलाकृती असते त्यामुळे एका सिनेमाची दुसऱ्याशी तुलना करू नये असं म्हणतात. पण जेव्हा एकाच कथावास्तूवर आधारित दोन सिनेमे आपल्या समोर असतात तेव्हा मनातल्या मनात का होईना त्यांची तुलना होणे अपरिहार्य असते. एका बाजूला दिलीश पोथानचा ‘जोजी’ आहे आणि दुसऱ्या बाजूला विशाल भारद्वाजचा ‘मकबूल’ आहे. दोघांचाही मूळ स्रोत एकच आहे …. मॅकबेथ!

‘मकबूल’मधे मुंबईवर राज करणारा अब्बाजी हा आजच्या काळातला अंडरवर्ल्ड डॉन आहे. त्यात घडणारे प्रसंग, बोलली जाणारी भाषा सारं काही आजचं वाटतं याउलट ‘जोजी’ मधे काही किरकोळ गोष्टी (मोबाईलचा वापर, ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन डिलिव्हरी) वगळल्या तर आधुनिक म्हणावं असं काहीच नाही. हा सिनेमा सोळा-सतराव्या शतकाच्या पार्श्वभूमीवर केला असता तरी असाच्या अस्साच झाला असता.

अब्बाजीने आपल्याला घरात आसरा दिलाय, आपण त्याच्या मनावर राज करतोय पण तरीही त्याने आपल्याला बायकोचा दर्जा दिलेला नाही म्हणून अब्बाजीवर खार खाऊन असलेली, निम्मी (तब्बू) हे जाणून असते की अब्बाजीला भविष्यात दुसरी कुणी बाई आवडली तर तो आपल्याला तांदळातील खड्यासारखं दूर सारेल. पण निम्मीला तर सत्ता हवीय, आत्मसन्मान हवाय, निर्णय-स्वातंत्र्य हवंय, प्रेम हवंय. मकबूल सिनेमामधे निम्मीची ही भावावस्था विविध संवादातून, प्रसंगातून नीटपणे समोर येते. याउलट आपण आपल्या इतर भावंडांपेक्षा वेगळे आहोत आणि आपल्याला इतरांपेक्षा चांगलं / जास्त मिळायला हवं हे जोजीचं वाटणं आणि त्याची कारणमीमांसा स्पष्टपणे प्रेक्षकांसमोर येतच नाही. त्याच्या खुनशी प्रेरणांचा शोध लागत नाही. त्याच्या पूर्वायुष्यातील तसे काही क्लू दिग्दर्शक देत नाही.

मारणे आणि मरणे हा मकबूल मधील पात्रांचा नित्याचा खेळ असल्याने त्यांनी एखाद्याचा खून करून आपल्या मार्गातील काटा काढणे हे सहज पटण्यासारखं आहे. पण सामान्य घरातील एका बुळ्या युवकाने आपल्याच रक्ताच्या नात्यातल्या लोकांचे खून करण्या इतपत हिंस्त्र होणे पटत नाही. बिन्सी या सामान्य हाऊसवाईफचा आपल्याच घरातील व्यक्तीच्या खुनाला पाठिंबा देईपर्यंतचा भावनिक-वैचारिक प्रवासही खुलेपणाने समोर येत नाही. तसं ते पटवून देण्याजोगे प्रसंग, जोजीच्या कथेत येत नाहीत.

आपण जिथे काम करतो तेथील सर्वोच्च बॉस होण्याची इच्छा / महत्वकांक्षा जवळजवळ सगळ्यांनाच असते. मकबूल (इरफान खान) देखील याला अपवाद नाही. पण सर्वोच्च स्थानावर जायचे असेल आणि आपल्या प्रेयसीलाही प्राप्त करायचे असेल तर अब्बाजींचा काटा काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे मकबूलला पटविण्याचे आणि त्याच्या महत्वाकांक्षेला हवा देण्याचे काम निम्मी करते. जोजीच्या बाबतीत त्याला असे बाहेरून हवा देणारे कुणी नाही आणि जोजीच्या आतल्या आत काय मनोव्यापार चालले आहेत हे सांगणारे पुरेसे प्रसंग, प्रतीकं जोजी सिनेमात नाहीत.

निम्मीने केलेल्या कर्माची टोचणी तिला सुखाने जगू देत नाही. आपल्या पोटात वाढणारे बाळ मकबूलचे की अब्बाजीचे हे द्वंद्व तिचा पिच्छा सोडत नाही. दुसरीकडे निम्मीच्या महत्वाकांक्षेपायी मकबुलने ज्यांच्याशी पंगा घेतला ते एकत्र येऊन मकबूलचाच खात्मा करतात. आपला हात, चेहरा इतकेच नव्हे तर संपूर्ण घर अब्बाजींच्या रक्ताने माखलेले तिला दिसत राहते. जोजीला अशी काही सद्सद्विवेकाची टोचणी लागलेली दिसत नाही. उलट आपला एक गुन्हा दडपण्यासाठी तो दुसराही खुनाचा गुन्हा करतो आणि हे सगळं अंगाशी येईल असं वाटताच आत्महत्या करतो.

निम्मीने किंवा जोजीने असं का केलं? असं करून त्यांना काय मिळालं? हे प्रश्न दोन्ही सिनेमात अनुत्तरीतच राहतात. पण निम्मीच्या बाबतीत तिच्या खुनशीपणाच्या प्रवासाला भक्कम जस्टिफिकेशन आहे, जोजीमधे असं तितकंसं कन्व्हीन्सिंग जस्टिफिकेशनही नाही आणि सराईत गुन्हेगार नसलेल्या व्यक्तीला आपल्या हातून गुन्हा झाल्यावर येणारी अपराधीपणाची भावनाही जोजी मधे दिसत नाही.

असो, डोक्यातला ‘मकबूल’ बाहेर काढून ठेवला तर ‘जोजी’ हा एकदा पाहावा असा चांगला सिनेमा आहे.