– केदार परुळेकर
ज्येष्ठ शब्दभ्रमकार, जादुगार के.एस. गोडे येत्या ३० नोव्हेंबर रोजी ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. काही वर्षांपूर्वी गोडे जादूचे कार्यक्रमही करत असत. त्या सुमारास गोडे यांनी त्या काळातील प्रसिद्ध शब्दभ्रमकार यशवंत पाध्ये (शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांचे वडील) यांचा शब्दभ्रमकलेचा कार्यक्रम पाहिला आणि ते प्रभावित झाले. त्यांच्या मनातही बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम करावा, असा विचार आला. पण प्रयोग करण्यासाठी भारतात बोलका बाहुला उपलब्ध नव्हता.
१९७१ मध्ये गोडे यांचे गुरु ‘चंदू द ग्रेट’ हे एका कार्यक्रमासाठी परदेशी गेले होते. यांच्याकडून त्यांनी एक बाहुला मागवला आणि शब्दभ्रमाचे कार्यक्रम सुरु केले. शब्दभ्रमकलेसाठी असे बाहुले भारतातच बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यासाठी गोडे यांनी प्रयत्न सुरु केले. नॉर्थ अमेरिकन असोसिएशन ऑफ व्हेट्रीलिक्वस्ट या संस्थेचे ते सभासद झाले. तिथे त्यांचा परिचय शब्दभ्रमकार डेव्ह मिलर यांच्याशी झाला. गोडे यांनी मिलर यांच्याकडून केवळ पत्रव्यवहाराच्या सहाय्याने बोलका बाहुला बनविण्याचे तंत्र शिकून घेतले. पुढे १९७७ मध्ये गोडे यांनी तीन हालचाली असणारा पहिला बाहुला तयार केला. आजपर्यंत गोडे यांनी सुमारे साडेचारशेहून अधिक बाहुले तयार करुन अनेकजणांना उपलब्ध करुन दिले आहेत.
गोडे यांनी पुढे आपले संपूर्ण आयुष्य शब्दभ्रमकला आणि बोलक्या बाहुल्यांसाठी वाहून घेतले. नोकरी सांभाळून त्यांनी हा छंद जोपासला. शब्दभ्रमकलेच्या आपल्या कार्यक्रमाबरोबरच त्यांनी ही कला इतर अनेकांना शिकविली, मोलाचे मार्गदर्शन केले. गोडे यांनी तयार केलेले ७५ बाहुले तर अमेरिका, जपान, मॉरिशस, हॉंगकॉंग, कॅनडा येथेही पोहोचले आहेत.
गोडे यांनी या कलेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘शब्दभ्रम शास्त्र आणि कला’ हे मराठी तर ‘मॅजिक ऑफ टॉकिंग डॉल’ हे इंग्रजी पुस्तकही लिहिले आहे. ‘के. एस. गोडे सिखाते है शब्दभ्रम’ ही शब्दभ्रमकलेच्या प्रात्यक्षिकासह माहिती असलेली ध्वनिफितही प्रकाशित झाली आहे. शब्दभ्रमकलेवरील सहा लेख अमेरिकेतील नियतकालिकांमध्येही प्रसिद्ध झाले आहेत.
सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी गोडे यांनी जिद्द, परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर बोलका बाहुला बनविण्याची कला शिकून घेतली, त्यात वेळोवेळी नवनवीन सुधारणा करत शब्दभ्रमकलेचा प्रचार केला. गोडे यांचे हे योगदान महत्वाचे आहे. त्यांच्या शब्दभ्रमकलेचा नुकताच मोठा गौरव झाला आहे. अमेरिकेतील व्हेण्ट हेवन म्युझियममध्ये जगभरातील वेगवेगळ्या बाहुल्या ठेवण्यात येतात. या संग्रहालयात आता गोडे यांनी तयार केलेला बाहुला स्थानापन्न होणार आहे.
वयाच्या ऐंशीव्या वर्षातही गोडे यांचा उत्साह कायम असून शब्दभ्रमकला आणि बोलक्या बाहुल्या याविषयी आजही त्यांचे संशोधन आणि नवीन प्रयोग करणे सुरु असते. १९९३ पासून मी शब्दभ्रमकलेचे वेगळे प्रयोग केले असून त्यासाठी गोडे यांनीच तयार केलेला बाहुला वापरला होता.
शब्दभ्रमकलेतील या महान तपस्व्याला मानाचा मुजरा आणि ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त त्रिवार वंदन. जीवेत् शरदः शतम्.