कीर्तिकुमार शिंदे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचार सभांच्या झंझावातामुळे महाराष्ट्रातील आणि काही प्रमाणात देशातीलही राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मुंबईत झालेला मनसेचा गुढीपाडवा मेळावा (६ एप्रिल), शुक्रवारी (१२ एप्रिल) नांदेडमध्ये झालेली सभा आणि सोमवारी (१५ एप्रिल) सोलापुरात झालेली सभा अशा सलग तीन सभांमधून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे, मनसेचा एकही उमेदवार या लोकसभा निवडणुकीत उभा नाही, त्यामुळे राज यांच्या सभांना ‘प्रचार सभा’ तरी कसं म्हणायचं, हा प्रश्न उपस्थित होतो. पण प्रचार हा केवळ मला ‘मत द्या’ हे सांगण्यासाठी केला जात नाही, तर गैरकारभार करणाऱ्या सत्ताधाऱयांना ‘मत देऊ नका’ हे सांगण्यासाठीही करता येऊ शकतो, हे राज यांनी दाखवून दिलं आहे. त्याबद्दल ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत.
निवडणुकीसाठी स्वतःच्या पक्षाचे उमेदवार उभे न करताही अत्यंत गांभीर्याने आणि प्रभावीपणे प्रचार करणारे राज ठाकरे हे देशातील असे एकमेव नेते असतील. सर्वात महत्वाचं म्हणजे, या निवडणुकीसाठीचा त्यांचा अजेंडा अत्यंत सुस्पष्ट आहे, त्यात किंचितशीही धुसरता नाही. हुकूमशाही प्रवृत्तीच्या मोदी-शाह या जोडगोळीला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखणे हेच त्यांच्या प्रचार सभांचं प्रमुख सूत्र आहे. आतापर्यंतच्या तीन जाहीर सभांमध्ये राज यांनी एकदाही आपला फोकस ढळू दिलेला नाही. मोदी-शाह किंवा भाजपा सोडून त्यांनी इतर कोणताही राजकीय पक्ष वा नेत्यावर टीका केलेली नाही, हे आणखी एक वैशिष्ट्य.
सोलापूरच्या सभेत राज ठाकरे यांनी सुमारे ५० मिनिटं भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी भाजपा सरकारवर दोन महत्वाचे तोफगोळे टाकले. पहिला तोफगोळा होता, देशातील जनतेच्या- प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्यात येतील हे जे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं, त्याविरोधात. १५ लाखांचे हे आश्वासन म्हणजे एक ‘चुनावी जुमला’ होता, हे वाक्य अमित शाह यांच्या तोंडातूनच राज यांनी सोलापूरच्या जनतेला ऐकवलं. त्यासाठी त्यांनी आधार घेतला तो एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या अमित शाह यांच्या मुलाखतीचा. पंतप्रधानपदासाठीची उमेदवार म्हणून जाहीर झालेली व्यक्ती म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनतेला दिलेले आश्वासन म्हणजे चुनावी जुमला होता, याची या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून राज यांनी सर्वाना आठवण करून दिली. सभेला उपस्थितील लोकांनी शेम शेम म्हणून या व्हिडिओ क्लिपला प्रतिसाद दिला.
भाजपा सरकारवर राज यांनी फेकलेला दुसरा तोफगोळा तर आणखी प्रभावी होता. या दुसऱ्या तोफगोळ्यातून त्यांनी एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या प्रतिमांच्या पार चिंधड्या उडवल्या. खरंतर, गुढीपाडव्याच्या सभेतच राज यांनी अमरावती जिल्ह्यातील हरीसाल या गावातील सत्यपरिस्थिती सांगणारा व्हिडिओ लोकांना दाखवला होता. हरीसाल हे देशातील पहिले डिजिटल गाव असल्याचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणात केला होता. त्यामुळेच राज ठाकरे यांच्या सहकाऱ्यांनी हरीसालला प्रत्यक्ष भेट देऊन तिथल्या डिजिटल वास्तवावर व्हिडिओ बनवला, जो राज यांनी मुंबईतल्या सभेत दाखवला.
खरी गंमत यापुढे आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत झाली. या मुलाखतीत फडणवीस यांना राज यांनी हरीसालविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नांविषयी छेडण्यात आलं तेव्हा फडणवीस यांनी राज यांनी केलेल्या टीकेत तथ्य नसल्याचं सांगितलं. इतकंच नव्हे तर, हरीसालमध्ये डिजिटली सर्वकाही व्यवस्थित असल्याचं सांगून तुम्ही तिथे जाऊन बघा, असं मुख्यमंत्री या मुलाखतीत म्हणाले. त्यानंतर लोकसत्ता. कॉम आणि अन्य प्रसारमाध्यमांनी हरीसालला जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती दाखवणाऱ्या बातम्या दिल्या. त्यातून या तथाकथित डिजिटल गावात फोर-जी टॉवर नाही, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. शाळांमधील टॅब बंद असल्याचे समोर आले. इतकंच नव्हे तर हे ‘माझे सरकार : मी लाभार्थी’च्या हरीसालच्या जाहिरातीत जी व्यक्ती मॉडेल म्हणून दाखवण्यात आली ती व्यक्ती रोजगाराच्या शोधात गाव सोडून पुण्याला गेल्याचंही समोर आले.
सोलापूरच्या सभेत राज यांनी हा सर्व प्रकार समोर आणला. यामुळे भाजपा सरकारच्या डिजिटल इंडियाच्या घोषणा किती फसव्या आहेत, हे सिद्ध तर खालंच, पण त्यातून महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा सर्वांसमोर आला. मात्र या ‘राज’सभेचा परमोच्च बिंदू तेव्हा आला जेव्हा राज यांनी अत्यंत नाट्यमय पद्धतीने हरीसालच्या त्या लाभार्थी मॉडेललाच व्यासपीठावर आणलं ! थोडक्यात काय तर, राज यांचे दोन दात पाडायला गेलेल्या मुख्यमंत्र्याची संपूर्ण बत्तीशीच राज यांनी पाडली!!
दरम्यानच्या काळात भाजपा आयटी सेलकडून हरीसालमध्ये सर्व काही सुरळीत असून राज यांचे दावे खोटे असल्याचं पद्धतशीररित्या पसरवलं गेलं होतं. त्यासाठी नेहमीप्रमाणे खोट्या इमेजेसचा वापर केला गेला. अर्थात, भाजपाने असा फेक प्रचार कायमच केला आहे. पण यावेळी राज ठाकरेंच्या विरोधात करण्यात आलेला फेक प्रचार भाजपाला खूपच महागात पडला.
जर्मनीचा हुकूमशाह हिटलर रेडिओचा वापर राजकीय प्रचारासाठी आणि लोकांची माथी भडकवण्यासाठी करत असे. नरेंद्र मोदी यांचा रेडिओवरून प्रसारीत होणारा ‘मन की बात’ हा कार्यक्रम म्हणजे हिटलरचं अनुकरण असल्याचं राज यांनी म्हटलं आहे. वर्तमानपत्रं-वृत्तवाहिन्या यांची मुस्कटदाबी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, स्वतःचा आणि स्वतःच्या विचारांचा-योजनांचा प्रसार करण्यासाठी सिनेमांची निर्मिती ही हिटलर आणि मोदी यांच्यातील साम्यस्थळे असल्याचंही राज त्यांच्या भाषणातून सांगत असतात.
हिटलरच्या सत्ताकाळात म्हणजे १९३३ ते १९४५ या काळात जोसेफ गोबेल्स हा जर्मनीचा ‘प्रोपागंडा’ मिनिस्टर होता. हिटलर कसा महान राष्ट्रभक्त आहे, त्याच्या नेतृत्वाखाली जर्मनीचा कसा अभूतपूर्व विकास होतोय, ‘हिटलर म्हणजेच जर्मनी’ हे जर्मन जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी गोबेल्सने भित्तीचित्रांपासून ते सिनेमापर्यंतच्या सर्व तत्कालीन माध्यमांचा वापर केला. असत्य गोष्ट वारंवार बोलत राहिल्यास नंतर ती जनतेला सत्य वाटू लागते, या त्याच्या प्रोपागंडा सूत्रालाच ‘गोबेल्स प्रचारतंत्र’ असं नाव पडलं. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, सरकारी निधीतून केली जाणारी प्रचंड जाहिरातबाजी, मोदींवर वेबसिरीजपासून सिनेमाची निर्मिती अशा सर्व प्रकारातून ‘मोदी म्हणजेच भारत’ हे ठसवण्याचा प्रयत्न केला जातोय. हे करताना फेक आकडेवारी, फेक इमेजेस, फेक व्हिडिओ, फेक भाषणं, फेक मुलाखती यांचा सुकाळ झालाय. दुष्काळ पडलाय तो फेकूगिरीविरोधात आवाज उठवण्याचा!
आजच्या काळातील डिजिटल फेकूगिरीविरोधात जमिनीवरची सच्चाई पुढे आणण्याची गरज होती. ती गरज आज राज ठाकरे पूर्ण करताहेत. जे सत्य सांगायला मोठमोठ्या राजकीय पक्षांचे नेतेसुद्धा घाबरत होते, ते सत्य राज ठाकरे धैर्याने मांडत आहेत. गोबेल्स तंत्राचा अवलंब करून भाजपाकडून सुरू असलेल्या प्रचाराचा पराभव करण्याची क्षमता फक्त आणि फक्त ‘सत्यमेव जयते’ या भारतीय विचारात आहे, याचं उदाहरण म्हणजे राज ठाकरे. म्हणून तर एकही खासदार- आमदार नसलेल्या या नेत्याला आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं आणि सर्वसामान्य जनतेचं प्रेम भरभरून मिळत आहे. त्यांच्या सभांना मिळणारा उदंड प्रतिसाद हेच सिद्ध करतोय.