आज गटारी अमावस्या. कोकणवासीयांना ‘त्या’ दुःखद घटनांची आज आठवण होते. अनेक जीवांचे करुण अंत आजच्या दिवशी झाले. काहीजणांना ‘गटारी अमावस्या’ अशुभ असते म्हणून अपघात झाले, असेही म्हणण्यास सुरुवात केली. कारण, कोणतेही असले, तरी या दिवशी झालेले अपघात कोकणवासीय नक्कीच स्मरणात ठेवतील. असे कोणते दोन अपघात झाले, काय घडले त्या दिवशी आणि साधारणतः गटारी अमावस्येला बदलणाऱ्या ग्रहस्थितीविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
‘रामदास’ची करुण कहाणी
रामदास बोटीचा अपघात हा कोकणवासीयांना हादरवून सोडणारा होता. रामदास बोटीच्या करुण अंताविषयी ‘दर्यावर्दी’ मासिकात अमोल सरतांडेल यांनी सविस्तर माहिती लिहिली आहे. त्या माहितीनुसार, मुंबईहून रेवसकडे जाण्यास निघालेली ‘रामदास’ बोट १७ जुलै, १९४७ रोजी मुंबई बंदरापासून अवघ्या नऊ मैलांवर असलेल्या ‘काशा’च्या खडकाजवळ सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व दोन प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे कलती होऊन समुद्रात बुडाली आणि तिच्याबरोबर त्या बोटीने प्रवास करणारे सहाशे-सातशे उतारूही समुद्रात बुडून मरण पावले. सुमारे २० वर्षांपूर्वी ‘तुकाराम’ आणि ‘जयंती’ या दोन बोटी बुडाल्याच्या प्रकारानंतर घडलेला भयंकर प्रकार हाच होय.
गटारी अमावस्येचा दिवस होता. त्या दिवशी हवा वादळी होती. सोसाट्याचा वारा सुटला होता. पाऊस सारखा पडत होता. अमावस्या असल्यामुळे समुद्राला उधाण होते. रामदास बोट १९३६मध्ये बांधलेली, ४०६ टन वजनाची बोट होती. १९४२मध्ये ती युद्धकार्यासाठी सरकारने घेतली होती. दि. १७ जुलै, १९४७ रोजी सकाळी ८ वाजता रामदास बोट भाऊच्या धक्क्यावरून रेवसला जाण्यास निघाली. बोट समुद्रातून निघाली, त्यानंतर एका तासाच्या आत ती बुडाली. त्या दिवशी समुद्रावर वादळ होते, असे या बोटीच्या अपघातात बचावलेल्या एका खलाशाने सांगितले होते. त्याच्या म्हणण्यानुसार, ”वादळाचा जोर पाहून आसऱ्यासाठी जवळच्याच खाडीत बोट घालण्याचा प्रयत्न कप्तान शेख सुलेमान यांनी केला, तेव्हा एखाद्या कचकड्याच्या खेळण्याप्रमाणे बोट लाटांवर डुलत होती आणि समुद्राच्या व वादळाच्या जोराशी झगडत होती. फक्त एकदाच तिने गटंगळी खाल्ली आणि ती पाचच मिनिटांच्या आत अदृश्य झाली.” ही भयंकर बातमी सायंकाळी ४ च्या सुमारास मुंबईमध्ये समजली. अवघ्या ९ मैलांवरचा हा भीषण प्रकार मुंबईकरांना संध्याकाळी समजला. बंदरावरील बोट कंपनीलाही तो लवकर समजू शकला नाही. सकाळी सुटलेली रामदास बोट वास्तविक दुपारी २ वाजता मुंबई बंदरात परत यायची; पण तिचा एवढा वेळ पत्ता न लागल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आणि बोट बुडाल्याची नक्की बातमी त्यांना संध्याकाळी ४ वाजता समजली.
हेही वाचा : राजकीय नेते ‘बडव्यां’चा उल्लेख करतात, हे ‘बडवे’ म्हणजे कोण ? काय आहे बडव्यांचा इतिहास
किनाऱ्यालगत फिरताना ‘रामदास’वर १०५० उतारू व ४२ खलाशी घेण्याची परवानगी होती. ज्यावेळी गोवा वगैरे भागांत ही बोट जाई, तेव्हा ६९५ उतारू, हॉटेलचे १० नोकर व ४२ खलाशी नेण्याची परवानगी असे. साधारणतः रेवसला इतके लोक कधीच जात नसत. दि. १७ रोजी गटारी अमावास्या असल्यामुळे, त्या दिवशी घरी जाण्यासाठी उतारूंची एवढी गर्दी झाली होती. माहितीनुसार, ६६७ तिकिटे संपली होती, तर बोट सुटताना उड्या मारून बसलेले प्रवासी मोजले तर एकूण ७०० च्यावर प्रवासी होते. रामदास बोटीची या वर्षीच नाविक अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली होती व बोट चांगल्या स्थितीत असल्याचे शिफारसपत्रही मिळाले होते. सरकारी वर्गवारीत ही बोट नवव्या प्रतीची होती. बोट बुडाल्याची बातमी उरणला १.३० वाजता समजली. करंजे बंदरात पोहत आलेल्या लोकांकडून हकीकतही समजली. लगेच लोक मोटारी, टांगे वगैरे घेऊन मदतीसाठी करंजे, मोरे, पिरवाड येथील बंदरकिनारी गेले. त्यांना काही माणसे समुद्रात तरंगत असलेली दिसताच, धाडसी मंडळींनी आपल्या जिवाची पर्वा न करता समुद्रात उड्या टाकल्या. त्यांनी २० लोकांना जिवंत बाहेर काढले. त्यापैकी करंजे बंदरात १२ व पिरवाड येथे आठ असे लोक वाचविण्यात आले. आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी पंढरपूरला गेलेल्या जंजिरा संस्थानातील १८ माणसांच्या कुटुंबांतील एक माणूस काशिनाथ बाळ्या कोंडाजी हा करंजे बंदरामध्ये जीवंत सापडला.
यामधील अनेक प्रवासी हे अलिबाग,रोहा,चौल,उरण,महाड,मंडणगड,रेवस,रेवदंडा,दाभोळ खेड या भागातील होते. ‘रामदास’ची कहाणी आजही कोकणवासीयांच्या अंगावर काटा आणते.
हेही वाचा : तुम्ही रोज पेनकिलर घेत आहात ? वेदनाशामक औषधांचे ‘हे’ दुष्परिणाम माहीत आहेत का ?
‘सावित्री’ची काळरात्र
गटारी अमावस्येची रात्र होती. २ ऑगस्ट, २०१६ मधील सावित्री नदी पूल दुर्घटना अनेकांच्या आजही स्मरणात आहे. अमावस्या असल्यामुळे पावसाचे प्रमाणही अधिक होते. कोकणात पावसाचे प्रमाण अधिक असतेच. कोकणातील अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत होत्या. त्यातील एक सावित्री नदी. दोन दिवसांपासून महाबळेश्वर, पोलादपूर आणि महाड परिसरातील अतिवृष्टीचा सावित्री नदीवरील पुलाला तडाखा बसला. महाबळेश्वर येथे ३९० मिमी, तर दुसऱ्या दिवशी ४१० मिमी याप्रमाणे तब्बल ८०० मिमी पाऊस झाला. सावित्री नदीचा उगम महाबळेश्वरमध्ये होत असल्याने या नदीची पातळी वाढली. पोलादपूर आणि महाड परिसरात दोन दिवसांत जवळपास प्रत्येकी ५०० मिलीमीटर पाऊस पडला. त्याचाही परिणाम नदी पात्रावर झाला. सावित्री प्रचंड वेगाने वाहत होती. रात्री ११.३० च्या दरम्यान पाण्याचा मोठा प्रवाह आला आणि सावित्री नदीवरील १०० वर्षांहून अधिक जुना पूल कोसळला. या पुलासह अनेकांना जलसमाधी मिळाली. जयगड – मुंबई व राजापूर- बोरिवली या दोन एसटी बस, एक तवेरा, मोटारसायकल यासह ४० जणांना सावित्रीने आपल्या पोटात घेतले. वसंतकुमार या वर्कशापमधील कामगाराने पूल कोसळतांना पाहिल्यानंतर त्याने अनेक वाहने थांबवल्ले आणि पुढील मोठे अनर्थ टाळले. वाहने व मृतदेह शोधण्याचे काम तब्बल १५-२० दिवस सुरु होते. नेव्ही, कोस्टल, एनडीआरएफ, स्थानिक पोलीस, ग्रामस्थ, सरकारी यंत्रणा यासाठी प्रयत्नरत होते.
हेही वाचा : शिजवलेल्या अन्नासह सॅलड खाताय ? ‘हे’ पदार्थ ठरू शकतात धोकादायक
या सावित्रीच्या पाण्यात अनेकांची स्वप्ने वाहून गेली. दोन भाऊ नोकरीनिमित्त दुबईला जाणार होते . त्यासाठी ते राजापूर-बोरिवली बसमध्ये चढले. परंतु, ते त्यांचे स्वप्नच राहिले. तवेरा गाडी पूर्ण वाहून गेल्यामुळे संपूर्ण कुटुंबच सावित्रीमय झाले. काहीजण महाविद्यालयात शिकण्यासाठी जात होते, तर काही मुंबईत नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेले. परंतु सावित्रीच्या पुलासह त्यांचेही मनसुबे तुटले.
गटारी अमावस्या, पावसाचे अंदाज आणि ग्रहस्थिती
आषाढ अमावस्या म्हणजे गटारी अमावस्येला अधिक पाऊस पडण्याची शक्यता असते. साधारणतः पौर्णिमा आणि अमावस्येला पाऊस अधिक पडतो. गटारी अमावस्येला सूर्य साधारणतः कर्क राशीत असतो. कर्क ही चंद्राची रास आहे आणि तिचे तत्त्व जल आहे. त्यामुळे चंद्राच्या गती समुद्रातील बदलांना कारणीभूत ठरतात. पौर्णिमा आणि अमावस्येला समुद्राला अधिक उधाण येण्यास या चंद्राच्या गती कारण असतात. गटारी अमावस्येला अग्नीतत्त्वाचा सूर्य जलतत्त्वाच्या कर्क राशीत येतो. त्यामुळे काही महत्त्वाची स्थित्यंतरे घडण्याची शक्यता असते. हे बदल कर्क राशीच्या लोकांना अधिक जाणवतात.
गटारी अमावस्या ही महत्त्वाच्या अमावस्यांपैकी एक समजली जाते. कोकणवासीयांसाठी या दोन अपघातांमुळे दुःखद घटनांची आठवण करून देणारी अमावस्या आहे.