– अजित बायस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक्झिट पोल्सच्या अंदाजांनी देशात मोदींचं सरकार स्थापन झालंय असंच काहीसं वातावरण सध्या देशात आहे. एक्झिट पोल्सचा इतिहास साधारणतः असा राहिलाय की या पोल्सचे आकडे चुकतात, मात्र सरकार स्थापनेच्या दृष्टीने हे पोल्स योग्य अंदाज दर्शवतात. यावेळची निवडणूक खूप जवळून बघितलिये. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळालेले इनपुट्स मला एक्झिट पोल्सच्या अंदाजाकडे थोडंस शंकेने बघायला परावृत्त करताहेत. मला मिळालेल्या इनपुट्सच्या आधारे माझी काही निरीक्षणे आणि अंदाज इथे मांडतोय.

सर्वात आधी आकडे देतो, ज्यात सगळ्यांना इंटरेस्ट असतो- भाजप- १८० ते २००, एनडीए २००-२३०, काँग्रेस- ११०-१२०, इतर- १८०-२००.

१. उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपा महाआघाडीचा भाजपला मोठा फटका बसेल आणि मागच्या वेळच्या ७३ वरून भाजपची  गाडी जवळपास २५ ते ३० जागांपर्यंत घसरेल. महाआघाडी ४० ते ४५ आणि काँग्रेस ५ ते ८ जागांवर जिंकेल अशी शक्यता आहे.

२. सगळ्या एक्झिट पोल्समध्ये अमेठी आणि रायबरेली या दोन पारंपारिक जागांशिवाय एकही एक्स्ट्रा जागा दिलेली नसताना काँग्रेसला ५ ते ८ जागा देणं धाडसाचं असल्याची मला कल्पना आहे, पण माझ्या इनपुट्सनुसार काही सीट्सवर काँग्रेस जिंकू शकते.  उदा. धोरहरामधून जितीन प्रसादा, कानपूरमधून श्रीप्रकाश जायस्वाल इत्यादी.

३. महाराष्ट्रात भाजप-सेनेला जवळपास १२-१४ जागांचा फटका बसेल. वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपचं नुकसान थोडसं कमी होताना दिसतंय. अन्यथा हा फटका अधिक असू शकला असता. महाराष्ट्रात युतीला २८ ते ३२ जागा मिळतील. एक जागा वंचित बहुजन आघाडीला. उर्वरित काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष.

४. प्रकाश आंबेडकर आकोल्यातून जिंकू शकतात आणि सोलापुरमध्ये त्यांच्यामुळे सुशील कुमार शिंदे पडण्याची शक्यता आहे. नागपूरमधून नितीन गडकरींना देखील धक्का बसू शकतो.

५. कर्नाटकमध्ये काँग्रेस आघाडीला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. आघाडीला राज्यातील २८ पैकी १३ जागा मिळतील, उर्वरित १५ जागांसह भाजपची कामगिरी चांगली राहील. गुजरात २६ पैकी २० जागांसह भाजपसह राहील. उर्वरित ६ जागा काँग्रेसच्या वाट्याला येतील.

६. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधल्या विधानसभेतील विजयानंतर या राज्यात काँग्रेसची कामगिरी चांगली राहील अशी पक्षाला आशा होती, पण तसं होताना दिसत नाही. एक्झिट पोल्समध्ये दिसतोय तेवढ्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसला फटका बसेल असं मात्र वाटत नाही.

७. थेट भाजप-काँग्रेस अशी लढत असलेल्या या राज्यांमध्ये काँग्रेसला मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये अनुक्रमे १२ आणि १० जागा मिळतील तर भाजपला अनुक्रमे १७ आणि १५. छत्तीसगढमध्ये काँग्रेसची कामगिरी तुलनेने चांगली राहील. इथे काँग्रेसला ११ पैकी ८ जागा मिळू शकतात. उर्वरित ३ भाजपकडे जातील.

८. पंजाबचे निकाल काँग्रेसच्या बाजूने जातील. १३ पैकी ९ ते १० जागा काँग्रेसला मिळतील. भटिंडामधून मोदी सरकारमधील मंत्री हरसिमरत कौर यांना काट्याची टक्कर मिळतेय. त्यांना पराभवाचा धक्का बसू शकतो. संगरुरमधून आपचे भगवंत मान त्यांची जागा राखतील. पण बाकी ३ जागा आपच्या हातून जाताहेत. त्याचा थेट फायदा काँग्रेसला होतोय. गुरदासपूरमध्ये सनी देओल पराभवाच्या छायेत आहे.

९. केंद्राशाशित चंदिगढमधली जागा काँग्रेसकडे जाईल. शेजारच्या हरयाणामध्ये भाजप  ६ जागांवर तर काँग्रेस ४ जागांवर मिळवेल. हिमाचल प्रदेश मध्ये ४ पैकी ३ जागा भाजप राखेल. कांगडाच्या जागेवर काँग्रेसला विजयाची आशा आहे.

१०. दिल्लीमध्ये खूप प्रयत्नानंतर देखील काँग्रेस-आप आघाडी होऊ शकली नाही. त्याचा थेट फायदा भाजपला होतोय. काँग्रेस-आप आघाडी झाली असती, तर दिल्लीतल्या ७ जागा ही आघाडी जिंकू शकली असती. आता मात्र भाजप ६-१ ने दिल्लीतली लढाई जिंकताना दिसतंय. आतीशीच्या रुपात एक जागा आपला मिळेल. काँग्रेसला खातंही उघडता येणार नाही.

११. २०१४ सालचा अरविंद केजरीवाल यांच्याकडून झालेला पराभव पचवू आणि त्यामुळेच विसरू न शकलेल्या आणि परिणामी आपसोबतच्या आघाडीला प्रतिकूल असलेल्या शीला दीक्षित यांना अजून एक पराभव पचवावा लागेल.

१२. दक्षिण आणि पूर्वोत्तर भारतातले इनपुट्स माझ्याकडे नाहीत. त्याविषयी काही अंदाज व्यक्त करता येणार नाही. त्यामुळे आकडेवारीसाठी म्हणून मी माध्यमांमधील अंदाजांवर आणि राजकीय समिकरणांवर अवलंबून आहे.

ता.क- निकालांचं काय व्हायचं ते होईल. त्यासाठी  २३ पर्यंत वाट बघणं सयुक्तिक ठरेल. मला स्वतःला सगळ्यात जास्त इंटरेस्ट बेगुसराय आणि भोपाळच्या रिझल्ट्समध्ये आहे. बेगुसरायमध्ये कन्हैया जिंकला पाहिजे आणि भोपाळमध्ये प्रज्ञा सिंग ठाकूर हारली पाहिजे. कन्हैयाच्या  जिंकण्याकडे एक आशा म्हणून बघता येईल, तर प्रज्ञा सिंग ठाकूर जर जिंकली तर ती देशाच्या कलेक्टिव्ह इंटेलिजन्सचं अधःपतन अधोरेखित करणारी बाब ठरेल. तसं होऊ नये एवढीच इच्छा.

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत)