– शैलेंद्र रिसबूड
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या संपूर्ण जीवनात त्यांचा वेळ, श्रम, पैसा आणि बुद्धीचा कस जर कुठल्या प्रकरणात लागला असेल तर ते म्हणजे ‘ताई महाराज’ प्रकरण. बाळा महाराजांची सारी मिळकत कायद्यानुसार टिळकांना जगन्नाथ महाराजांच्या ताब्यात द्यायची होती, पण बाळा महाराजांनी ते दडपण्यासाठी हायकोर्टात ‘इनामी उत्पन्न आपल्या देणगीचे आहे’ असा दावा करणारा अर्ज हायकोर्टात केला होता. जगन्नाथ महाराजांचे कैफियत तयार करण्याचे काम टिळकांनी आपल्याकडे घेतल्याने त्यासाठी त्यांना मुंबईला येणे भाग होते. ‘ताई महाराज’ प्रकरणाचा हा शेवटचा टप्पा एकदाचा संपवण्यासाठी लोकमान्यांनी दिनांक १२जुलैला पुणे सोडले. तो त्यांचा शेवटचा रेल्वे प्रवास ठरला. पुण्याहून निघतांना त्यांचा अंगात कणकण होती, पण दरवेळेप्रमाणे ह्यावेळी सुद्धा त्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष केले आणि ते १२जुलैला सरदारगृहात येउन दाखल झाले. ठरल्याप्रमाणे १४जुलैला अर्जाची मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. कामाचा ताण व प्रवासाचा त्रास त्यांच्या आधीच क्षीण झालेल्या प्रकृतीला झेपला नाही. निकालाच्या आदल्या दिवशी म्हणजे २०जुलैला टिळकांच्या तापाचा जोर वाढला तरी सुद्धा दिवाण चमनलाल यांच्या आग्रहाखातर संध्याकाळी लोकमान्य उघड्या मोटारीतून बरेच दूरवर फेरफटका मारून आले. चमनलाल यांच्या गाडीत सुमारे दोन तास त्यांनी गांधींच्या असहकारावर व भारतीय मजूर परिषदेच्या चळवळीवर चर्चा केली. मजूर परिषदचे अध्यक्षपद टिळकांनी स्वीकारावे अशी विनंती चमनलाल यांनी टिळकांना केली व लोकमान्यांनी त्याला मान्यता दिली व ते म्हणाले – “मजूरवर्गाकडे माझे लक्ष आहे. १९०८ साली मला शिक्षा झाली, तेव्हा गिरणी मजुरांनी माझ्याबद्दल केवढे प्रेम व्यक्त केले”. हे बोलतांना टिळकांचे मन समाधानाने भरून आले.
निकालाच्या दिवशी म्हणजे दिनांक २१जुलैला मुंबई हायकोर्टाने बाळा महाराजांचा अर्ज फेटाळला, प्रतिवादीचा खर्चही देवविला व टिळकांना फार मोठे असे शेवटचे यश मिळवून दिले. मुंबई हायकोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला आहे हे समजल्यावर लोकमान्य म्हणाले – “या खटल्यात गेली १४ वर्ष माझी बुद्धी व शक्ती बरीच खाऊन टाकली. पण आनंद झाला असता हसणे व दुःख झाले असता रडणे या निव्वळ माकडचेष्टा आहेत असे समजून आपण आपले काम मात्र अखंड करीत राहिले पाहिजे”. टिळकांनी निकाल ऐकला होता पण निकालाची लेखी प्रत त्यांच्या हातात आली नव्हती. ही प्रत काही दिवसांनी त्यांना मिळाली पण त्यांचे आजारपण वाढल्यामुळे त्यांना ती वाचता आली नाही. मुंबईतील त्यांच्या या मुक्कामात गांधी, मौलाना शौकत अली आणि इतर नेते टिळकांना भेटून गेले. त्या मध्ये तरुण जवाहरलाल नेहरूसुद्धा होते. दोन दिवसानंतर म्हणजे दिनांक २३जुलैला लोकमान्यांचा चौसष्टावा वाढदिवस होता. त्यादिवशी त्यांना प्रकृतीला थोडा आराम वाटला व ते थोडावेळ उठूनही बसले. आलेल्या मित्रमंडळींना भेटले व थोडी थट्टा मस्करीही केली. आपण आणखी पाच वर्ष जगणार असे ते गमतीने म्हणाले. त्या दिवशी ते कमालीचे आनंदी दिसत होते व सर्वांना संकट टळले असे वाटून लोक निर्धास्त झाले. दिनांक २७जुलै रोजी आजाराला उतारा पडेना तेव्हा डॉक्टरांनी हे दुखणे मलेरियाचे नसून न्यूमोनियाचे आहे असे निदान केले. इतक्या मोठ्या आजारातसुद्धा ते औषध व इंजेकशन देणाऱ्या डॉक्टरांशी बोलतांना थट्टा मस्करी करत होते.
कालांतराने त्यांची फुफुसे सुजली, कोठा फुगला व उचकी लागायला लागली. डॉक्टरांनी ताबडतोब उचकीचे औषध देऊन ती बंद केली तर वात बळावला व ताप १०४ डिग्रीपर्यंत वाढला. प्रथम मलेरिया नंतर न्यूमोनिया व शेवटी शक्तीक्षय अशी टिळकांच्या आजारांची स्थिती डॉक्टरांनी मांडली. पण अचानक घाम आल्यामुळे डॉक्टरांना आजार बरा होण्याची चिन्हे दिसू लागली. दिनांक २८जुलै रोजी आजार आणखी बळावला व दिवसातून काही काळ शुद्ध जाऊन-येउन चालू झाली त्यामुळे त्यांना भेटावयास येणाऱ्या मंडळींपैकी काहींना ते ओळखत आणि काहींना ओळखत नसत. त्यांनी शुद्ध असतांना देशाच्या चिंतेची अगर भवितव्याची वाक्ये उच्चारली पण गृहप्रपंचाविषयी एकही शब्द उच्चारला नाही. टिळकांच्या या स्थितीकडे बघून डॉक्टरांना या आजारातून उतार पडेल का नाही अशी शंका वाटू लागली. त्यांच्या आजारपणाचे गांभीर्य ओळखून त्यांचे चिरंजीव, मुली इतर नातेवाईक आणि काही मित्रमंडळी त्याच्या जवळ राहायला आली. महात्मा गांधी, महंमद अली जिना यांच्याकडूनही वारंवार विचारणा होऊ लागली. जनतेत चिंतेचे वातावरण असल्याकारणाने, रस्त्यावरचा जमाव त्यांना भेटण्यासाठी काही हटत नव्हता.
मुंबईच्या दैनिकांमधून रोज टिळकांच्या आजारपणाविषयी ताजी बातमी देण्यात येत होती. दिनांक २९जुलैला त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्याच दिवशी सगळं संपायचं पण डॉक्टरांच्या अथक उपाययोजनांमुळे तो दिवस निभावला. ते आजाराशी झगडत होते आणि मुंबईतील निष्णात डॉक्टर्स त्यांना वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते. डॉ. देशमुख, डॉ. भडकमकर, डॉ. साठे, डॉ. वेलकर इत्यादी मुंबईतल्या प्रसिद्ध डॉक्टर्सनी आपली नित्याची कामे जवळजवळ बाजूला ठेवून दिली होती. टिळकांच्या शय्येजवळ तज्ज्ञ माणसांचा जागता पहारा होता. जनतेमधील सर्व थरातील लोक टिळकांना आराम मिळावा म्हणून प्रार्थना करत होते. दिनांक ३०जुलैला सरदारगृहामध्ये माणसांची रीघ लागली. गांधी, जिना, सर नारायण चंदावरकर टिळकांना भेटून गेले. नेहमीचा दिसणारा पक्षभेद या आजारपणामुळे दिसत नव्हता व सर्व पक्षाचे लोक टिळकांच्या विषयी आदरभाव प्रकट करीत होते. आपल्या घरचा माणूस असे समजून सरदारगृहाच्या मालकांनी टिळकांकरिता अनेक धार्मिक कार्ये करविली. दिनांक ३१जुलैला त्यांची नाडी क्षीण झाली पण चालू होती त्यांना श्वास घेणे जड होऊ लागले व रात्री नऊ वाजता त्यांना श्वास लागला. याच दिवशी म्हणजे ३१जुलैला पुण्यातील कॉन्ट्रॅक्टर रानडे यांच्या घरचा टेलिफोन चोवीस तास खुला होता व ताजी बातमी मिळताच स्वयंसेवक मंडळी ती गावातील लोकांना कळवण्याचे काम करीत होती. दिनांक ०१ ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजे १२.४०ला टिळकांची प्राणज्योत मालवली. तो दिवस होता आषाढ कृष्ण प्रतिपदा.
लोकमान्यांचे पार्थिव पलंगावरून उचलून खाली ठेवण्यात आले. पहाटेपर्यंत ही बातमी मुंबईत समजली. ताबडतोब नाटक/सिनेमे आदी मनोरंजनाचे कार्यक्रम स्थगित करण्यात आले. पहाटेपासूनच टिळकांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी लोटली होती. लक्षावधी लोक भक्तिभावाने टिळकांचे अखेरचे दर्शन घेत होते. दर्शन सुलभ व्हावे म्हणून त्यांचे शव चौरंगावर बसवून त्यांच्या अंगावर शालजोडी घालून, कपाळाला भस्म लावून, पुष्पहार घालून सरदारगृहाच्या गॅलरीत ठेवले होते. सकाळी क्रॉफर्ड मार्केटपासून धोबी तलाव पर्यंत माणसांची रीघ लागली होती. टिळकांचे अंत्यदर्शन घेतले नाही असा मनुष्य मुंबईत मिळणे कठीण होते. लोकांच्या इच्छेप्रमाणे भरवस्तीच्या भागातून किंचित लांबच्या मार्गाने स्मशानयात्रा काढायचा मार्ग पोलीस कमिशनर यांनी ठरवून दिला. इतका मोठे जनसमुदाय लोटला असतांना स्थानिक सोनापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणे शक्यच नव्हते म्हणूनच चौपाटीच्या वाळवंटात टिळकांच्या अंत्यसंस्काराला सरकारने परवानगी दिली. ही गोष्ट सुद्धा अपूर्वच होती. पुण्यात ही बातमी समजताच रेल्वे अधिकाऱ्यांनी एक स्पेशल ट्रेन पुण्याहून सोडली. दुपारी १.३० वाजता सरदारगृह येथून चौपाटीसाठी स्मशानयात्रा सुरु झाली. घराघरांच्या छपरावर टिळकांच्या पार्थिव देहावर पुष्पवृष्टी केली जात होती. त्यादिवशी पावसाचा विशेष जोर होता, पण त्यामुळे अंगावरच्या भिजलेल्या कपड्यांकडे कोणाचेच लक्ष नव्हते. अंत्ययात्रा मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. अंत्ययात्रेत समयोचित टाळ व भजने अखंड ऐकू येत होती. अंत्ययात्रेत गांधी, मौलाना शौकत अली, जवाहरलाल नेहरू, लाला लजपतराय इत्यादी नेते आळीपाळीने खांदा देत होते. चौपाटीवर पोहचल्यानंतर चंदन-काष्ठाचे सरण रचण्यात आले. सारे धार्मिक संस्कार झाले, प्रमुख पुढाऱ्यांची भाषणे झाली आणि संध्याकाळी सहा वाजता सूर्यास्ताला टिळकांच्या पार्थिव देहाला अग्नी देण्यात आला व कालांतराने त्याच जागी लोकमान्यांचा पुतळा उभारला गेला (स्वराज्य भूमी/ पूर्वीची गिरगाव चौपाटी).
दिनांक ०३ऑगस्टला मध्यरात्री तीन वाजता अस्थी घेऊन मुंबईहून मंडळी एका स्पेशल ट्रेनने पुण्यासाठी निघाली. सकाळी ७.३० वाजता टिळकांच्या अस्थींचे पुणे रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. स्पेशल गाडी पुणे स्टेशनवर येताच सर्व मंडळींनी टिळकांच्या नावाचा एकच जयघोष करून अस्थींना सलामी दिली. साधारण नऊ वाजता सकाळी पालखीतून टिळकांच्या अस्थींचा पुणे स्टेशन वरून गायकवाडवाड्यासाठी प्रवास सुरु झाला. मोठ्या चारचाकी रथावर पालखी ठेवली होती व त्यात ह्या पवित्र अस्थी लहानशा चंदनी नक्षीदार पेटीत ठेवल्या होत्या व फुलांच्या माळांनी पेटीला सजविण्यात आले होते. रथावर चढून पालखीमागे उभे राहून लोकमान्यांचे दोघे चिरंजीव पालखीवर चवऱ्या वारू लागले. पालखीवर मोठी रेशमी डेरेदार छत्री उभी केलेली होती. साधारण १.३० वाजता अस्थी गायकवाडवाड्यात पोहोचल्या. अस्थि-रथ पुणे स्टेशन पासून गायकवाडवाड्यात पोहोचण्यास सुमारे पाच तास लागले. वाड्यात इतकी गर्दी झाली की पाय ठेवण्यास सुद्धा जागा उरली नव्हती. बाहेरून आलेला अस्थी करंडक आत न्यायला सुद्धा वाव नव्हता. तो कसातरी आडबाजूने एका माडीवरून दुसऱ्या माडीवर नेण्यात आला. शेवटी लोकमान्य ज्या गॅलरीत खुर्ची टाकून नेहमी बसत, तेथे उभे राहून उंच हात करून अस्थी कलषाचे दर्शन सर्वांनी घेतले. पुढील काही दिवस अस्थींचे दर्शन घेण्यासाठी कलष जनतेसाठी उपलब्ध करण्यात आला होता. दिनांक ०८ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र प्रयाग किनारी त्रिवेणी संगमात टिळकांचे वडील चिरंजीव व धाकटे जावई यांनी विधिपूर्वक अस्थींचे विसर्जन केले. तो दिवस होता रविवार मिती आषाढ वद्य ९. अशा प्रकारे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नावाचे झंझावाती वादळ अखेरीस शांत झाले. एका पर्वाचा अस्त झाला. स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्यांनी सुचविलेल्या चतुःसूत्री म्हणजे – राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वदेशी आणि स्वराज्य यापैकी ‘बहिष्कार’ हे प्रमुख अस्त्र यापुढे इंग्रजांपुढे वापरून एका नवीन लढ्याला सुरवात होणार होती. आज लोकमान्यांनी देह ठेवून ९९ वर्ष पूर्ण होत आहे व शताब्दी पुण्यस्मरण वर्ष सुरु होत आहे, त्यानिमित्त सर्व टिळकभक्तांकडून लोकमान्यांना आणि त्याच्या अखंड कार्याला भावपूर्ण आदरांजली आणि सविनय वंदन.