धुळवड म्हणजे रंगांचा उत्सव… आपल्या एकसुरी आयुष्यात रंगांची उधळण करणारा हा सण आवडत नाही असे लोक अगदी मोजकेच असतील. एकमेकांबरोबरचे हेवेदावे, रुसवे-फुगवे आणि सगळ्या वाईट गोष्टी विसरून जाऊन विविध रंगांमध्ये मस्त न्हाऊन निघायला बहुतेकांना आवडतं. एरवी घर, ऑफिस, ताणतणाव यांमुळे तसं बोअरिंग झालेलं आयुष्य धुळवडीच्या रंगांनी मात्र मस्त रंगीबेरंगी होतं. आपल्या मित्र-मैत्रीणींबरोबर, जीवलगांबरोबर तुमचेही धुळवडीचे बेत ठरले असतीलच. पण असेही काहीजण आहेत ज्यांना धुळवडीचे रंग बघायला आवडतात, पण ते खेळायला, लावून घ्यायला मात्र आवडत नाही. तसंच आता आरोग्यासाठी म्हणून धुळवड जपून खेळणारेही अनेकजण आहेत. त्यांच्यासाठीही धुळवडीला रंगीबेरंगी होण्यासाठी मस्त पर्याय आहेत.
१. नैसर्गिक रंग- सध्या बाजारात जिकडेतिकडे केमिकल म्हणजे रासायनिक रंग दिसतात. हे रंग त्वचेसाठी अत्यंत धोकादायक असतात. डोळ्यांत गेले तर त्याचे डोळ्यावरही वाईट परिणाम होऊ शकतात. विशेषत: लहान मुलांसाठी तर हे रंग अगदीच वाईट आहेत. त्यावर पर्याय आहे तुम्ही घरच्याघरी नैसर्गिक गोष्टींपासून तयार केलेले नैसर्गिक रंग. अगदी रोजच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींमधून तुम्ही हे रंग तयार करू शकता. उदाहरणार्थ, हळद…हळद आपल्या त्वचेसाठी किती चांगली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. तसंच बीटापासून गुलाबी किंवा पालकापासून हिरवा रंग तयार करू शकता. हल्ली अनेक महिला व्यवसाय म्हणून असे नैसर्गिक रंग तयार करून देतात.
२. पाण्याविना धुळवड- खरं तर पाण्याविना धुळवड कशी खेळली जाऊ शकते? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. एकीकडे वाढत जाणारा उन्हाळा आणि दुसरीकडे वाढत जाणारी पाणीटंचाई… अशावेळेस तुम्ही पाण्याचा वापर न करता धुळवड खेळू शकता. म्हणजे कोरड्या रंगांनी धुळवड खेळू शकता. पाण्याचा कमीत कमी वापर करण्यासाठी फक्त नैसर्गिक कोरड्या रंगांनी धुळवड खेळण्याचा पर्याय उत्तम आहे. नैसर्गिक रंग लगेचच धुतले जातात.
३. फुलांची धुळवड- अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये हा पर्याय वापरला जातो. रंगांनी कपडे, डेस्क वगैरे खराब होतात. त्याऐवजी फुलांच्या पाकळ्या एकमेकांवर उधळून धुळवडीचा आनंद घेता येतो. तुमच्या घरी किंवा मित्र-मैत्रीणींसाठी याचं आयोजन करणार असाल तर झेंडू, शेवंती या फुलांच्या पाकळ्यांबरोबरच सुगंधी गुलाबाच्या पाकळ्या ठेवून धुळवड सुगंधीही करता येईल.
४. संगीतमय धुळवड- धुळवड आणि संगीत हे एक अतूट नातं आहे. धुळवडीच्या रंगात न्हाऊन निघताना सगळेच जण संगीताच्या तालावर थिरकत असतात. किंबहुना मुंबईत तर गल्लोगल्लीची धुळवडही संगीताशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पण तुम्हाला जर रंग खेळायला आवडत नसेल तर तुम्ही फक्त संगीतमय धुळवडीच्या पर्यायाचाही विचार करू शकता. बॉलीवूडमधली धुळवडीची गाजलेली गाणी तसंच लोकसंगीत लावून तुम्ही मस्त धमाल करू शकता किंवा खास धुळवडीनिमित्त असलेल्या म्युझिक कॉन्सर्टलाही हजेरी लावू शकता.
५. फुडी धुळवड- आपल्याकडे प्रत्येक सणाशी निगडीत काही विशेष खाद्यपदार्थ आहेत. रंग खेळून, नाचून झाल्यावर भूक तर लागतेच. त्यावेळेस काही ना काही चटकदार खातच असाल. पण रंग न खेळता तुम्ही रंगीबेरगी पदार्थांची मेजवानी करून ‘फुडी धुळवड’ करू शकता. थंडाई, गुजिया, मालपुवा या उत्तर भारतीय पदार्थांप्रमाणेच तुम्ही अस्सल मराठी वडापाव, मिसळपाव असेही पदार्थ ठेवू शकता. रंगीबेरंगी पदार्थ ठेवून तुम्ही तुमच्या धुळवडीची रंगत आणखी वाढवू शकता. यात अगदी स्टार्टर्सपासून ते गोड पदार्थांपर्यंत
विविधरंगी पदार्थ ठेवून मेजवानी करू शकता. कलरफूल पदार्थांची ही धुळवड फक्त डोळ्यांसाठीच नाही तर पोटासाठीही सुखावह असेल यात शंका नाही.
६. निसर्गाच्या सान्निध्यातील धुळवड- धळवडीला रंग खेळायला आवडत नसेल तर तुम्ही निसर्गाच्या रंगाची उधळण असलेल्या ठिकाणी जाऊ शकता. शांत समुद्रकिनारी आपल्या कुटुंब, मित्र-मैत्रीणींबरोबर मस्त सूर्योदय, सूर्यास्त बघत तुम्ही निसर्गाची विविध रुपं अनुभवू शकता. किंवा ट्रेकिंग आवडत असेल पर्वतरांगांमध्ये गिर्यारोहणासाठी जाऊ शकता. एखादी जंगल सफारी, थंड हवेच्या ठिकाणी जाऊन राहू शकता. गर्दी, गोंगाटात थांबायला आवडत नसेल तर अशा शांत ठिकाणी नक्की नैसर्गिक धुळवड साजरी करा.
७. सांस्कृतिक धुळवड- हल्ली अनेक ठिकाणी खास धुळवडीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. लोकसंगीत, पारंपरिक पदार्थ याबरोबरच धुळवडीच्या प्रथा, परंपरा सांगितल्या जातात. अशा ठिकाणी हजेरी लावू शकता.
८. चॅरिटी धुळवड- धुळवडीच्या निमित्ताने तुम्ही गरजू, निराधार मुलांसाठी काहीतरी करू शकता. त्यांच्यासाठी कपडे, खाणं, अभ्यासाचं साहित्य किंवा खेळणी असं काही देऊन त्यांच्या आयुष्यात रंग भरू शकता. किंवा वृध्दाश्रमात एकाकी असलेल्ये ज्येष्ठांच्या संगतीत काही क्षण घालवू शकता. त्यांच्यासाठी एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करू शकता.
तुमच्याही आयुष्यात धुळवडीच्या निमित्ताने विविध रंग भरले जावोत या शुभेच्छा!