लुडोच्या खेळात प्रत्येक खेळाडूला आपापल्या सोंगट्या पटाच्या मध्यभागी असलेल्या घरात सुखरूप पोहोचवायच्या असतात. प्रत्येक सोंगटीचा आपापल्या (लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या) रंगाचा, हक्काचा एक रस्ता असतो आणि त्या रस्त्यावर काही थांबे असतात. त्या थांब्यावर थांबलेले असताना आपल्या सोंगटीला कुणी इजा करू शकत नाही, मारू शकत नाही. प्रत्येक सोंगटीचा मार्ग जरी वेगळा असला तरी उद्देश एकच असतो. पैकी कुणी पटाच्या मध्यभागी असलेल्या घरात लवकर पोहचतं, कुणी उशिरा तर कुणी रस्त्यातच कुर्बान झाल्याने आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहचतच नाही.

पण कुठली सोंगटी कधी आणि किती घरे चालेल, कुठे रुतून बसेल, कशी मरेल हे मात्र ती सोंगटी ठरवू शकत नाही. ते ठरविण्याचं काम नियती किंवा नशीब नावाच्या फाश्याकडे (Dice) असते. एखाद्याने एका विशिष्ट मार्गाच्या, जीवन पद्धतीच्या किंवा उद्दिष्टाच्या केलेल्या निवडींवरून त्याला जोखू नये कारण यातल्या बऱ्याचशा निवडी ह्या परिस्थितीने आणि नियतीने त्याच्यावर थोपविलेल्या असू शकतात. आयुष्य जगताना आणि लुडो खेळताना नियतीचे फासे कसे पडतील काही सांगता येत नाही. पुढच्या क्षणी काय घडेल हेही सांगता येत नाही. म्हणूनच अनिश्चितता हाच स्थायीभाव असलेला लुडोचा खेळ खेळण्यात, आयुष्य जगण्यात आणि अनुराग बासूचा लुडो हा सिनेमा बघण्यात एक गम्मत आहे.

शांतपणे बसून विचार केल्यास (सिनेमा सुरु असताना असा शांतपणे विचार करण्यास अजिबात उसंत मिळत नाही, हेही तितकंच खरंय) या सिनेमात बऱ्याच प्रसंगात लॉजिक हरवलेलं किंवा त्याची सोयीस्कर मोडतोड केलेली दिसते पण मनोरंजनाचं मॅजिक मात्र हरेक फ्रेम भरून राहिलंय.

एका मोठ्या शहराच्या कॅनव्हासवर वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या, वरवर पाहता एकमेकांशी काही संबंध न दिसणाऱ्या चार समांतर कथा आणि अंतिमतः त्या कथांना एकत्र जोडणारा एक समान धागा अशा ‘लाईफ इन अ मेट्रो’ या सिनेमात यशस्वीपणे वापरलेल्या, रुळलेल्या वाटेवरूनच अनुराग बासूचा लुडो हा सिनेमादेखील जातो. मात्र ‘लाईफ इन अ मेट्रो’ पेक्षा वेगळी अशी लुडोला दिलेली हलकीफुलकी, अवखळ ट्रीटमेंट हे या सिनेमाचं वैशिष्ठय. सिनेमातला प्रसंग काहीही असो, कितीही गंभीर असो, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील स्माईल एक क्षणही मावळत नाही हे या सिनेमाचं यश.

एकीकडे सिनेमा आपल्या रोलरकोस्टर गतीने चालला असताना कर्म-धर्म, पाप-पुण्य स्वर्ग-नरक या संकल्पनांवर भाष्य करणारं निवेदन सिनेमाचा टोन न बिघडवता दोन प्रसंगाला जोडण्याचं आणि शेवटी सगळ्या कथानकांची सांगड घालण्याचं काम बखुबी निभावतं.

करायला गेलो एक आणि झालं भलतंच अशा विचित्र परिस्थितीत अडकलेली पात्रं, आणि त्यांच्या असहायतेतून निर्माण होणारा कारुण्यपूर्ण विनोद, तो विनोद कॅरी करणारे सक्षम कलाकार आणि हे सारं तरलपणे टिपणारा सिनेमॅटोग्राफर कम दिग्दर्शक अनुराग बासू अशी ही तुफान भट्टी जमून आली आहे.

पंकज त्रिपाठीचा मितभाषी, गोड हसणारा, हवाहवासा वाटणारा खुनी गँगस्टर हा या सिनेमाचा मध्यबिंदू आहे आणि अशा खूबसूरत नजाकतीने त्याने हा रोल केलाय की ज्याचं नाव ते! आपल्या भुवयांनी अभिनय करणारा संजीवकुमार, डोळ्यांनी बोलणारा इरफान खान आणि केवळ मुंडी वळवून विविध भाव लीलया दाखविणारा पंकज त्रिपाठी पाहणे इजे लव्ह!

एकेकाळी गँगस्टर सत्तूचा उजवा हात असलेला, सहा वर्षे कैद भोगून आलेला, आपल्याला सोडून गेलेल्या बायकोबद्दलच्या भावना केवळ नजरेने दाखवणारा नवरा, आपल्या छोट्या मुलीला भेटण्यासाठी हळवा, हतबल असलेला, रस्त्यात सापडलेल्या मुलीत आपली मुलगी पाहणारा एक बाप बिट्टू झालेल्या अभिषेक बच्चनने मस्त रंगवलाय. बिट्टूची व्यक्तिरेखा ही त्याच्या आजवरच्या उत्तम भूमिकांपैकी एक असेल.

शालेय जीवनापासून आपलं प्रेमपात्र असलेल्या पिंकीला मिथुन चक्रवर्ती आवडतो म्हणून सिनेमातील मिथुनसारखा बोलणारा, चालणारा, नाचणारा, वागणारा, आपल्या प्रेमाची कुर्बानी देणारा अलोक कुमार ज्या पद्धतीने राजकुमार रावने रंगवलाय ते लिहिण्या-सांगण्यासारखं नाही तर अनुभवण्यासारखंच आहे.

“ओ बेटा जी, अरे ओ बाबू जी किस्मत की हवा, कभी नरम कभी गरम” या अलबेला मधील गाण्याद्वारे आपला हलकाफुलका टोन सेट करत सुरु झालेला हा सिनेमा विविध पात्रे आणि विविध कथानकाचे तुकडे एकामागोमाग एक आपल्यासमोर मांडत मध्यंतरापर्यंत आपल्याला एका मनोरंजक वळणावर आणून ठेवतो. आणि नंतर एकेक पात्रांचे आणि कथानकाचे धागे जुळवत, हसतखेळत सिनेमाच्या शेवटाकडे आपल्याला एक जिगसॉ पझल सोडवल्याचं समाधान देतो.

लुडो एक जिंदगी है और जिंदगी एक लुडो है! गो फॉर इट!

 

Story img Loader