Lunar Eclipse 2023 : आज (शनिवार, २८ ऑक्टोबर) कोजागिरी पौर्णिमा आहे. तसेच या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहणही आज होणार आहे. नेहमी चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच होते आणि सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होते. याच्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. यामधील चंद्रग्रहण म्हणजे काय, ते पौर्णिमेलाच का होते, प्रत्येक पौर्णिमेच्या वेळी चंद्रग्रहण का नसते हे जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा चंद्र हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात. म्हणजे ज्या दिवशी सूर्य-पृथ्वी आणि चंद्र अशी स्थिती येते, त्या दिवशी पौर्णिमा असते. पृथ्वी आणि चंद्राच्या भ्रमणवेळेनुसार ही स्थिती साधारण १५ दिवसांनी येते. त्यानंतरच्या पंधरा दिवसांनी सूर्य-चंद्र आणि पृथ्वी अशी स्थिती येते. त्या दिवशी अमावस्या असते.

चंद्रग्रहण म्हणजे काय ?

ज्येष्ठ खगोल अभ्यासक सुहास नाईक-साटम यांनी सांगितल्यानुसार, वर्षामध्ये असणाऱ्या १२ पौर्णिमांपैकी १-२ पौर्णिमांना चंद्रग्रहण असू शकते. चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते. चंद्रग्रहण हे छायाकल्प, खंडग्रास किंवा खग्रास असते. पौर्णिमेच्या दिवशी जेथे जेथे आकाशात चंद्र असेल तेथे तेथे ते एकाच वेळी चंद्रग्रहण दिसते. आज कोजागिरीला होणारे चंद्रग्रहण भारतासहीत आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका,ऑस्ट्रेलिया खंडातील नागरिकांना दिसणार आहे.

चंद्रग्रहण कसे होते ?

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अशी स्थिती पौर्णिमेच्या दिवशी निर्माण होते. तेव्हा विशिष्ट अंशांमध्ये पृथ्वी आणि चंद्र असल्यास चंद्रग्रहण होते. त्यातही छायाकल्प, खंडग्रास आणि खग्रास असे भाग पडतात. साधारणतः चंद्र परिभ्रमण करत प्रथम उपछायेत येतो. त्यावेळी चंद्राचा प्रकाश कमी झालेला दिसतो. यालाच ग्रहणाचे वेध लागले असे म्हणतात. त्यानंतर चंद्र प्रछायेत म्हणजे दाट छायेत येतो तेव्हा चंद्राचा भाग झाकाळलेला दिसतो. हा काळ म्हणजे चंद्रग्रहण होय. कालांतराने चंद्र प्रछायेतून बाहेर पडतो व पुन्हा प्रकाशित होतो, तेव्हा ग्रहण सुटले असे म्हणतात. प्रछायेतून बाहेर येऊन चंद्र उपछायेत प्रवेश करतो. काही वेळाने जेव्हा चंद्र उपछायेतून बाहेर पडतो तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीसारखा प्रकाशमान होतो.

जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळी खग्रास चंद्रग्रहण होते. खग्रास चंद्रग्रहणात पृथ्वीच्या दाट सावलीमध्ये शिरल्याने चंद्रावर सूर्यप्रकाश पडत नाही. परिणामी चंद्र काळा दिसणे, अपेक्षित असते. मात्र असे घडत नाही. पृथ्वीने सूर्यकिरण अडवले तरी पृथ्वी भोवतालच्या वातावरणात शिरणारे किरण चंद्रापर्यंत पोहोचतात, त्यामुळे चंद्र तांबूस दिसतो. मुख्यत: वातावरणातील बदलांमुळे चंद्र काही वेळा पृथ्वीच्या छायेत असूनही चंद्राला ग्रहण लागले आहे की नाही, हे सहजी कळू नये इतका तो प्रकाशित दिसतो. खंडग्रास चंद्रग्रहणामध्ये चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळी खंडग्रास चंद्रग्रहण होते.

चंद्रग्रहण पौर्णिमेला का होते ?

चंद्रग्रहणासाठी आवश्यक असणारी स्थिती ही पौर्णिमेलाच असते. चंद्रग्रहण होण्याकरिता सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी असणे आवश्यक आहे. पृथ्वी आणि चंद्र हे स्वतः भोवती भ्रमण करत असतात. तसेच पृथ्वी सूर्याभोवती आणि चंद्र पृथ्वीभोवतीही फिरत असतो. त्यामुळे १५-१५ दिवसांनी सूर्य -पृथ्वी आणि चंद्र ही स्थिती पौर्णिमेला आणि सूर्य-चंद्र आणि पृथ्वी ही स्थिती अमावस्येला येते. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी किती अंशांमध्ये येते, यावर ग्रहण होणार की नाही, किंवा कोणते होणार हे ठरते. प्रत्येक पौर्णिमेला ग्रहण होत नाही. चंद्र पृथ्वीभोवती ज्या कक्षेत फिरतो, ती कक्षापातळी पृथ्वीच्या सूर्यभ्रमण कक्षेच्या पातळीशी सुमारे ५ अंशाचा कोन करते. त्यामुळे काही पौर्णिमांना चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या उत्तरेला, तर काही पौर्णिमांना चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या दक्षिणेला असतो. अर्थात, अशा स्थितीत तो पृथ्वीच्या सावलीच्या कक्षेत येत नाही. तेव्हा चंद्रग्रहण होत नाही. परंतु, एखाद्या पौर्णिमेला तो पृथ्वीच्या सावलीत येतो. तेव्हा चंद्रग्रहण संभवते.

एका वर्षात दोन्ही मिळून जास्तीत जास्त ७ ग्रहणे होतात. त्यात चंद्रग्रहणांची संख्या २ किंवा ३ असू शकते. १९३५ साली सूर्यग्रहणांची संख्या ५ होती, तर चंद्रग्रहणे २ झाली. ३ चंद्रग्रहणे आणि ४ सूर्यग्रहणे असे १९८२ साली झाले होते. लागोपाठच्या अमावास्येला सूर्यग्रहण होऊ शकते, परंतु लागोपाठच्या पौर्णिमांना चंद्रग्रहण होऊ शकत नाही. सूर्यग्रहण झालेच नाही असे वर्षच असू शकत नाही. परंतु चंद्रग्रहण झालेच नाही असे एखादे वर्ष असू शकते. अलीकडे १९९८ मध्ये चंद्रग्रहणच झाले नाही. सहा महिन्यांच्या अंतराने लागोपाठ चार वेळा चंद्रग्रहण होऊ शकते. २१ व्या शतकात १६ मे २००३, ९ नोव्हेंबर २००३, ४ मे २००४ आणि २८ ऑक्टोबर २००४ सहा-सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये चंद्रग्रहण झाले होते. साधारणतः असे दर ५६५ वर्षांनी होते.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lunar eclipse why lunar eclipse happens only on full moon night how does lunar eclipse happen vvk
Show comments