धवल कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चप्पल तुटली यल्लमा,
भाकरी करपली यल्लम्मा,
म्हैस मेली यल्लम्मा.

महाराष्ट्रातल्या सीमावर्ती भागामध्ये प्रचलित असलेली ही म्हण काहीसा बदल करून राजकारणातही लागू होते. महाराष्ट्रात होणाऱ्या कुठल्याही मोठ्या घडामोडी मागे असाच शरद पवारांचा अदृश्य हात असल्याचा बोलबाला बरेचदा केला जातो.

राजकारणात काहीही घडू शकते, ही उक्ती सिद्ध करून दाखवणाऱ्या घडामोडी गेल्या महिनाभरात घडल्या. या सगळ्या घडामोडींवरची अत्युच्च कडी म्हणजे आज भल्या पहाटे रद्द झालेली राष्ट्रपती राजवट व त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांचा शपथविधी.

गेल्या महिनाभर चाललेल्या सत्तानात्यांमध्ये भाजपाची भूमिका नेमकी काय, हे पक्षातले अनेक वरिष्ठ नेतेही सांगू शकत नव्हते. महाराष्ट्रासारख्या मोठ्या व श्रीमंत राज्यामध्ये सत्ता ही भाजपच्या हातून शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तथाकथित आघाडीकडे जात असताना केंद्रीय नेतृत्व शांत कसे बसू शकते, अशा बुचकळ्यात अनेक ज्येष्ठ नेते पडले होते. पण आज सकाळच्या नाट्यानंतर या नेत्याने एकच प्रतिक्रिया दिली “मोदी (और शहा) है तो मुमकिन है…”

या भाजपा नेत्याने असा दावा केला की, अजित पवारांचं हे तथाकथित बंड ते त्यांच्या पक्षातल्या सर्वोत्कृष्ट नेत्याच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही. अर्थात, यानंतर स्वतः शरद पवारांनी ट्विट करून अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही सांगितले. यावेळेला आठवण येते काही वर्षांपूर्वी कर्नाटकात घडलेल्या अशा सत्ता नाट्याची. आपले पुत्र व राजकीय उत्तराधिकारी एचडी कुमारस्वामी यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावर माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलर चे प्रमुख एच डी देवेगौडा यांनी असेच आपले हात झटकले होते.

पण, या घडलेल्या घटना मागे शरद पवारांचा अदृश्य हात कार्यरत होता असे गृहीत धरले तर त्यांनी एका दगडाने अनेक पक्षी मारले हे मान्य करावे लागेल. एक तर, शिवसेनेचे खच्चीकरण करण्यामागे भाजपचा जेवढे हीत आहे तेवढेच राष्ट्रवादीचेसुद्धा. शिवसेनेने लढवलेल्या एकूण 124 जागांपैकी त्यांची लढत राष्ट्रवादीसोबत 57 ठिकाणी होती हे विशेष. मराठवाडासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुख्य प्रतिस्पर्धी आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्याने जन्माला आलेल्या या घरओब्यामध्ये एक लक्षणीय गोष्ट अशी की त्या दोघांचे राजकीय आणि सामाजिक अवकाश वेगळे आहेत. उदाहरणार्थ, भाजपची खरी ताकद ही विदर्भात आहे, पण येथे राष्ट्रवादी म्हणजे अगदीच नगण्य. एका भाजपच्या मंत्र्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर 36 पैकी 35 गुण तर येथेच जुळून येतात.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य व देश पातळीवरच्या काही नेत्यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ED त्या चौकशा सुरू आहेत, हाही एक योगायोग नसावा. भाजपचे नेते असा दावा करतात की शिवसेनेला दगा देण्याचे प्लॅनिंग आधीच झाले होते. गेल्या महिन्याभरात सगळ्या घडामोडी घडत असतानासुद्धा दबक्या आवाजात भाजप व राष्ट्रवादीच्या होऊ घातलेल्या ‘अॅड्जेस्टमेंट’ अशी चर्चा होत होती. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानंतर शिवसेना गप्प राहणार नाही हे निश्चित. शिवसेनेचा जखमी वाघ नुसता गुरगुरणारच नाही तर राजकीय विरोधकांचा फडशा पाडायला आसुसलेला असेल.

एक मात्र नक्की. पवार नावाचा एक राजकीय ग्रह शिवसेनेच्या कुंडलीत फार आधीपासूनच बसला आहे. शरद पवार शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध, हे जग जाहीर होते. 1982 मध्ये विरोधी पक्षात असताना पवार, कामगार नेते दिवंगत जॉर्ज फर्नांडिस सेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर एकत्र आले होते. मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी घेतलेल्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या निर्णयाला शिवसेनेने विरोध केला व त्या भागात आपले हातपाय पसरले. त्याच वेळेला शरद पवारांनी सुद्धा आपली पुरोगामी अशी प्रतिमा उभी केली व दलित समाजातले अनेक नेते उदाहरणार्थ रामदास आठवले यांनासुद्धा आपल्या सोबत घेतले. दोघा पक्षांसाठी ही तशी win-win सिच्युएशन होती. 1986मध्ये शरद पवारांनी आपला काँग्रेस एस पक्ष मूळ काँग्रेसमध्ये विलीन केला. यानंतर काँग्रेसच्या मागे असलेला तरुण व त्या पक्षाची दुसरी फळी सैरभैर होऊन शिवसेनेकडे गेली. पण या राजकीय उडीमुळे पवारांना लगेच काही काळात मुख्यमंत्रिपद मिळाले हे विशेष.

2008 मध्ये सुद्धा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपापल्या मित्रपक्षांशी फारकत घेऊन म्हणजे काँग्रेस व भाजपशी युती करता येईल का, याची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने केली होती. पण अनेक कारणांमुळे हा विचार त्यांना सोडून द्यावा लागला होता.

आता पवार किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या नाट्यमय घडामोडींचा नवीन उदय झाला आहे. त्याचे पुढचे पान कसे लिहिले जाते हे काळच ठरवेल…