नितिन देसाई यांच्या आत्महत्येने चित्रपटसृष्टीला हादरा बसला आहे. कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ या ठिकाणी गळफास घेऊन घेऊन देसाईंनी आयुष्य संपवलं. ते अनेक महिने आर्थिक विवंचनेत असल्याचीही माहिती समोर येत आहे. एक मराठी कलादिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये देसाई यांचे नाणे खणखणीत वाजले होते.
मी पत्रकारिता क्षेत्रात असल्याने आणि त्यात राजकीय वार्तांकन करत असताना विविध राजकीय कार्यक्रमांनिमित्त मंत्रालय असेल किंवा अन्य ठिकाणी नितीन देसाई यांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा अनेकदा योग आला होता. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी असेल, रायगडावर शिवसोहळा आणि रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभी करण्याच्या निमित्ताने असेल किंवा मंत्रालयात विविध बैठकींच्या निमित्ताने असेल…त्यांच्याशी संवाद साधताना, गप्पा मारताना एक वेगळा आनंद मिळत असे.
मोठ्या बॅनरचे चित्रपट असतील किंवा भव्य कार्यक्रम असेल… यासाठी सेट कसे उभारले जातात? कसा त्यामागचा अभ्यास केला जातो? कमी वेळेत डोळ्याचे पारणे फिटेल अशी कलारचना कशी केली जाते? याचे सर्वसमान्यांप्रमाणे मलाही नेहमी अप्रूप वाटत असे. तेव्हा याबाबतचे प्रश्न मी त्यांना विचारत असे. तेव्हा असलेल्या थोड्या वेळेत कुठलेही आढेवेढे न घेता शक्य होईल तेवढी ती माहिती ते सांगण्याचा प्रयत्न करत. एवढी मोठी व्यक्ती आपल्याशी बोलत आहे याचा एक वेगळा आनंद मिळत असे.
एकदा त्यांचा प्रसिद्ध एन. डी. स्टुडिओ बघण्याचा योगही आला होता. या स्टुडिओबद्दल सर्वांप्रमाणे मलाही मोठी उस्तुकता होती. तिथे उभारलेले विविध सेट्स बघताना अक्षरशः थक्क व्हायला होत होतं. त्यावेळी त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी सांगितलेला एक किस्सा चांगलाच लक्षात राहिला आणि आत्ताच्या घटनेने त्याची पुन्हा आठवण झाली.
एन. डी. स्डुडिओ उभारण्याच्या आधी देसाई हे जेव्हा जागेची चाचपणी करत होते, तेव्हा तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देसाईंना गुजरातमध्ये स्टुडिओ उभारण्याची ऑफर दिली होती. पाहिजे तेवढी जमिनी आणि सुविधा देऊ केल्या होत्या. मात्र मुंबईत असलेल्या बॉलीवूडला-इंडस्ट्रीला दूर दुसऱ्या राज्यात स्टुडिओसाठी येणं हे अडचणीचं होईल असं त्यावेळी मोदींना सांगितल्याचं देसाई म्हणाले. पण त्यापेक्षा दुसरं कारण त्यांनी सांगितलं ते म्हणजे दुसऱ्या राज्यात स्टुडिओ उभारण्या ऐवजी आपल्या महाराष्ट्रातच स्टुडिओ असणं हे विशेष अभिमानास्पद. त्यामुळे महाराष्ट्रातच स्टुडिओच्या उभारणीला प्राधान्य दिल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं.
एका सच्च्या महाराष्ट्रप्रेमी व्यक्तीने मायभूमीतच स्टुडिओचे स्वप्न साकारणं पसंत केलं होतं.