आज संपूर्ण देशात स्त्री सशक्तीकरण, स्त्रियांना समान अधिकार व स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलले जाते. अनेक उपक्रमांद्वारे मुलींना शिक्षणाच्या आणि स्त्रियांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, याचा पाया महान समाजसुधारकांनी रचला. या महान समाजसुधारकांतील एक नाव आहे महर्षी धोंडो केशव कर्वे अर्थात अण्णासाहेब कर्वे. जेव्हा स्त्रीशिक्षणाचा नामोच्चार करणेही गुन्हा समजले जायचे, त्याच काळात अज्ञानाच्या अंधारात जीवन जगणार्या महिलांना मुक्त करण्याचे महान कार्य फुले दाम्पत्याने केले. स्त्रीशिक्षणाचे व्रत याच दृढ निष्ठेने महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुढे चालवले. आजच्याच दिवशी १९१६ साली त्यांनी पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेऊ या.
बालपण ते तारुण्यापर्यंतचा प्रवास
श्रेष्ठ समाजसेवक व स्त्रीशिक्षणाचे अग्रणी महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या हक्कांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. त्यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ साली रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी त्यांच्या आजोळी झाला. ते मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. कोकणातील दापोलीजवळील मुरूड हे त्यांचे मूळ गाव. त्यांना अण्णा या नावाने ओळखले जायचे.
हेही वाचा : पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडारातील चावीचे गूढ; रत्नभांडारात दडलंय तरी काय?
महर्षी कर्वेंना शिक्षणासाठी खूप पायपीट करावी लागली. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि गणित विषयात पदवी प्राप्त केली. मुंबईत शिक्षण घेत असताना आगरकरांच्या सुधारणावादी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. हाच तो काळ होता, ज्या काळात त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन आले.
सामाजिक प्रथांविरोधात बंड
१८९१ साली लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातील गणिताच्या प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महर्षी कर्वे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९१४ पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. १८९१ साली त्यांच्या सहचारिणी राधाबाई यांचे निधन झाले. त्या काळात लहान वयात मुलींची लग्ने केली जायची; परंतु दुर्दैवाने पतीचा मृत्यू झाल्यास मुलींना विधवा म्हणून आयुष्य घालवावे लागायचे. पुरुषांच्या बाबतीत मात्र तसे नव्हते.
विधुर पुरुषांनी कुमारिकेशी लग्न करण्याची प्रथा होती. परंतु, ही प्रथा महर्षी कर्वे यांनी मोडीत काढली आणि गोदूबाई नावाच्या विधवा महिलेशी पुनर्विवाह केला. विवाहानंतर ते पत्नीसह मुरूडला गेल्यानंतर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. अनेक ठिकाणांहून विरोध झाला; मात्र महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी लोकमत जागरणाचे कार्य सुरूच ठेवले आणि विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना केली.
एका झोपडीत मुलींची शाळा ते पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना
बालविवाह, केशवपन यांसारख्या प्रथांमध्ये अडकलेल्या स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी १८९६ साली अनाथ बालिकाश्रम आणि विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. महर्षी कर्वेंना स्त्रियांमधील निरक्षरतेबद्दल चिंता वाटू लागली. स्त्रियांनी सक्षम व्हावे हा उद्देश पुढे ठेवून त्यांनी १९०७ साली महाराष्ट्रातील पुण्याजवळ हिंगणे येथील माळरानावर मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा तेव्हा एका झोपडीत सुरू करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या स्थापनेची तयारी सुरू केली.
३ जून १९१६ रोजी महर्षी कर्वेंनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. परंतु, पाच विद्यार्थिनींचा पहिला वर्ग ५ जुलै १९१६ रोजी सुरू झाला आणि विद्यापीठाच्या खर्या कामाला सुरुवात झाली. महर्षी कर्वे यांच्या कामाने प्रभावित होऊन उद्योगपती विठ्ठलदास ठाकरसी यांनी विद्यापीठाला १५ लाखांचे अनुदान दिले. त्यानंतरच या विद्यापीठाचे नामकरण श्रीमती नाथीबाई दामोदर महिला विद्यापीठ (एसएनडीटी) असे करण्यात आले.
शिक्षणाचा प्रसार
महिला विद्यापीठासाठी अण्णासाहेब कर्वे यांनी मोठमोठ्या व्यक्तींकडून देणग्या मिळविल्या. इतकेच नव्हे, तर २२ देशांमध्ये जाऊन व्याख्याने देत त्यांनी विद्यापीठासाठी निधी गोळा केला. भारतीय स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे देशकार्य आहे, अशी त्यांची भावना होती. महर्षी कर्वे यांच्या कार्याची ख्याती संपूर्ण देशभरात पोहोचली. स्त्रिया, मुली व विधवा महिलांसाठी कार्य करण्याबरोबरच ते सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. १९४४ मध्ये जातिभेद व अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी समता संघाची स्थापना केली. महर्षी कर्वे यांचे महान कार्य लक्षात घेऊन १९५५ साली त्यांना सरकारने पद्मविभूषणद्वारे गौरविले. त्यांच्या कार्यासाठी अनेक विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. या पदवीने सन्मानित केले. पुणे येथे ९ नोव्हेंबर १९६२ साली वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
हेही वाचा : महिला पुरुषांपेक्षा जास्त जगतात, तरी महिलांमध्ये आजाराचे प्रमाण जास्त का? ‘लॅन्सेट’चा अहवाल काय सांगतो?
महर्षी कर्वे यांनी स्त्रीशिक्षणप्रसार हे आपले जीवित ध्येय मानले होते. महिला विद्यापीठाची स्थापना, स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य आणि त्यांची दूरदृष्टी यामुळे सहस्रावधी स्त्रियांच्या भवितव्याचा मार्ग खुला झाला. १९९६ मध्ये पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना करून महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी रोवलेल्या शिक्षणरूपी बीजाचा आज महावृक्ष झाला आहे. आज स्त्रिया शिक्षण क्षेत्रात आघाडीवर पोहोचल्या आहेत, ते केवळ महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या महान समाजसुधारकांमुळेच.