Happy Mahashivratri 2024 शिवपत्नी सतीची कथा ही भारतीयांना सर्वदूर माहीत असलेली अशी कथा आहे. यज्ञाच्या ठिकाणी आपल्या पतीचा खुद्द आपल्याच वडिलांनी- दक्षाने केलेला अपमान सहन न झाल्याने सतीने आत्मदहन केले होते. मग काय, एकच हाहा:कार उडाला; शिवपत्नीने पती सन्मानासाठी प्राणत्याग केला होता. आता पुढे काय, याची चिंता देवादिकांना लागून राहिली. व्हायचे तेच घडले आपल्या प्रियेने प्राणत्याग केला हे कळताच भोळा सांब सदाशिवाने रौद्र रूप धारण केले आणि काही क्षणात यज्ञवेदी नष्ट झाली. पत्नी सतीच्या आत्मदहनानंतर भगवान शिव हिमालयाच्या पर्वत रांगेतील एका गुहेत घोर तपश्चर्येत लीन झाले. तर दुसरीकडे तारकासुराने स्वर्गलोकीच्या देवतांना सळो की पळो करून सोडले. तारकासुराला शिव पुत्राच्याच हातून मृत्यूचे वरदान होते, तारकासुराच्या मते सती दहनानंतर शिवाला आलेल्या विरक्तीमुळे भगवान शिवांचा दुसरा विवाह होण्याची शक्यता नव्हती. शिवपुत्र जन्माला येण्याच्या धूसर शक्यतेमुळे तारकासुर माजला होता. आता आपल्याला अमरत्व प्राप्त झाले या आविर्भावातच त्याने स्वर्ग काबीज केला.
अधिक वाचा: Mahashivratri 2024: शिवशंकराची प्रेमाची व्याख्या!
पुन्हा जन्म; पुन्हा मिलन
दरम्यान, देवी सतीने राजा हिमालयाच्या पोटी पार्वतीच्या रूपात जन्म घेतला. परंतु भगवान शिव हे तपश्चर्येत इतके लीन होते की, त्यांना आपल्या प्राणसखीच्या येण्याची चाहूलही लागली नाही. असे असले तरी देवी पार्वती मात्र शिवाला पती प्राप्त करण्यासाठी साधना करत होती. परंतु, भगवान शिव मात्र काही केल्या डोळे उघडत नव्हते. त्यामुळे तारकासुराचा ताप वाढतच होता, याच सर्व परिस्थितीवर तोडगा म्हणून सर्व देवी- देवतांनी कामदेवाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. कामदेवाने आपला मदनबाण चालवून शंकराची तपश्चर्या भंग केली. परंतु अशा पद्धतीने तपश्चर्या भंग केल्यामुळे भगवान शिव मात्र क्रुद्ध झाले, त्यांनी बाण लागताक्षणी आपले तिसरे नेत्र उघडून कामदेवाला भस्मसात केले. वस्तुस्थिती समजल्यावर मात्र कामदेवाच्या पुनर्जन्माचा मार्गही भगवान शिवांनी मोकळा केला. त्यानंतर सती हीच पार्वती आहे, असे समजल्यावर शंकरानी विवाहाचा निर्णय घेतला.
वराहपुराणातील संदर्भ
वराहपुराणात शिव विवाहाविषयी एका रंजक कथेचा संदर्भ येतो, या कथेनुसार शिव शंकर तपश्चर्येतून बाहेर आल्यावर त्यांनी देवी पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले. यासाठी शिवाने एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले. हा ब्राह्मण पार्वतीकडे गेला, आणि भिक्षेसाठी याचना करू लागला. पार्वतीने त्याला नदीवर शुचिर्भूत होऊन येण्यास सांगितले, तिने स्वयंपाकाची तयारी केली. दरम्यान तिला त्या वृद्धाची मदतीची हाक कानावर आली, पार्वती नदीच्या दिशेने धावत गेली. पहाते तर मगरीने त्या वृद्धाला पकडले होते. तो वृद्ध पार्वतीकडे मदतीची याचना करत होता. तो तिच्याकडे तिचा हात मागत होता. परंतु पार्वतीच्या संकल्पानुसार ती तिचा हात भगवान शंकराशिवाय कोणाच्याच हातात देणार नव्हती. परिस्थिती गंभीर होती. वृद्धाचा जीव वाचवणे गरजेचे होते. वृद्ध ब्राह्मणाचा जीव वाचवण्याच्या हेतूने तिने त्या वृद्धाला हाताला धरून पाण्याबाहेर ओढले. पार्वतीच्या या परोपकारी स्वभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले. पुढे शिव आणि पार्वतीचा विवाह थाटात पार पडला. योगेश्वर महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह हा अद्भुत सोहळा होता. या सोहळ्याचे प्रकट स्वरूप कलेत दर्शविण्याचा मोह प्राचीन भारतीय कलाकारांनाही आवरता आला नाही. शिव-पार्वतीच्या या विवाह प्रसंगावरून प्राचीन भारतीय शिल्प आणि चित्रकलेत मदनांतकमूर्ती आणि दुसरी कल्याणसुंदरमूर्ती अशा दोन प्रतिमा घडविल्या गेल्या. शिव आगम ग्रंथामध्ये शिव-पार्वतीच्या विवाह सोहळ्याचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे.
अधिक वाचा: UPSC-MPSC : ‘तांडव’ हा नृत्य प्रकार नेमका काय आहे? भारतीय शिल्पकलेत त्याचे स्वरूप कसे असते?
भारतीय कलेतील शिव पार्वती विवाहाचे मूर्त स्वरूप
टी. गोपीनाथराव यांच्या ‘एलिमेंट्स ऑफ इंडियन आयकोनोग्रॉफी’ या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे उत्तरकारणागम, पूर्वकारणागम, शिल्परत्न, श्रीतत्त्वनिधी, अंशुमद्भेदागम या ग्रंथांमध्ये कल्याणसुंदर या शिल्पाच्या अंकानाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कल्याणसुंदर म्हणजे शुभ-विवाह. शिव पार्वतीच्या विवाहाच्या शिल्पांकनाचा उल्लेख कल्याणसुंदर असाच करण्यात येतो. हा विवाह सोहळा दैवी होता. त्यामुळे सहाजिकच शिल्पांकनातही इतर देवी- देवतांचा वावर आढळतो. आगम ग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे शिल्पपटाच्या मध्यवर्ती भागात शिव-पार्वतीचे अंकन करण्यात यावे. विष्णू हा पार्वतीच्या पित्याचा किंवा भावाच्या स्वरूपात असल्याने विष्णूचे आणि त्याच्या दोन भार्या लक्ष्मी आणि भू देवी यांचे अंकन महत्त्वाचे ठरते. विष्णू मध्यभागी तर त्याच्या भार्या पार्वतीच्या बाजूला दाखविण्यात येतात. विष्णूच्या हातात एक उदक पात्र दाखविण्यात येते. या उदकपात्रातील पाणी वधू -वराच्या हातावर सोडून पाणीग्रहणाचा विधी शिल्पात दाखविण्याचा प्रघात आहे. ब्रह्मदेव विवाहाचे पौरोहित्य करताना दाखवतात. याशिवाय विद्याधर, अष्टदिक्पाल, सिद्ध, यक्ष, ऋषी, गंधर्व, सप्तमातृका इत्यादी वराती या शिल्पांकनाचा महत्त्वाचा भाग आहे. या शिल्पपटात शिव हा चंद्रशेखर रूपात असून तो त्रिभंग मुद्रेत दाखवण्यात येतो. तर पार्वती ही वधू असल्याने तिचे शीर लज्जेने किंचितसे खाली झुकलेले असते.
मुंबईत शिवपार्वती विवाहाच्या शिल्पांकनाचे प्राचीन पुरावे
डॉ. गो. बं.देगलुरकरांनी ‘शिवमूर्तये नमः’ या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे शिवाच्या कल्याणसुंदरमूर्ती या इसवी सनाच्या सातव्या शतकानंतर आढळतात. महाराष्ट्रातील घारापुरी, वेरूळ येथे आढळणाऱ्या मूर्ती याच कालखंडातील आहेत. मुंबईत घारापुरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर येथे आढळणाऱ्या मूर्ती विशेष आहेत. घारापुरी येथील शिव-पार्वतीच्या विवाहपटात सलज्ज पार्वती मधोमध उभी असून शिवाच्या उजव्या बाजूला आहे. ती शिवाकडे पाहत आहे. तिचा उजवा हात शिवाने आपल्या उजव्या हातात धरला आहे. मूलतः हा पाणीग्रहणाचा विधी आहे. ब्रम्हदेव पुरोहिताच्या भूमिकेत असून होम करत आहे. पार्वती सालंकार असून नववधूच्या मोहक रूपात दाखवण्यात आली आहे. या शिल्पपटात हिमवान (हिमालय) पार्वतीचे वडील आणि आई मैनावती दाखवण्यात आले आहेत. शिवाच्या जटेवरील चंद्र या शिल्पात मानवी रूपात मागच्या बाजूला पार्वतीचा भाऊ म्हणून उभा आहे. विष्णू आपल्या दोन्ही हातात जलपात्र घेऊन कन्यादान करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे आगम ग्रंथांमध्ये नमूद न केलेली व्यक्ती हिमवान या शिल्पात दाखविण्यात आली आहे. ते येथे वडील या नात्याने पार्वतीला आधार देत आहेत. तर इतर देवता परिवार नवदांपत्याचे अभिष्टचिंतन करताना दिसत आहेत.
वेगळेपण जोपासणारे वेरूळ लेणीतील शिव-पार्वतीच्या विवाहाचे शिल्पांकन
वेरूळ मधील रामेश्वर लेणीमध्ये असलेला विवाह शिल्पपट हा चार भागात विभागलेला आहे. उजवीकडच्या भागात शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी पार्वती घोर तपश्चर्या करत आहे. तिच्या चहुबाजूनी अग्नी ज्वाळा दाखविल्या आहेत. तिच्या डोक्यावर तळपणारा सूर्य आहे. अशा स्वरूपाच्या साधनेला ‘पंचाग्नी साधना’ म्हणतात. पार्वतीच्या उजव्या हातात अक्षमाला आहे. तिच्याबरोबर तिची सोमप्रभा नावाची सेविका आहे. तर या अंकनाच्या बाजूलाच कमंडलू आणि एक साधू दाखविण्यात आला आहे. हा साधू त्याचा उजवा हात पुढे करून काहीतरी मागत आहे, वराह पुराणात नमूद केलेल्या कथेप्रमाणे तो कदाचित मदतीची याचना करत आहे. पुढच्या दृश्यात तो साधू कमळ असलेल्या तळ्यात उभा आहे, त्याचा पाय मगरीने पकडलेला आहे. डावीकडच्या भागात ब्रह्मदेव हिमवानाकडे पार्वतीसाठी शिवाचे स्थळ घेऊन आल्याचे दर्शवले आहे. तर मध्यवर्ती भागात शिव पार्वती विवाहाचे अंकन केलेले आहे.
अधिक वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक उल्लेख केलेल्या ऐतिहासिक चोल साम्राज्याचा इतिहास काय?
एकूणच भारताच्या वेगवेगळ्या भागात शिव पार्वतीच्या विवाहाचा प्रसंग मंदिरं, लेणींमध्ये शिल्पांकीत करण्यात आला आहे. दक्षिण भारतात या स्वरूपाच्या कांस्य मूर्तींचे पूजन केले जाते. तिरुवेंकाडू आणि चिदंबरम मंदिरात दरवर्षीं शिव-पार्वतीच्या मिलनाचा सोहळा याच कांस्यमूर्तीच्या पूजनातून साजरा केला जातो. या कांस्यमूर्ती वर्षातून एकदाच या सोहळ्यासाठी पूजल्या जातात. दक्षिण भारतात मनाजोगता जोडीदार मिळावा याकरिता शिवपार्वतीच्या विवाह मूर्तीचे पूजन केले जाते.