२००७ मध्ये, एका मित्राच्या सूचनेवरून जलदीप ठकार या तरुणाने गुजरात विद्यापीठाच्या (GV) दोन वर्षांच्या ग्रामशिल्पी कार्यक्रमात स्वतःची नोंदणी केली होती. ठकार याच्यासाठी, हा फक्त दोन वर्षांचा प्रयोग होता कारण त्यांच्याकडे अनेक आकर्षक नोकरीच्या ऑफर्स होत्या. पण गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील पेधामली गावात फक्त दोनच महिने काम केल्यानंतर, ठकार यांना लक्षात आले की, हे काम पूर्ण करण्यासाठी दोन जन्मही पुरेसे नाहीत. याच पार्श्वभूमीवर ग्रामशिल्पी कार्यक्रम नेमका काय आहे? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्रामशिल्पीचा मुख्य उद्देश

या प्रकल्पामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना खेड्याकडे नेणे हा होता. आपल्या विद्यार्थ्यांनी गावोगावी जाऊन शाश्वत विकासाची सुरुवात करावी अशी गुजरात विद्यापीठाची इच्छा होती. शेवटी, देशाच्या विकासाचे पहिले एकक म्हणजे गावच अशी त्यांची ठाम धारणा आहे.

ग्रामशिल्पी कार्यक्रमाची रूपरेखा

ग्रामशिल्पी प्रकल्प, नावाप्रमाणेच, महात्मा गांधींच्या स्वराज्य आणि ग्रामीण विकासाच्या कल्पनेवर आधारित आहे. गुजरात विद्यापीठाने २००७ मध्ये गावांच्या सामाजिक-आर्थिक विकासाच्या उद्देशाने या प्रकल्पाची सुरुवात केली. या कार्यक्रमाचे दोन महत्त्वाचे निकष हे होते, एक म्हणजे ग्रामशिल्पींनी आयुष्यभर त्यांच्या आवडीच्या गावात राहून काम करायचे, त्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटत राहावे आणि दुसरे म्हणजे सुरुवातीच्या दोन वर्षानंतर स्वतःहून उपजीविका शोधायची.

अधिक वाचा : इंग्रज ताजमहाल चोरून नेणार होते? इतिहासातील पुरावे काय सांगतात? 

नीलम गुप्ता या प्रसिद्ध पत्रकार आणि संशोधक आहेत. त्यांनी या प्रकल्पावर आधारित ‘गाव के राष्ट्रशिल्पकार’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात लेखिका नीलम गुप्ता यांनी प्रकल्पाची सुरुवात तसेच नऊ ग्राम शिल्पींच्या कष्टाच्या प्रवासाचे वर्णन केले आहे, जे या प्रकल्पाच्या पहिल्या तुकडीचा भाग होते आणि गेल्या १६ वर्षांपासून गावोगावी सेवा करत आहेत. या पुस्तकात नीलम गुप्ता यांच्याकडून त्या ग्रामशिल्पींच्या कार्याचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे; तसेच या ग्रामशिल्पींनी काम केलेल्या विविध जिल्ह्यांच्या आतापर्यंतच्या अज्ञात सामाजिक-आर्थिक परिस्थितीचे सविस्तर संकलन केले आहे.

कोण आहेत नीलम गुप्ता ?

नीलम गुप्ता या जनसत्ता या वृत्तपत्रात २८ वर्षे कार्यरत होत्या. आणि आता मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. गुप्ता या २०१६ ते २०२१ या दरम्यान अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या. याच काळात त्यांचा ग्रामशिल्पी प्रकल्पाशी जवळचा संबंध आला. त्यानंतर त्यांनी रीतसर या प्रकल्पावर संशोधन केले. विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू अरुण दवे, विश्वस्त मंडळाचे सदस्य सुदर्शन अय्यंगार आणि आनंद कृषी विद्यापीठातील फलोत्पादन विभागाचे प्राध्यापक राजेंद्र खिमानी यांच्या मदतीने या प्रकल्पाला कशी सुरुवात झाली याचे सविस्तर वर्णन नीलम गुप्ता यांनी आपल्या पुस्तकात केले आहे. नीलम गुप्ता यांनी २०१८ पासून या प्रकल्पावर संशोधन करण्यास सुरुवात केली. बहुतेक प्रकरणांमध्ये, गुप्ता यांनी भेट दिलेल्या जिल्ह्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती स्थापित करण्यासाठी विकास निर्देशकांसारखा कोणताही प्राथमिक डेटा नव्हता. म्हणून, त्यांनी स्वतःच हे संशोधन हाती घेतले. अनेक अहवाल आणि विदा चाळून ग्रामशिल्पींनी काम केलेल्या जिल्ह्याचे चित्र उभे केले.

महात्मा गांधी आणि ग्रामशिल्पी

१९२० मध्ये, गुजरात विदयापीठाच्या उद्घाटनाच्या भाषणात महात्मा गांधी म्हणाले होते, ‘गुजरात विद्यापीठाची स्थापना केवळ शिक्षणाच्या दृष्टिकोनातून नव्हे , तर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून झाली आहे. विद्यार्थ्यांना सशक्त आणि चारित्र्यभिमुख करण्यासाठी ही संस्था उभारत आहोत. विद्यार्थ्यांसह आम्ही जेवढे यश मिळवू ते भारताचे स्वराज्य सुनिश्चित करेल. इतर कोणत्याही प्रकारे स्वराज्य स्थापन होऊ शकत नाही, असे त्यांनी त्या भाषणात म्हटले होते. ही दृष्टी ग्रामशिल्पी कार्यक्रमाच्या भावनेला मूर्त स्वरूप देणारी ठरली.

अधिक वाचा : विश्लेषण: प्राणी का ठरतात मानवी वासनेचे बळी? काय आहे झूफिलिया आणि बेस्टीयालीटी?

ग्रामशिल्पी अभ्यासक्रम

ग्रामशिल्पींना पर्यावरण शिक्षण केंद्राद्वारे (CEE) दोन वर्षांसाठी प्रशिक्षित केले जाते; जिथे त्यांना क्षमता आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रकल्प व्यवस्थापन, प्रस्ताव लेखन, एनजीओ व्यवस्थापन, दळणवळण, संगणक मूलतत्त्वे, शाश्वत शेती, उपजीविकेच्या शक्यता, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण हे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. प्रशिक्षणानंतर, ते काम करण्यासाठी गाव निवडू शकतात. विद्यापीठ त्यांना दोन वर्षांसाठी अनुदान देते. त्यानंतर, त्यांनी स्थानिक समाजाच्या मदतीने आपली उपजीविका शोधायची असते.

काही ग्रामशिल्पींविषयी

गुप्ता यांच्या पुस्तकात या कार्यक्रमाच्या २००७ च्या तुकडीतील नऊ ग्राम शिल्पींचे जीवन रेखाटले आहे. गुप्ता यांनी प्रत्येक ग्रामशिल्पीचा सूक्ष्म अभ्यास केला आहे. त्या ग्रामशिल्पींनी घेतलेल्या पुढाकारांचे परिणाम सूचीबद्ध करतात आणि सुधारणेसाठी क्षेत्रे देखील दर्शवितात. उत्तर गुजरातमधील जलदीप ठकार आणि दशरथ धर्मा वाघेला, अशोक चौधरी, घनश्याम राणा, जेत्सी राठोड, गौतम चौधरी, नीलम पटेल, दक्षिण गुजरातमध्ये मोहन महला आणि उत्तर प्रदेशमध्ये काम करणारे राधाकृष्ण शर्मा हे ते ग्रामशिल्पी आहेत.

जलदीप ठकार अधिकाधिक मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करू शकले आणि बालविवाहापासून अनेकांना परावृत्त करू शकले. गावातील महिला एकमेकांना आर्थिक मदत करू शकतील अशा महिला बचत गटाची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी गावात एक दुग्धव्यवसाय सुरू करण्यास मदत केली, ज्यामुळे महिलांचा सामाजिक-आर्थिक स्तर उंचावला. त्याचप्रमाणे, इतर ग्रामशिल्प्यांनी मुलांसाठी बँक उघडणे, ग्राम वाचनालय सुरू करणे, सॅनिटरी युनिटचे वितरण करणे आणि सेंद्रिय शेती, शाश्वत उपजीविका आणि निवासी शाळा यासह इतर उपक्रमांवर काम केले. एकूणात या प्रकल्पाचे आरेखन गांधींजींच्या कल्पनेतून साकारले आहे आणि ग्रामीण विकासाचा वेगळा प्रयत्न देशात आकारास आला आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma gandhis idea of swarajya and rural development is reflected in the gramshilpi programme which organizes by gujarat university svs