सॅबी परेरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलाकृती सादर करण्याचे जितके प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारांत “आई” या विषयावर सर्वात जास्त गोष्टी लिहिल्या, बोलल्या, रंगविल्या आणि सादर केल्या गेल्या आहेत. मात्र वडील आणि मुलांचं नातं हे वास्तवाप्रमाणेच कलाकृतींतही बऱ्याचदा अव्यक्तच राहिलेलं आहे. बहुतेक सर्व घरांत, बाप हा घरातील लहान पोरांना भीती दाखविण्यासाठी वापरली जाणारी व्यक्ती असल्याने मुलांचं बापाशी फारसं ट्युनिंग जमलेलं नसते. लहान आणि पौगंडावस्थेतील मुलांच्या लेखी बाप हा संतापलेला, मारकुंडा, विक्षिप्त आणि आपल्यावर विश्वास न ठेवणारा माणूस असतो.

बऱ्याचदा, मुलगा स्वतः बाप होईपर्यंत त्याला आपल्या बापाचं बापपण कळत नाही आणि कधीकधी तर बाप गेल्यावरच त्याच्या मुलांना आपल्या बापाची महती जाणवते. या पार्श्वभूमीवर येत्या शुक्रवारी (२५ ऑगस्ट) थिएटरमधे रिलीज होत असलेला “बाप ल्योक” नावाचा मराठी सिनेमा हा एक सुखद आणि आनंददायक अनुभव आहे.

आणखी वाचा : बेहद्द प्रेमाच्या गोष्टी.. 

“बाप ल्योक” हा मकरंद माने यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट असून यात विठ्ठल काळे आणि शशांक शेंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आपल्या आई-वडिलांसोबत गावात राहून शेतकरी म्हणून काम करण्यासाठी सागर हा तरुण आपली पुण्यातील नोकरी सोडून गावी आलेला आहे. शेजारच्या गावातील तरुणीशी त्याचे लग्न ठरले आहे. एकमेकांशी विळ्या-भोपळ्याचे सख्य असलेले, कुठल्याही कारणाने आणि बऱ्याचदा विनाकारण एकमेकांशी भांडणारे सागर आणि त्याचे वडील (तात्या) त्यांच्या दूरच्या नातेवाईकांना त्याच्या लग्नासाठी आमंत्रित करण्यासाठी निघाले आहेत.

या प्रवासातील त्यांचे परस्परांविषयीचे रुसवे-फुगवे, एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढणे, चिडवणे, कधी प्रवास एन्जॉय करणे तर कधी प्रवासातील अडचणींबद्दल एकमेकांना जबाबदार धरणे, कधी एक-दुसऱ्याला त्रास देणे तर कधी काळजीने कासावीस होणे. . . . एकंदरीत मुलाने बापाला आणि बापाने मुलाला जाणण्याचा हा शारीरिक आणि मानसिक प्रवास, त्यांच्या दुचाकीसोबतच कधी खड्ड्यांतून, चिखलातून अडखळत जातो, कधी हिरव्यागार माळरानावर प्रसन्न हवेत, उत्तम रस्त्यांवरून सुखैनेव होतो, कधी इतरांना आधार देतो, कधी गाडीसोबत पंक्चर होतो आणि शेवटी मात्र सुखाच्या गंतव्य स्थानावर पोहोचतो.

आणखी वाचा : स्वातंत्र्याच्या उंबऱ्यावरील सिनेमाची ‘ज्युबिली’

सागर झालेला विठ्ठल काळे आणि तात्यांच्या भूमिकेतील शशांक शेंडे यांनी आपापल्या भूमिका अगदी नैसर्गिकरित्या वठविल्या आहेत. इतर सहकलाकारांनी देखील त्यांना तितकीच तोलामोलाची साथ दिलेली आहे. संगमेश्वर परिसरातील सुंदर छायाचित्रण, विषय गंभीर असला तरी सिनेमाची हलकीफुलकी मांडणी अधोरेखित करणारं कर्णमधुर पार्श्वसंगीत आणि विशेषतः दोन्ही गाणी उत्तम जमून आली आहेत. गुरु ठाकूरने लिहिलेलं ” घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप रं, लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं” हे बापाची महती सांगणारं गाणं तर खासच झालं आहे. आजवर सिनेमात आलेल्या बापांवरील गाण्यांत या गीताचा नंबर अगदी वरचा लागेल.

फारसे काही ट्विस्ट, टर्न्स नसणारा, उपदेशाचे डोस न पाजता, कथेच्या ओघात बापाची महती सांगणारा, हसता-हसता डोळ्याच्या कडा ओलावणारा हा सिनेमा थिएटर मधे जाऊन पाहावा असाच आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makarand mane nagraj manule bap lyok marathi movie releases critic review nrp
Show comments