मणिपूरमधला अविरत संघर्ष पाहून राज्यातला एक तरुण अस्वस्थ झाला. केवळ बोलत बसण्याऐवजी त्याने तिथे जाऊन कृती करण्याचा निर्णय घेतला. ही माणसं आपली आहेत, मणिपूरमध्ये जे घडतंय ते देशभरात कुठेही घडू शकतं हे जाणून या युवकाने मणिपूरमध्ये आरोग्य सेवा दिली. युमेत्ता फाउंडेशनच्या माध्यमातून मैतेई आणि कुकी अशा दोन्ही समाजातील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य पाठवायचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. शिबिरातील युवकांना छोट्या-मोठ्या आजारांबद्दल माहिती देऊन त्यांच्याकडे एक छोटेखानी औषधाचे किट पाठवलं जात आहे. मधुमेह आणि उच्चरक्तदाब झालेल्या रुग्णांना तीन तीन चार महिन्यांचे औषध पाठवलं जात आहे आणि समुपदेशनासाठी मानसोपचार तज्ञांची तुकडी पाठवण्यात येणार आहे. अन्नधान्याची टंचाई आहे तिथे अन्नधान्य पोहोचवण्याची व्यवस्था सुरू आहे. त्याने अनुभवलेलं मणिपूर त्याच्याच शब्दात.

मणिपूरमधल्या हिंसाचाराला तीन महिने होत आले आहेत आणि सामान्य लोकांना यामुळे सर्वाधिक फटका बसला. आज मणिपूरमध्ये 200 हून अधिक मदत शिबीरं आहेत. पन्नास हजार पर्यंत स्थलांतरित लोक आश्रय घेत आहेत. हे शिबिर शाळेच्या आवारात किंवा समाज मंदिरात किंवा बाजारा मधल्या ठिकाणी बसवलेले आहेत. पाण्याची, सांडपाण्याची, नीट सोय नाही. सुरुवातीला जवळपासच्या लोकांनी या स्थलांतरित लोकांना मदत केली. तेथील राज्यसरकार सरकार खूप कमी शिबिरांमध्ये प्रत्यक्ष मदत करत आहे. ती मदत सुद्धा मैतेई भागात आहे. कुकी लोकांच्या पर्वतीय भागात सरकारद्वारे पाहिजे तितकी मदत पाठवली जात नाहीये. तिथल्या शिबिरांमध्ये समाज बांधव काही स्वयंसेवी संस्था स्थलांतरित लोकांना मदत करत आहेत. मागील तीन महिन्यांपासून इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहेत त्याच्यामुळे एटीएम सेवा आणि ऑनलाइन बँकिंगही धड सुरू नाही.

Asen Me Nasen Me Review
असेन मी नसेन मी!
penguin parade on phillip island in australia
मोहक शिस्तबद्धतेची ‘पेंग्विन्स परेड’…
jyachi tyachi love story review by sabby parera
ज्याची त्याची लव्ह स्टोरी!
thiruchitrambalam romantic comedy drama film
थिरुचित्रंबलम
Navratri 2024: Jijabai
Navratri 2024: जिजामातेच्या जन्मकथेचा संबंध रेणुकादेवीशी कसा जोडला गेला; ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?
Mithun Chakraborty, Dadasaheb Phalke Award,
डिस्को डान्सर…
Hungry Ghost festival
भारतातील पितृपक्षासारखी संस्कृती जगात इतर ठिकाणी कुठे सापडते?
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची अवस्था अश्वत्थाम्यासारखी झाली आहे का?
dombivali dahihandi celebration
सण..संस्कृती आणि पुढची पिढी!

अन्नधान्याची टंचाई आहे. पालेभाज्या नावालासुद्धा दिसत नाहीयेत. डाळ भात हेच रोजचं अन्न आहे. पौष्टिक-सकस काही मिळत नाहीये. हिंसाचारामुळे दळणवळण ठप्प झालं आहे. त्यामुळे बाजारपेठात अन्नधान्य नाहीये. किंमती खूप वाढलेल्या आहेत. यामुळे कुपोषण वाढू शकतं.

लोकांना अचानक घरदार सोडून पळून यावं लागलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रं नाहीत. कोण किती शिकले याचे कागदी प्रमाण नाही. स्थलांतरित लोकांसमोर मोठा पेच आहे. इथून परत जायचे की इथल्या कुठल्या शाळेत मुलांना दाखल करायचं हा प्रश्न आहे. शाळेला पण प्रश्न पडला आहे की या मुलांना कोणत्या वर्गात टाकायचे. इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाण्याची भीती आहे.

अनेक लोकांच्या नोकऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. या स्थलांतरांमुळे आता पुढचे अनेक दिवस ते आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाऊ शकणार नाही. मुख्य व्यवसाय शेतीच आहे. परंतु स्थलांतरित लोकांना आता शेती करता येणार नाही आणि यावर्षी त्यांच्या हातात काहीच पैसा येणार नाही. वारंवार होत असलेले हिंसाचार, बंद, जाळपोळ, यामुळे बाजारपेठेवर सुद्धा परिणाम झाला आहे. बऱ्याच सामानाची आवक मणिपूरमध्ये कमी झालेली असल्यामुळे किमती प्रचंड वाढलेल्या आहेत.

अनेक स्थलांतरित कुटुंबं लहानशा जागेत दाटीवाटीने एकत्र राहत आहेत. प्रसाधनगृहं पुरेशी नसल्यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. मुलांचे लसीकरण योग्य पद्धतीने होत नाहीयेत. या शिबिरांमध्ये असलेल्या गरोदर माता शिबिरांमध्येच प्रसूत होत आहेत. कोणीही गंभीर आजारी झाल्यास मोठ्या दवाखान्यात नेणे कठीण आहे. विशेष करून कुकी समुदायाचे लोक इंफाळमध्ये उपचारासाठी येऊ शकत नाहीत. त्यांना काही गंभीर आजार झाल्यास नागालँड किंवा मिझोरमला जाऊन उपचार घ्यावा लागतो आहे. ज्या लोकांना डायबिटीस, ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांची औषधं उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांच्या आजारपणात वाढ होऊ शकते. पोषक आहाराच्या अभावी शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होऊ शकते आणि कुपोषण वाढू शकते. त्वचेचे आजार, मानसिक आजार या वातावरणात वाढू शकतात.

अनेक लोकांचे जवळचे लोक मारले गेले आहेत, त्यांचे घर त्यांच्या डोळ्यादेखत जाळलं गेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात प्रचंड भीती, राग, असुरक्षितता भरलेली आहे. शिबिरांमध्ये सुद्धा सतत याच गोष्टी चर्चिल्या जात आहेत. त्यामुळे दुसऱ्या समुदायाबद्दल प्रचंड राग आणि स्वतःवर किंवा स्वतःच्या समुदायावर झालेल्या हिंसेमुळे निराशा या भावना आहेत. तरुण मुलं – मुली यांनी तर हिंसेचे उत्तर म्हणून शस्त्र हाती घेतलेले आहे आणि दोन्ही समुदायातील हे तरुण मुलं-मुली आपल्या गावाभोवती बंकर बनवून गावाचे रक्षण करण्यासाठी हत्यारबंद फिरत आहेत. मुलांचे शिक्षण थांबलं आहे आणि या छोट्याशा शिबिरांमध्ये खेळण्यासाठी जागा सुद्धा नाही. त्यामुळे या मोठ्या मुलांच्या सोबतीला येऊन ही मुलं सुद्धा शस्त्र हाती घेऊ शकतात. ड्रग्ज , शास्त्र, शिक्षण बंद आणि मनातील असंतोष यामुळे पुढच्या काही वर्षात मणिपूरमध्ये दहशतवादी कारवाया आणि हिंसाचार प्रचंड वाढू शकतो. या मुलांना आणि तरुणांना या सभोवतालच्या हिंसेच्या वातावरणातून बाहेर काढले नाही तर त्यांच्या मनाचा उद्रेक हिंसेच्या मार्गाने होईल आणि अशा पद्धतीने हा प्रश्न वाढतच जाईल .

मणिपूर हे ईशान्येकडचं राज्य. पूर्वेकडे म्यानमार, पश्चिमेकडे आसामचा सिल्चर प्रांत, उत्तरेकडे नागालँड आणि दक्षिणेकडे मिझोराम अशी भौगोलिक रचना. मणिपूरची लोकसंख्या ३०-३२ लाखाच्या घरात आहे. भौगोलिक दृष्ट्या मणिपूर सपाट प्रदेशाच्या भूभागाचे इंफाळ आणि त्याशेजारील काही प्रदेश (१०%) आणि इतर पर्वतीय क्षेत्र(९०%) यामध्ये विभागले गेले आहे. ३०-४०% लोकसंख्या इंफाळ आणि जवळच्या पठारातील भूभागात वास्तव्यास आहे. मणिपूरमध्ये मैतेई, कुकी, नागा, मुस्लिम , बौद्ध, इत्यादी समुदायातील अनेक जनजाती वास्तव्यास आहेत. संख्येच्या दृष्टीने मैतेई समुदायाची माणसं इंफाळ आणि त्याभोवतालच्या भागात वास्तव्यास आहेत आणि त्यांची लोकसंख्या जवळपास १०-१२ लाखांच्या घरात आहे. तर कुकी लोक डोंगराळ भागात राहतात आणि त्यांची लोकसंख्या सुद्धा ७-८ लाखांच्या घरात आहे. तिथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे. सोबतच फलोत्पादन आणि रानावनातील उपज यावरही अनेक लोकांची उपजीविका चालते. इंफाळ आणि जवळच्या परिसरात मैतेई ही बोलीभाषा वापरली जाते तर बाकी अनेक ठिकाणी त्या त्या जनजातीप्रमाणे त्यांच्या वेगवेगळ्या भाषा वापरल्या जातात.

हिंसाचाराची पार्श्वभूमी
अनेक वर्षापासून मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सलोख्याचे वातावरण होते. या दोन समुदायातील मुला-मुलींमध्ये लग्न होण्याचे प्रमाण सुद्धा कमी नाही. परंतु काही वर्षापासून काही अंतर्गत गोष्टीमुळे या दोन समुदायांमध्ये दुरावा वाढत चाललेला आहे. कुकी लोकांची अनेक वर्षांपासूनची ही तक्रार आहे की विकास कामासाठी आलेला 90 ते 95 टक्के निधी हा इंफाळ आणि त्या अवतीभवतीच्या पठारी भागांमध्ये खर्च करण्यात येतो आणि 90% पर्वतीय भागांसाठी फक्त ५ – १० % टक्के निधी विकास कामांसाठी खर्च करण्यात येतो. त्यामुळे पर्वतीय भागात आताही दळणवळणासाठी चांगले रस्ते नाहीत. तिथल्या शिक्षण संस्था किंवा शाळा चांगल्या नाहीत आणि सोबतच आरोग्यासाठी मुबलक यंत्रणा उपलब्ध नाहीत. मणिपूरची सीमा म्यानमारला लागून आहे. मैतेई लोकांची ही तक्रार आहे की कुकी लोक हे मूळ भारतातील लोक नाहीत. दीडशे दोनशे वर्षांपूर्वी म्यानमारमधून मणिपूरला आलेले स्थलांतरित आहेत. सोबतच त्यांची ही पण तक्रार आहे की आता सुद्धा म्यानमारमधील कुकी लोक मणिपूरमध्ये खोट्या पद्धतीने येऊन स्थानांतरित होत आहेत. मणिपूरमध्ये खूप लोक ड्रग्जमुळे व्यसनाधीन होतात. मैतेई समुदायाचा हा सुद्धा आरोप आहे की पर्वतीय क्षेत्रामध्ये कुकी लोकांद्वारे अफूची शेती केली जाते आणि म्यानमारमध्ये ती पाठवण्यात येते. म्यानमारमधून हे ड्रग्ज मणिपूरमध्ये परत येते आणि याद्वारे लोक व्यसनाधीन होत आहेत. पण वास्तविक पाहता ड्रग्ज विकणारे लोक दोन्ही समुदायातील आहेत. कुकी लोक अनुसूचित जनजातींमध्ये येत असल्यामुळे मैतेई लोक त्यांच्या जमीन विकत घेऊ शकत नाही. परंतु कुकी लोक इंफाळ आणि विष्णुपूर भागांमध्ये माहिती लोकांची जमीन विकत घेऊ शकतात. या सर्व कारणांमुळे गेल्या काही वर्षात मणिपूरमध्ये असंतॊष होता. दोन्ही समुदायातील काही लोकांची भूमिगत आतंकवादी समुदायाशी लोकांशी जवळीक होती.

हिंसाचाराची सुरुवात आणि पुढील वाटचाल
मैतेई समुदाय शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या बऱ्याच इतर जनजातीच्या तुलनेत खूप पुढारलेला आहे. शैक्षणिक, शासकीय आणि इतर जागेमध्ये सुद्धा मैतेई लोक लोक जास्त आहे. या राज्यात नवीन सरकार निवडून आणतेवेळी सर्वांची मदत घेतली गेली. पण सत्तेवर आल्यापासून कुकी भागांवर कारवाई सुरू झाली होती. सोबतच तिथल्या मैतेई समुदायाच्या 40 विधायकांनी निवेदन सादर केले की मैतेई समुदायाला अनुसूचित जनजातीमध्ये सामील करावे. मणिपूरच्या उच्च न्यायालयाने मैतेई समुदायाला अनुसूचित जनजातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्याचा निकाल दिला. तेव्हा मणिपूर मधील अनेक अनुसूचित जनजातीच्या समुदायाद्वारे निषेध व्यक्त केला गेला आणि त्या विरोधात सर्व अनुसूचित जनजातीतील विद्यार्थ्यांद्वारे 3 मे रोजी चुरचांदपूर येथे मोर्चा काढला गेला. या मोर्च्यानंतर जाळपोळ सुरु झाली. मैतेई समुदायातर्फे इंफाळ आणि बिष्णुपूर भागातून कुकी समुदायातील लोकांवर हल्ले सुरू झाले. 24 तासांच्या आत इंफाळ वरून तीस ते चाळीस हजार कुकी लोक जीव मुठीत घेऊन पळाले. त्यांच्या घराची, सामानाची, दुकानांची तोडफोड केली गेली आणि याची प्रतिक्रिया म्हणून कुकी भागातून सुद्धा सर्व मैतेई समुदायातील लोकांना निघून जायची तंबी देण्यात आली आणि काही ठिकाणी त्यांच्या घराची आणि सामानांचीसुद्धा जाळपोळ करण्यात आली. मैतेई आणि कुकी दोन्हीकडच्या गटांकडून एकमेकांवर सशस्त्र हल्ले सुरू झाले. तीनशे चारशे लोकांच्या सशस्त्र समुदायाकडून एखाद्या गावात हल्ले करून तिथल्या लोकांची हत्या करणे, जाळपोळ करणे, अशा पद्धतीचा हिंसाचार सुरू झाला. लोक अंगावरच्या कपड्यानिशी गाव सोडून पळाले. आणि तीन मे पासून हा हिंसाचार वाढतच गेला.

काय करता येईल?
लोक शस्त्रागार लुटून शस्त्रांसह हल्ले करत आहेत. मी स्वतः या दोन्ही भागात जाऊन या शिबिरांमध्ये आरोग्य सेवा देऊन आलो. तिथल्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं काय करता येईल याबाबत थोडा विचार केला. या विषयाला ठीक करायचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे दोन्ही गटाकडून हिंसाचार थांबवणे. दोन्ही गटांमध्ये अनेक लोक असे आहेत की जे मानतात की मैत्री , एकमेकांबद्दलचा विश्वास आणि शांततामय मार्गाने ही समस्या सोडवली जाऊ शकते. हिंसेने हा प्रश्न सुटणारा नाही. आताही मैतेई आणि कुकी समुदायाचे अनेक लोक एकमेकांना मदत करत आहेत. भावाभावाप्रमाणे आजपर्यंत राहिलेले असल्यामुळे आताही ते आशा करत आहेत की हा हिंसाचार थांबावा आणि मणिपूरचे जनजीवन पूर्वपदावर यावे. या घडीला राजकीय आणि सामाजिक संघटनांद्वारे मणिपूरमध्ये या दोन्ही समुदायातील महत्त्वाच्या लोकांना एकत्र आणून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि एकमेकांबद्दल विश्वास निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे लागेल. तोपर्यंत जे स्थलांतरित लोक आहेत त्यांच्यासाठी मानवतावादी दृष्टीकोनातून मदत करावी लागेल. यामध्ये त्यांच्या अन्नधान्याची तजवीज करणे त्यांच्यासाठी योग्य औषध उपचारांची शिबिरांमध्येच व्यवस्था करणे त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची तजवीज करणे आणि काही दिवसांकरिता त्यांच्या निवाऱ्याची आणि हंगामी कामाची उपलब्धता करणे, या गोष्टी कराव्या लागतील. भावनिक आणि मानसिकरित्या या हिंसाचाराचे आघात अनेकांच्या मनावर झालेले आहेत. त्यामुळे विशेष समुपदेशनाद्वारे त्यांना मदत करता येईल. लहान मुलांना, तरुणांना , इतर लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने, शिक्षणाद्वारे, खेळाद्वारे गुंतवून ठेवावे लागेल, जेणेकरून ते हिंसेपासून परावृत्त होऊ शकतील. वयोवृद्ध लोक, आजारी लोक, गर्भवती महिला, अर्भक, लहान मुलं, तरुण, यांच्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागेल.

-डॉ. प्रियदर्श तुरे 

(लेखातली मतं लेखकाची वैयक्तिक आहेत.)

Story img Loader