धवल कुलकर्णी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अनेक वर्तुळं पूर्ण होताना दिसत आहेत. म्हणजे कधीकाळी “वसंत सेना” “सदा शिवसेना” या नावांनी हिणवलेल्या शिवसेनेची काँग्रेससोबत कदाचित होऊ घातलेलं संभाव्य सरकार. असंच एक दुसरं अजब वर्तुळही पूर्ण होत आहे. ते म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दिलेल्या पाठींब्‍याने.

1966 मध्ये शिवसेनेचा जन्म झाल्यानंतर पक्षावर सातत्याने आरोप करण्यात आला, की सेनेने काँग्रेसच्या सांगण्यावरून कम्युनिस्टांच्या अधिपत्याखाली असलेली डावी चळवळ पद्धतशीरपणे मोडून काढली. शिवसेनेची तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि मुंबई काँग्रेसचे अनभिषिक्त सम्राट असलेले स.का. पाटील म्हणजेच सदाशिव कानोजी पाटील, यांच्या सोबत असलेल्या जवळीकीमुळे सेनेला वसंत सेना किंवा सदा शिवसेना नावाने हिणवले जात.

शिवसेनेच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये पक्षाने फक्त दोन गोष्टींबाबत वैचारिक सातत्य ठेवले. एक म्हणजे मराठी माणसाचा कैवार आणि दुसरं म्हणजे टोकाचा कम्युनिस्ट विरोध. 1968 मध्ये भारतीय कामगार सेनेच्या स्थापनेनंतर डाव्यांच्या कामगार संघटनांनी पुकारलेले संप मोडीत काढण्यात आले. 1970 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे परळचे आमदार व शिवसेनेला रस्त्यावर उतरून तोडीस तोड उत्तर देऊ शकणारे कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा खून करण्यात आला. त्याचे खापर फुटले ते शिवसेनेवर. नंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचे वामनराव महाडिक हे विधानसभेत निवडून गेले. हळूहळू परळ लालबाग भायखळा शिवडी या गिरणगाव पट्ट्यात डौलानं फडकणारा लालबावटा खाली उतरून तिथे शिवसेनेचा भगवा फडकला. अर्थात यामागे कारणं अनेक असली तरीपण ती पण या लेखाच्या संकल्पनेच्या पलीकडची आहेत.

पण, कालगती पहा. शिवसेनेने भाजप सोबत काडीमोड घेतल्यानंतर, त्यांच्या सरकार स्थापनेच्या डावाला पाठिंबा दिला आहे तो चक्क मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने. एकेकाळी पूर्ण राज्यभर जाळं असलेल्या सीपीआयएमचा प्रभाव आज फक्त काही भागांमध्ये आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, जिथून पक्षाचे मावळत्या विधानसभेतील आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित यांचा धक्कादायक पराभव झाला.

आदिवासी शेतकर्‍यांनी व शेतमजुरांनी काढलेल्या व देशभर गाजलेल्या नाशिक ते मुंबई लाँग मार्चचे कॉम्रेड गावित एक प्रणेते होते, हे विशेष. एकेकाळी विधानसभेतील कष्टकऱ्यांची मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळख असलेल्या नरसय्या आडम मास्तर यांना पुन्हा एकदा सोलापूरमध्ये मतदारसंघातून पराभवाची धूळ चाखावी लागली. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विधानसभेतील अस्तित्व टिकवून ठेवले ते त्यांच्या डहाणू मतदारसंघातून निवडून आलेल्या विनोद निकोले या तरुण आमदाराने. डहाणू तलासरी पट्ट्यात एकेकाळी शोषित पीडित आदिवासींचं संघटन करून त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम कॉम्रेड गोदावरी व शामराव परुळेकर यांनी केलं होतं.

महाराष्ट्रासह देशातही डाव्यांचे अनेक गड ढासळत असताना कम्युनिस्टांची या भागातली पकड अगदी चिरेबंदी आहे. आता झालेल्या निवडणुकीत एकेकाळी वडा-पाव विकणारे व फक्त 52 हजार रुपये इतकी संपत्ती असणारे 48 वर्षाचे विनोद निकोले हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. विधानसभेतील सर्वात गरीब आमदार असा “बहुमान” मिळवणाऱ्या निकोले यांनी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीला आपला पाठिंबा दिला आहे.

याबाबत विचारले असता, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय समितीचे सदस्य कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे यांनी असे सांगितले की, हा पाठिंबा देण्यामागे पक्षाची भूमिका भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची आहे. “भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठिंब्याने देशभर फोफावलेला एक ‘फेनॉमेनन’ आहे. त्याउलट शिवसेनेचा व्याप फक्त महाराष्ट्रापुरता आहे,” असे ढवळे म्हणाले.

विश्वासदर्शक ठरावावर मतदान होईल, त्यावेळेला पक्षाचे आमदार हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात मतदान करतील. “हे संधीसाधू सरकार जावं अशी आमची भूमिका आहे… भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी जे करावा लागेल. ते आम्ही करू. आमच्या मते भाजपा म्हणजे शिवसेनेपेक्षा अधिक मोठे पाप आहे,” असे ढवळे म्हणाले. शिवसेना भाजपापासून वेगळी होतेय ही चांगली गोष्ट आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण असावं. भाजपावाले सर्वांना फसवतात. ते मित्रांनाही फसवतात. हे आता त्यांना कळलं असावं, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Story img Loader