दिलीप ठाकूर
अगोदर सुमीत राघवन, आता सुबोध भावे…. उद्या आणखीन कोणी, असाच भूमिकेबाहेर येणार आणि रंगमंचावरुन मायबाप रसिकांना आवाहन करणार, अगोदर तो मोबाईल बंद ठेवा आणि आम्हाला शांतपणे भूमिका साकारू द्या. सुबोध भावेने तर ‘नाटकंच सोडायचे’ म्हटलं, यावरून त्याचा रंगमंचावर असताना प्रेक्षकांतील मोबाईल रिंगने कसा हिरमोड होतो, याची कल्पना येतेय. अर्थात, असं काही घडलं की, चर्चेला सुरुवात होतेच. नवे वा जुने गुद्दे- मुद्दे चघळले जातात. नाट्यगृहात शिरतानाच प्रेक्षकांचे मोबाईल तिकीट क्रमांकनुसार जमा करावेत यापासून ते सायलेन्सवर ठेवण्याचा प्रेक्षकांना आग्रह धरायचा असे बरेच सल्ले/ अपेक्षा पुढे येतात. पण प्रेक्षकांमध्ये असलेल्या डॉक्टरांना मात्र सुविधा द्यावी, त्यांना कोणत्याही क्षणी फोन येण्याची शक्यता असते अशीही एक अडचण पुढे आली. कोणी म्हटलं वरिष्ठ नागरिकांना मोबाईल सायलेन्टवर ठेवणे अथवा काही काळापुरता बंद ठेवणे म्हणजे नेमके काय हे माहित नसते, म्हणून अशा गोष्टी घडतात आणि सर्वांचेच नुकसान होते असा मुद्दा उपस्थित केला.
आजच्या ग्लोबल युगात मोबाईल फोन जणू अनेकांच्या शरीर/भावना/स्वभाव यांचा भाग झालाय. वय वर्षे अवघ्या पाच सहापासून सत्तरची ऐंशीपर्यंत सगळेच मोबाईलमय झालेत. त्यात वयानुसार तो वापरायचा कसा हे मात्र बदलते ही वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी ‘कौन बनेगा करोडपती ‘मध्ये अमिताभ बच्चनने यावरच भाष्य करीत म्हटले की, आजच्या ग्लोबल युगातील मुले मल्टीपल अॅक्टीव्ह आहेत. एकाच वेळेस त्यांना अनेक गोष्टी करणे शक्य होते. एकिकडे ते समोरच्या टीव्हीवर काही पाहत असतानाच त्यांचे आपल्या हातातील मोबाईलवरही चांगले लक्ष असते. दोन्हीतील एक बदलायला सांगा, ते लगेचच डिस्टर्ब होतात. बीग बीने एक प्रकारे बदलत्या सामाजिक बदलाची यातून जाणीव करून दिली. तो सूर तसा वेगळा. पण नाटकच काय पण चित्रपट पाहत असतानाही एक तर मोबाईल बंद ठेवावा अथवा सायलेन्टवर ठेवावा. त्यातही आला तरी तो तेव्हाच अटेन्ड न करता मध्यंतरात अथवा शो संपल्यावर कॉलबॅक करावा ही अगदी कोणीही न सांगताही करता येण्याजोगी गोष्ट आहे. त्याने नाटकही व्यवस्थित रंगेल. पलिकडची व्यक्ती कितीही महत्वाची असली तरी तास दीड तासाने कॉलबॅक करणे म्हणजे अगदीच त्या व्यक्तीला कमी लेखणे नाही. इतकेच नव्हे तर, केवळ नाटक अथवा चित्रपट पाहिला जात असल्याने आपला फोन अटेन्ड केला नव्हता इतका समजूतदारपणा समाजात यायलाच हवा. चित्रपट रंगात आला असतानाच आपल्यालाही फोन घ्यावासा वाटत नाही आणि त्यातही आपण जरा वेळ जरी बोललो तरी इतर प्रेक्षकांना त्रास होतोच. नाट्यगृहात तर तोच त्रास रंगमंचावरील कलाकाराला होणे स्वाभाविक आहे. तेथे कलाकार आपल्या अभिनय आणि संवादाच्या माध्यमातून नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहचवत असतो, अशातच त्याला मोबाईल रिंग झालेच पण अगदी प्रेक्षकांनी पॉपकॉर्न, वेफर्स, आईसक्रीम खाण्याचाही त्रास होत असतो. सिनेमाच्या वेळीही खूपच आत्मियतेने पडद्याशी एकरुप झालेल्या रसिकांना आजूबाजूच्या खाण्यापिण्याच्या आवाजाचा, बिसलरी पाण्याच्या बाटलीचा त्रास होतो. पण मल्टीप्लेक्समध्ये बरेचसे प्रेक्षक महागडा पॉपकॉर्न अथवा कॉम्बो एन्जॉय करायलाच येतात आणि जमलचं तर अधूनमधून पडद्यावर पाहतात, याची अस्सल सिनेमाप्रेमींना कल्पना असल्याने ते या ‘खादाडी संस्कृती’ला गृहीत धरूनच फिल्म पाहतात.
पूर्वी लहान बाळ नाटक अथवा चित्रपटात एक प्रकारचे विघ्न आणे. पडद्यावरच्या नटाना बाळाच्या रडण्याचा त्रास होणे शक्य नसले तरी आजूबाजूच्या प्रेक्षकांमधून सूर उमटे, त्याला बाहेर न्या. तरी एकादी आजी मधल्या पॅसेजमधे नातवाला धोपटत झोपवायचा प्रयत्न करत चित्रपटही पाह्यची. नाट्यगृहात असे खाली बसणे शोभणारे नाही हे बहुधा गृहीतच धरले असावे. म्हणून मग बाहेर घेऊन यावे लागे. त्या काळात अनेक नाटकांना ‘दोन अडीच वर्षाखालील मुलांना’ प्रवेशच नसे. अशी दाम्पत्ये मग घरातील वरिष्ठांकडे मुलं सोपवत. एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे असे अनेक होते. चित्रपटाच्या बाबतीत चार वर्षाखालील मुलांना तिकीट नसे. त्यामुळे पालक आपल्या मुलांना घेऊनच येत. शिवाय त्या काळात सहकुटुंब सहपरिवार चित्रपट पाहायची संस्कृतीच होती. अशातच मुलं कधीही रडू शकत होते. दक्षिण मुंबईतील नाझ चित्रपटगृहात ( आता ते बंद) यावर चांगला उपाय होता. तेथे एका बाजूला काचेचे क्राय रुम होते. रडत असलेल्या मुलाला घेऊन त्याची आई तेथे जाऊन बसे. त्यामुळे तिचेही चित्रपट पाहणे होई आणि मुलाचेही रडून होई. ( आता बेबी सिटींगमध्ये मुलाना ठेवता येते). अशा पध्दतीने नाट्यगृहात ‘काचेची खोली ‘ उपलब्ध करून मोबाईलवर बोलणारे आपले कर्तव्य बजावतील आणि कलाकारही आपली भूमिका चोख वठवतील. पण नाटक रंगात असतातच सायलेन्सवरचा मोबाईल कानाला लावून एखाद्या प्रेक्षकांने उठून जाणेही रसभंग करणारे आहे. नाट्यगृहात कलाकार थेट प्रेक्षकांशी जोडला गेलेला असतो. आणि प्रेक्षकही व्हॉटसअॅपवर नजर नसेल तर नाटकात रमलेला असतो, अशातच रिंग वाजल्याने कोणत्याही कलाकाराला डिस्टर्बन्स येणे स्वाभाविकच आहे. कदाचित, एकाद्या विनोदी नाटकात अशा वेळी ‘योग्य टायमिंग साधून’ विनोद करताही येईल. पण सामाजिक अथवा गंभीर नाटकात असा व्यत्यय विनोदाने घेता येत नाही. सगळेच प्रेक्षक तिकीट काढूनच नाटक पाहायला आलेले असतात, त्यांनी ‘नाटक पाहण्याचे पैसे दिलेत, तर नाटकच पहावे, एक तर मध्यंतर आणि शेवट झाल्याशिवाय मोबाईलशी नाते जोडूच नये’. ज्या वरिष्ठ नागरिकांना मोबाईल बंद करता येत नाही त्यांनी आपली अडचण तिकीट तपासनीसाकडून दूर करून घेऊ शकतात.
भविष्यात, मोबाईलवर बोलता बोलता, सोशल मिडियात अॅक्टीव्ह राहत राहत आनंदाने पाहता येईल असेही एकादे विनोदी नाटक रंगभूमीवर आलंच तर आश्चर्य नको. फार पूर्वी पहाटेपर्यंत चालणारी संगीत नाटके होती, खुल्या नाट्यगृहात कडाक्याची थंडी सहन करुन त्याचा आस्वाद घेतला जाई, आता काळ बराच पुढे सरकला, आता मोबाईल हाती ठेवून पाहता येईल असेही एखादे नाटक रंगभूमीवर आणण्याचे प्रयत्न केला जाऊ शकतो. पूर्वी तालुक्यातील रंगमंचावर नाटक रंगात असतानाच वीजपुरवठा खंडित होई, ग्रामीण भागात तर शाळेच्या सभागृहात नाट्य प्रयोग साकारताना माईकची दुरावस्था असे. मध्येच आवाज लहान मोठा होऊन व्यत्यय येई. पावसाळ्यात तर गळकी नाट्यगृहे अनेक ठिकाणची समस्या असे. या प्रकारचे अडथळे/आव्हाने स्वीकारत अथवा बाजूला सारत सारत नाटकाचे प्रयोग रंगत येथपर्यंत आले आणि प्रेक्षकांतील एखाद्या प्रेक्षकाची मोबाईल रिंग वाजू लागलीय…