दिलीप ठाकूर
“मराठी प्रेक्षकांना आवाहन करत मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव यांनी मुंबई आणि पुणे येथे रसिकांना ‘मन फकिरा ‘ पाहण्यासाठी चित्रपटगृहाकडे यायचे आवाहन करत झळकावले फलक ” हे वृत्त एव्हाना तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचलयं. आणि त्यासह तुमच्या मनात अनेक गोष्टी/प्रश्न/आठवणी आल्या असतीलही आणि ते अगदी स्वाभाविक आहे. ते होताना मराठी चित्रपटावरील प्रेमातूनच ते आले असेल.
कोणाच्या मनात आले असेल, ‘सैराट ‘नंतर कोणता बरे मराठी चित्रपट पाहायला आपण मल्टीप्लेक्समध्ये गेलो?…. आणि काशिनाथ घाणेकर, ठाकरे, गुलाब जाम, नाळ, न्यूड, फर्जंद, फत्तेशिकस्त, हिरकणी, खारी बिस्कीट असे काही मोजकेच चित्रपट आपण मल्टीप्लेक्समध्ये जाऊन पाहिले. इतर अनेक मराठी चित्रपट एकाद्या उपग्रह वाहिनीवर येणारच आहेत याची खात्री होती आणि झालेही तसेच…
कोणाच्या मनात आले असेल की, आजच्या हिंदी चित्रपटात जबरदस्त कन्टेट पाहायला मिळतोय तर मग मराठी चित्रपटासाठी फार वेळ द्यायची गरजच काय? मराठीत ‘न्यूटन ‘, ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक, सुपर 30, आर्टिकल 15, गली बॉय, राझी, छपाक असे चित्रपट कधी पाहायला मिळणार?
कोणी म्हणेल, उत्तम आशयघन थीम हीच मराठी चित्रपटाचा स्टार आहे, पण तसे चित्रपट मराठीत आज कमी बनताहेत आणि हुकमी क्राउड पुलर असा मराठीत कोणी स्टारच नाही. पूर्वी दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे तरी होते. त्यांचा मराठी चित्रपट कधी बरे येतोय याची वाट पाहिली जाई. दादा कोंडके यांच्या चित्रपटासमोर तर हिंदीवालेही आपला चित्रपट रिलीज करण्याचे धाडस करीत नसे.
तर कोणी म्हणेल, उगाच मराठी चित्रपटाला कमी लेखू नका. आज जगभरातीलअनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट सहभागी होतोय, आपले अस्तित्व अधोरेखित करतोय, आज इंग्रजी मिडियातही मराठीतील वेगळ्या जॉनरच्या चित्रपटांची दखल घेतोय तर मग केवळ या ‘रसिकांना चित्रपटगृहाकडे यायचे आवाहन केले ‘ या वृत्ताने कमी लेखू नका. तर कोणी याच वृत्तावर थेट प्रतिक्रिया देताना स्पष्टपणे म्हणेल, अरेरे मराठी कलाकारांवर ही वेळ आली?
मुंबईत विलेपार्ले आणि अंधेरी तसेच पुणे येथील गुडलक हॉटेलजवळ, डेक्कन जिमखाना येथे अभिनेत्री व दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव या कलाकारांनी हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरत जेव्हा रसिकांना चित्रपटगृहाकडे यायचे आवाहन केले, तेव्हा अर्थातच सर्वांच्याच भुवया उंचावल्या. पण ही गोष्ट ‘फक्त एका बातमीपुरती ‘ नाही. खरं तर असे करावेसे का वाटले हे जास्त महत्वाचे आहे. यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांत प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात फक्त ‘प्रवास’ हाच चित्रपट चित्रपटगृहात तग धरू शकला. इतर चित्रपटांपैकी बहुचर्चित ‘धुरळा’ची गर्दी ओसरली याचे आश्चर्य वाटते. ‘चोरीचा मामला’चे सोशल मिडियात भरपूर कौतुक झाले पण अशाने थिएटरवर ‘हाऊसफुल्ल’चा फलक लागला नाही. अनेक तरी मराठी चित्रपट ‘पहिल्या आणि एकमेव आठवड्यात ‘ मल्टीप्लेक्समधून उतरल्याचे दिसेल.
ओम राऊत दिग्दर्शित बहुचर्चित ‘तान्हाजी ‘च्या खणखणीत यशाने मराठी चित्रपटाला फटका बसल्याचा निष्कर्ष अगदीच चुकीचा नाही. मराठी रसिकांनीही मराठीपेक्षा हिंदी ‘तान्हाजी ‘ पाहण्यास विशेष रस घेतल्याने त्याला भरभरून यश मिळाले.
एकूणच परिस्थिती पाहता, मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये यायला हवे, त्याचे सातत्य ठेवायला हवे अशी अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही. पण त्याच वेळेस याच गोष्टीला ‘दुसरी ( की दुखरी?) बाजू ‘देखिल आहे आणि तिच आपण अनेकदा विचारात घेत नाही. खरं तर आजच्या मराठी चित्रपटसृष्टीला काही स्पष्ट अथवा वास्तव स्वीकारावेसे वाटत नाही असे वाटतेय.
पूर्वी प्रसार माध्यमात फक्त वृत्तपत्रे/साप्ताहिके/मासिके होती तरी मराठी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचायचा. आज डिजिटल युगात चोवीस तास प्रसिद्धी वाहतेय तरी त्याचा प्रभाव का नाही? प्रसिद्धीच्या ‘आयडियाच्या कल्पना’ बदलायला हव्यात का? चित्रपट प्रसिद्धीचा ‘फोकस’ तर चुकत नाही ना? ‘मी वसंतराव ‘ या मराठी चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरचे अनावरण झाकीर हुसेन यांच्या हस्ते झाले हे त्या चित्रपटाच्या थीमनुसार झाले आणि या चित्रपटाची एक प्रतिमा एस्टॅब्लिज झाली. असे प्रत्येक चित्रपटाबाबत शक्य नसले तरी काही चित्रपटांबाबत नक्कीच उपयुक्त ठरेल. चित्रपटाच्या थीमनुसार त्याचे नाव, पोस्टर असते तसाच पब्लिसिटीचाही फोकस असावा हे वेगळे सांगायला नकोच. पण तसे न होता आपण ‘पब्लिसिटीचे बजेट वाढवले ‘ याकडे बोट दाखवतोय. पिक्चर दिलसे बनती है, पैसे से नही हे जुन्या फिल्मवाल्यांचे तत्व आजच्या व्यावहारिक जगात हास्यास्पद वाटेल, पण तेच सर्वकालीन सत्य आहे. चित्रपट निर्मिती आत्मियतेनेच व्हायला हवी.
पूर्वी मराठी चित्रपटाच्या निर्मितीची संख्या कमी असल्याने एकाच शुक्रवारी तीन अथवा चार पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता ( की भीती?) नव्हतीच. पण तेव्हा अनेक निर्मात्यांना मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा तर झालेच पण अगदी बार्शी, इचलकरंजी येथे मराठी चित्रपटाचे हुकमी थिएटर कोणते आहे, त्याचे भाडे किती, प्रेक्षकसंख्या किती, आठवड्याचे कलेक्शन किती, आपल्या स्पर्धेत कोणता हिंदी चित्रपट आहे हे सगळे माहित असे. आणि त्यानुसार तो आखणी करायचा. अगदी आम्हा सिनेपत्रकारांच्या प्रिव्ह्यू शोलाही तेव्हाचा निर्माता आणि दिग्दर्शक कोणत्या वृत्तपत्राचा प्रतिनिधी आला आहे, त्याची समिक्षा कोणत्या दिवशी प्रसिद्ध होते हे जाणून असे. इतकेच नव्हे तर तो आपल्या चित्रपटावरची टीकाही तो खिलाडूवृत्तीने घेई. आजच्या किती निर्माता आणि दिग्दर्शकांना आपला चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या थिएटरबद्दल माहिती असते? मराठी चित्रपटांची हुकमी अशी थिएटर आहेत तेथे आपल्या चित्रपटाचे थिएटर डेकोरेशन कसे आहे याची कल्पना असते का? पूर्वी जेथे मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा साधा विचारही केला जात नसे अशा अनेक ठिकाणी आज मराठी चित्रपट प्रदर्शित होताना दिसतोय. अगदी इंग्रजी चित्रपटाच्या थिएटरमध्येही मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत, अशाने फक्त आणि फक्त शोची संख्या वाढतेय, पण थिएटरमध्ये जेमतेम मोजकेच प्रेक्षक असतात. एक ठरवा, शो वाढवून हवेत की प्रेक्षक ? याच मराठी प्रेक्षकांनी ऊन/पाऊस/थंडी/ महागाई/ टंचाई यांची पर्वा न करता अनेक वर्षे मराठी चित्रपटांवर भरभरून प्रेम केले, आपला मराठी चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे याचा त्याला कायमच अभिमान वाटला, आनंद झाला. फार पूर्वी मराठी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या फारसा प्रगत नव्हता, पण त्या दोषांकडे मराठी चित्रपट रसिकांनी दुर्लक्ष केले. मराठी कलाकारांना आपल्याच कुटुंबातील एक मानले. पूर्वी मराठी चित्रपटाचे प्रीमियर हे गिरगावातील सेन्ट्रल सिनेमा ( ‘वजीर’ इत्यादी चित्रपटाचे झाले), मध्य मुंबईतील भारतमाता ( चांदोबा चांदोबा भागलास का, वगैरे ), दादरच्या नक्षत्र अर्थात कोहिनूर थिएटर ( शाब्बास सूनबाई, इत्यादी ), प्लाझा ( अशीही बनवाबनवी वगैरे अनेक मराठी चित्रपट) होताना याच थिएटरबाहेर चाहत्यांची भारी गर्दी असे, आपले आवडते मराठी स्टार्स पाहायला मराठी मन आतूर असे.
आज मराठी चित्रपटाच्या प्रीमियरला ग्लॅमर नक्कीच आहे पण जनसामान्यांचे प्रेम लाभतेय का? मल्टीप्लेक्सचे युग आहे हे मान्य, पण तुमचा मराठी चित्रपट डोक्यावर कोण घेतो? तर मध्यमवर्गीय मराठी माणूस. त्यालाही आपल्या प्रीमियरमध्ये सहभागी करून घ्यायला हवे. आपण प्रेक्षकांसाठी जर चित्रपट निर्माण करतोय तर त्याला विविध स्तरांवर आणि पध्दतीने आपलेसे करुन घ्यायला हवे. आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे, पूर्वी मराठी चित्रपटाच्या मुहूर्त, प्रीमियर, सक्सेस पार्टी यात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर असतच. चित्रपट महामंडळाचे तात्कालिक अध्यक्ष, आणि मुंबई, पुणे, ठाणे येथील मराठी चित्रपटगृहाचे चालक यांना त्यात आवर्जून आमंत्रित केले जाई, कोणाच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त तर कोणाच्या हस्ते निगेटिव्ह कटिंग होई. मराठी चित्रपटसृष्टी म्हणजे एक परिवार असे. आज अनेक मराठी चित्रपटाचे टीझर अथवा ट्रेलर लाॅन्च म्हणजे केवळ त्या चित्रपटाच्या निर्माता अथवा दिग्दर्शकाचे आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना जणू गेटटुगेदर असते की काय असा प्रश्न पडतो.
आज मराठी चित्रपट आणि त्याचा प्रेक्षक यामध्ये अंतर पडण्याची कारणे फक्त चर्चेत न ठेवता ती दूर करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न हवेत. अमक्या निर्मात्यापेक्षा माझ्या चित्रपटाच्या शोची संख्या जास्त हवीच हा हव्यास सोडायला हवा. त्याकरता ‘चित्रपटगृह संस्कृती ‘ जाणून घ्यायला हवी. पण तशी इच्छा आणि वेळ कोणाकडेच नाही. दक्षिण मुंबईतील मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात काय फायदा होतोय तेच समजत नाही आणि मग एकाद्या शोला अवघे चार पाच प्रेक्षक असले की त्याची बातमी होऊ शकते.
चित्रपट आणि समाजकारण हे एकमेकांत कळत नकळतपणे गुंतलयं, पूर्वी अनेक मराठी निर्माते आणि दिग्दर्शकांना त्याचे भान असे. धोबीतलावच्या मेट्रो थिएटरमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करताना गिरगावातील मराठी प्रेक्षकांना कसे आकृष्ट करायचे यावर विचार होई. वृत्तपत्रातील जाहिरातीत ते कसे मांडायचे यापासून मराठी चित्रपटाचे होर्डिंग्स नेमके कुठे असावे याचा ‘गंभीरपणे ‘ विचार होई. ‘अन्नपूर्णा ‘ ( १९६८) हा मेट्रोत रिलीज झालेला पहिला मराठी चित्रपट होय. त्यानंतर ‘धाकटी बहिण’, ‘हा खेळ सावल्यांचा ‘, ‘माहेरची साडी ‘, ‘पछाडलेला’ असे काही मराठी चित्रपट तेथे प्रदर्शित होताना प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून नियोजन केल्याचा खूप फायदा झाला.
येथे जुने आणि नवे असा भेदभाव करीत नाही, अथवा ‘गेले ते दिवस ‘ अशी रडकथाही नकोय. पण जुन्यातील जे जे चांगले ते ते स्वीकारायला काय बरे हरकत आहे? थोडासा जरी प्रयत्न केला तरी मराठी चित्रपटाची यशाची टक्केवारी वाढेल आणि मराठी स्टार्सनाच ‘प्रेक्षकहो मराठी चित्रपट पाहायला चित्रपटगृहात या ‘ अशी विनवणी करणारे फलक घेऊन रस्त्यावर उतरायला नको. पण हे फक्त मुंबई आणि पुणे येथेच का? निमशहरी आणि ग्रामीण भागात मराठी चित्रपटांवर भरभरून प्रेम करणारा मोठा रसिकवर्ग आहे, तेथील प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांना कायमच दाद दिली आहे आणि आजही ते उत्फूर्तपणे मराठी चित्रपट पाहू इच्छिताहेत, त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करणेही गरजेचे आहे.
अर्थात, हे सगळे मराठी चित्रपटावरील प्रेमाखातरच आहे. प्रत्येक मराठी चित्रपट यशस्वी व्हायला हवा असे मनोमन वाटते, पण तेव्हाच आपण कुठे चुकतोय काय याचाही विचार आपणच करायला हवा. ज्या प्रेक्षकांनी मराठी चित्रपट जगवला, वाढवला, पुढे नेला त्याला उगाच दोष देऊ नये. आपण कोणता चित्रपट डोक्यावर घ्यायचा हे त्याला कायमच कळत आले आहे हे चित्रपटाच्या इतिहासात डोकावून पाहिले तरी लक्षात येते. त्याच प्रेक्षकांना ‘या हो या ‘ असे आवाहन करावेसे वाटले हे फक्त आणि फक्त बातमीपुरते न राहता त्यातून सकारात्मक काही मार्ग निघावा इतकेच सांगायचे आहे….