नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी किंवा पुरुष आणि स्त्री यांतील नातेसंबंधावर जगातल्या नव्वद टक्क्याहून अधिक कलाकृती बेतलेल्या असतात. यातील जी कलाकृती आधीच्या कलाकृतींपेक्षा वेगळा दृष्टिकोन मांडते किंवा वेगळ्या प्रकारे मांडते तेव्हा ती दखलपात्र होते. नुकतंच रंगभूमीवर आलेलं “ज्याची त्याची लव्ह स्टोरी” हे नाटक स्त्री-पुरुष नातेसंबंधावरील मांडणी अधिक चटकदार आणि चमकदारपणे करीत असल्याने दखलपात्र ठरते. इथे स्टेजवर दिसणाऱ्या सहा पात्रांपैकी एकजण आपलं आपल्या मैत्रिणीशी जे नातं आहे ते प्रेमच आहे की नाही याबद्दल संभ्रमात आहे. एकाला ज्या भाबड्या अपेक्षांनी आपण लग्न केलं होतं त्या पूर्ण न होताना दिसल्याने आपण लग्न करून फ़सलोय की काय अशी शंका येऊ लागलीय. एकजण आपलं तुटलेलं नातं स्वीकारून नव्याने आयुष्य सुरु करण्याचा प्रयत्न करतेय. करिअर हेच आपलं सर्वस्व मानणारी एकजण, काही काळाचा विरंगुळा म्हणून नात्याकडे पाहतेय. लहानपणापासून प्रेमाला पारखी झालेली अन लग्नाच्या व्यवहारात नाकारलेली गेलेली एकजण नव्याने गवसलेल्या नात्याला आपल्या रिल्समधे कॅप्चर करू पाहतेय. तर एकजण तुटलेल्या नात्यांचा आपल्याला काही फरक पडत नाही, यापुढे भावनिक गुंतागुंतीत आपल्याला अडकायचं नाही असा निर्लेप असल्याचा आव आणतो आहे.
या सगळ्या पात्रांना नाटककाराने वेगवेगळ्या कारणाने एका हिल स्टेशनवरील रिसॉर्टमधे एकत्र आणलेलं आहे. प्रत्येकाचा नातेसंबंध आणि विवाहसंस्थेबद्दलचा दृष्टिकोन पूर्णपणे भिन्न आहे. त्यांच्या आपापसातील व्यवहारातून नात्यातील विविध कंगोरे लेखकाने धुंडाळले आहेत. मानवी नातेसंबंधांचा एक उभा-आडवा छेद (slice of Life) दाखविण्याचा प्रयत्न या नाटकाने केलेला आहे. आणि त्याद्वारे एक सुंदर, हलकंफुलकं, खळखळून हसवणारं, थोडंसं भावुक करणारं आणि अधूनमधून अंतर्मुख करायला लावणारं मनोरंजक नाटक घडवलं आहे.
आज नात्या-नात्यांत संवाद संपलेला आहे त्यामुळे नात्यांचे बंध तकलादू होऊ लागले आहेत. पिंडे पिंडे मतिर्भिन्न या न्यायाने जिथे दोन व्यक्ती एकत्र येतील तिथे भांडणे, मतभेद, वाद होणारच. पण म्हणून नात्यांचे बंध तोडून टाकता येणार नाही. नाती टिकविण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. संवाद साधला गेला पाहिजे. नात्याला पुन्हा फुलण्याची संधी दिली पाहिजे. असा सकारात्मक संदेश देणारं हे नाटक आहे.
हेह वाचा – आबा अत्यवस्थ आहेत!
ग
अनेक नाटक, सिनेमा, टीव्ही सिरीयलसाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलेल्या, महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोसाठी शेकडो स्किट लिहिलेल्या ऋषिकांत राऊतने हे नाटक लिहून नाटक क्षेत्रात एक दमदार पाऊल टाकलेलं आहे. प्रियदर्शन जाधवने या नाटकाचं नेटकं दिग्दर्शन केलेलं आहे. छोट्या छोट्या प्रसंगात देखील प्रियदर्शनचा टच स्पष्ट जाणवून येतो. सुयश टिळकचा त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभणारा हॅप्पी गो लकी स्वभावाचा विवेक, सुरुची आडारकरची घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेली तरी मॅच्युअर्डपणे आपली परिस्थिती स्वीकारलेली शलाका, रोहित हळदीकरने साकारलेला कन्फ्युज्ड प्रियकर अमित, पूर्णानंद वांढेकरने आपल्या सहज अभिनयाने रंगवलेला हनिमूनला आलेला भाबडा नवरा प्रकाश, शर्वरी बोरकरची करियर ओरिएंटेड प्रिया आणि शर्मिला राजाराम शिंदेने आपल्या परफॉर्मन्सने ‘लावा जोर’ म्हणत धम्माल उडविलेली रीलस्टार या सगळ्यांचीच कामे जबरा झालेली आहेत. नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीत या तांत्रिक गोष्टीही उत्तम झाल्या आहेत. नाटकातील एकमेव गाणं देखील प्रेक्षक गुणगुणत थिएटर बाहेर पडतील असं खास झालं आहे.
‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ हे आजच्या काळाचं नाटक पाहताना प्रत्येकाला त्यातील एकतरी पात्र, एकतरी घटना आपल्याशी किंवा आपल्या आजूबाजूच्या कुणाशी तरी रिलेट करता येईल अन् त्यामुळे हे नाटक आवडेल हे नक्की.