मुंबई तर झालेच पण ठाणे आणि रायगड जिल्ह्यातही मराठीचा घसरता टक्का ही सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या चिंताजनक गोष्ट असल्याचे स्पष्ट होतेय, पण त्याबरोबरच बाॅलिवूडमध्ये मराठीचा टक्का फारच घसरल्याचे दिसतेय.
आता लगेचच या देशात एका मराठी माणसानेच अर्थात दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली असे म्हणतच भावूक होण्याचीही कदाचित स्पर्धा लागेल आणि फ्लॅशबॅकमध्ये जात हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रवासात किती आणि कसे मराठी कलाकार ( विशेषतः नायिका), दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ आपले कर्तृत्व दाखवण्यात यशस्वी ठरले हेही अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होईल. ती जशी वस्तुस्थिती आहे, तशीच आज बाॅलिवूडमध्ये मराठीची सर्वच बाबतीत पीछेहाट झालीय, हेसुध्दा वास्तव ( की रियॅलिटी शो?) आहे. एक लक्षात घ्या, जागतिकीकरणाचे वारे आपल्याकडे येईपर्यंत ‘हिंदी चित्रपटसृष्टी ‘ असेच आपण बोलत होतो. हिंदीत फिल्म जगत म्हणत, तर इंग्रजीत फिल्म इंडस्ट्री म्हणत. पण तीनही भाषेत ‘बाॅलिवूड’ असे म्हणायला सुरुवात झाली आणि तेथूनच मराठी टक्का कमी होत गेला. अगदी मराठी चित्रपटांची नावेही मोठ्याच प्रमाणात इंग्रजीत येऊ लागली, आणि त्याची ‘माहिती पुस्तिका ‘ही ( बाॅलिवूडच्या भाषेत बुकलेट) इंग्रजीत येण्याचे प्रमाण वाढले.
खरं तर आपल्याकडे सिनेमाचा जन्म झाला, तेव्हापासूनच देशाच्या विविध भागातून कलाकार, लेखक, कवी, संगीतकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मुंबईत येऊ लागले. पण त्यात मराठी गुणवत्ता ठामपणे उभी होती, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, चित्रपती व्ही. शांताराम! मूकपटाच्या काळापासून त्यांनी दबदबा निर्माण केला. अगदी राज कपूरही त्यांना आपला आदर्श मानायचा. तो काळ कलेसाठी कला याचा होता.
कालांतराने सगळेच बदलले. बाॅलिवूड म्हणजे मुंबई असे नाते अगदी घट्ट झाल्यावर तर देशाच्या तर झालेच पण विदेशातूनही ( उदा. कैतरिना कैफ) स्टार ( कलाकार म्हणणे मागे पडले), दिग्दर्शक, निर्माते, गायक, संगीतकार वगैरे असंख्य जण आले. अगदी मुव्हीजची ( आज चित्रपटाला मुव्हीज म्हणतात) पीआरओही दिल्ली वगैरेतून आली. याची गती नेमकी कधी झाली तर ऐंशीच्या दशकात व्हिडिओ अल्बमचे पीक आले आणि एक नवे माध्यम उपलब्ध झाले. नव्वदच्या दशकात उपग्रह वाहिन्या येताच येथे परप्रांतीय येणे कमालीचे वाढले. एकता कपूरच्या भरजरी मालिकांसाठी उत्तरेकडचे अनेक नवीन चेहरे आले. त्यात एकादा मराठी चेहरा असे ( उदा. मृणाल कुलकर्णी) . रियॅलिटी शो, गेम शो इत्यादीने छोटा पडदा मोठा झाला आणि पडद्यामागे मोठा रोजगारही उपलब्ध झाला. तेथे परप्रांतीयाना संधी मिळाली. बाॅलिवूड कमालीचे विस्तारले. हा वेग कमालीचा भन्नाट होता. कदाचित काहीना कल्पना नसेल, ‘श्वास ‘( २००३) पूर्वीच्या दशकात मराठी चित्रपटाच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘कोर्ट’, ‘नाळ’ अशा आशययुक्त मराठी चित्रपटांचे हिंदी चित्रपटसृष्टीला कौतुक वाटलं याचा मराठी मनाला अभिमान वाटला, तर मराठीच्या ग्लॅमरस इव्हेन्टसमध्ये हिंदी चित्रपट गीतांवर भारी नाच होऊ लागले. हे विषयांतर नव्हे, तर हेदेखील हिंदीचे आक्रमण होय. कळत नकळत झालेले.
खान नायकांचे वर्चस्व, अक्षय, अजय, रणवीर, रणबीर, ह्रतिक, नवाझ, विकी, राजकुमार राव, आयुष्यमान या चलनी नाण्यात मराठी नाव नाही. दीपिका, कैतरिना, प्रियांका, आलिया, विद्या, करिना, तापसी, सारा यात माधुरी दीक्षित अजूनही टिच्चून टिकून असल्याचा अभिमान असला तरी आज टाॅप टेन अभिनेत्रींत मराठी नाव नाही. धर्मा प्राॅडक्शन्स आणि यशराज फिल्म, बालाजी, आरव्हीके, देवगन फिल्म ही मोठी प्राॅडक्शन्स हाऊसेस ‘आपली ‘ नाहीत. दिग्दर्शकात मात्र थोडी आशा आहे. आशुतोष गोवारीकर, मधुर भंडारकर, अभिनय देव असे मान्यवर आहेत. पण ते मराठी चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकत नाहीत. यामागे काही व्यावसायिक कारण असावीत. अर्थात, चांगली पटकथा असेल तर मराठी चित्रपटात भूमिका करायला नक्कीच आवडेल असे अनेक हिंदी स्टार सांगतात आणि बातमीत मथळा मिळवतात. हिंदीतला एकादा गायक मराठीतील एक गाणे म्हणाला की त्याचे कौतुक करताना आपण विसरतो की, त्यामुळे एका महाराष्ट्रीय गायकाची संधी हुकलीय. मराठी चित्रपटातील आयटम साँगमध्ये हिंदी कलाकार हवासा वाटतो, खरं तर मराठीत भारी नृत्य तारका आहेत. त्यांची नृत्य कला प्रचंड क्षमतेची आणि अभिनयनिपुण आहे. तरी हिंदीच चेहरा पाहिजे. तात्पर्य, हिंदीचे आक्रमण आणि मराठीची पीछेहाट अशी अनेक लहान मोठ्या स्तरांवर आहे. प्रत्येक गोष्टीचे त्यासाठी बायपास ऑपरेशन करावे लागेल. हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी ठरलेली मराठी अभिनेत्री एखाद्या सोहळ्यात जरासे मराठी बोलली तरी आपण मनसोक्त टाळ्या वाजवतो इतके आपण अल्पसंतुष्ट का बरे?
‘पॅडमॅन’, ‘टाॅयलेट एक प्रेमकथा’,’ मुल्क’ अशा अनेक चित्रपटांत उत्तर भारतातील छोट्या शहरातील पाश्वभूमीवर गोष्ट आली, त्यासह अनेक उत्तर भारतीय कलाकारांना खूपच संधी मिळतेय. तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा ‘मध्ये दीड डझन मराठी कलाकारांना संधी लाभल्याचा आनंद असला तरी त्याच ‘सिम्बा ‘मुळे ‘भाई ‘ला थिएटर्स मिळण्यात अडचण आली. तात्पर्य काय घ्यायचे हो?
बाॅलिवूडमध्येही मराठीचा ठसा घसरलाय हे दुःख विसरण्यासाठी पूर्वी कशी मराठीची चलती होती यांच्या आठवणीनां उजाळा देत रहायचे का?