भारतीय सिनेकलावंतांचे जगभर चाहते आहेत, पण या सर्वांमध्ये आघाडीवर आहे तो कलाकार म्हणजे मिथुन चक्रवर्ती. भारतीय चित्रपसृष्टीतील एक असा अवलिया कलाकार ज्याने रशिया तसेच काही अन्य पाश्चात्य देशांत आपल्या स्टारपदाची जादू आजही कायम राखली आहे. मिथुनदा यांनी आजवर अनेक चित्रपटांत काम केले आहे. पण १० डिसेंबर १९८२ ला प्रदर्शित झालेला बब्बर सुभाष दिग्दर्शित ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपटामुळे त्यांना जे स्टारडम मिळाले ते आजतागायत कायम आहे. या चित्रपटाने फक्त भारतात ६ कोटी तर बाकी सोव्हिएत युनियनमध्ये जवळपास ९४ कोटी कमावले होते. भारताच्या चित्रपट सृष्टीमधील हा पहिलाच चित्रपट होता ज्याने १०० कोटींच्या कमाईचा पल्ला पार केला होता. हा एक समस्त भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता.
या डिस्को डान्सर चित्रपटातील ‘आय एम डिस्को डान्सर’, ‘जिमी जिमी आजा’, ‘गोरों की ना कालो की दुनिया है दिलवालो की’ ही गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. जिमी जिमी हे गाणे सोव्हिएत युनियनमधील फॅन्ससाठी जीव की प्राण आहे. आज आपल्या देशात नव्या पिढीला ही गाणी माहीतही नसतील कदाचित, पण आजही ही दोन गाणी सोव्हिएत युनियनमध्ये येणाऱ्या देशांमधे टीव्हीवरील रिॲलिटी शोमध्ये एकतरी स्पर्धक असा असतो जो ‘जिमी जिमी आजा’ हे गाणे म्हणतो किंवा त्यावर डान्स करतो. त्या देशांतील नव्या पिढीलाही हे गाणे तोंडपाठ आहे. एका अहवालानुसार, आजही रशिया मधील ७०% लोकांना हे गाणं पाठ आहे.
हेही वाचा – Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची अवस्था अश्वत्थाम्यासारखी झाली आहे का?
रशियामध्ये तर मिथुनदाचे स्टारडम एवढे जबरदस्त आहे की एकदा मिथुनदा एका कार्यक्रमसाठी रशियाला गेले असता एअरपोर्टच्या जवळीलच एका ठिकाणी रशियाच्या राष्ट्रप्रमुखांची रॅली होती. पण मिथुनदा येणार असल्याने सर्व चाहत्यांनी रॅलीऐवजी एअरपोर्टवर दादांची एक झलक बघण्यासाठी तोबा गर्दी केली होती.
आपल्या रॅलीला लोक का नाहीत याची चौकशी केली असता राष्ट्राध्यक्षांना ही बातमी कळताच त्यांनी आपली रॅली रद्द केली. एखाद्या अभिनेत्यामुळे आपला कार्यक्रम एका राष्ट्राध्यक्षाने रद्द करणे हे दुर्मिळच. पण मिथुनदाच्या स्टारडमपुढे राष्ट्राध्यक्षांचे काहीच चालले नाही. जसा आपल्याकडे एखाद्या कलाकाराच्या जीवनावर आधारित चित्रपट बनतात तसा रशियामध्ये मिथुनदावर एक चित्रपट बनवला गेला आहे. रशियन भाषेत तो बयोपिक म्हणाता येणार नाही. पण त्या चित्रपटात फॅन्स आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी किंवा त्याचा चित्रपट बघायला किती वेडेपिसे असतात आणि मध्येच मिथुनदाचा चित्रपट थिएटरमधून हटवण्यात येतो तेव्हा चाहत्यांनी केलेला दंगा तोडफोड अश्या टाइपमध्ये तो चित्रपट आहे.
हेही वाचा – भारतातील पितृपक्षासारखी संस्कृती जगात इतर ठिकाणी कुठे सापडते?
आज चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दशके उलटली, पण अजूनही सोव्हिएत संघ, रशियामध्ये मिथूनदाची क्रेझ, चाहता वर्ग जराही कमी झालेला नाही.
आजच्या कलाकारांचे जगभर चाहते असतील, पण मिथुनदा यांची जी क्रेझ किंवा त्यांची फॅन बेसची जी किमया आहे ती अजूनही कोणत्या कलाकाराला साधता आलेली नाही. आजचे कलाकार आपला एखादा चित्रपट हिट झाला की स्वतःला मोठे स्टार समजतात, पण मिथुनदाच्या स्टारडम पुढे ते काहीही नाहीत.