धवल कुलकर्णी
महाराष्ट्राच्या विधानसभेत नवनियुक्त उद्धव ठाकरे सरकारवर विश्वासमताचा प्रस्ताव मांडला गेला होता, त्यावेळेला फक्त चार आमदार तटस्थ राहिले. त्यापैकी, एक आमदार उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील होते हे विशेष. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत.
इथे एक लक्षणीय गोष्ट अशी की, उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क येथे झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी स्वतः राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. विधिमंडळात तटस्थ राहणारे इतर तीन आमदार म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले व असदुद्दीन व अकबरुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल खलिक व शहा फारूक अन्वर.
लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना पाटील यांनी आपण विरोधी पक्षातच बसून काम करणार असल्याचे सांगितले. “महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या विरोधात लढली. त्यामुळे या दोघांसोबत न जाता आम्ही आमचा वेगळा रस्ता तयार करणार आहोत. महाराष्ट्राचा राजकारणात तिसरी शक्ती अथवा आघाडी म्हणून पुढे यायचा प्रयत्न करू,” असे मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
“आम्ही निवडणुका लढलो ते एक सक्षम विरोधीपक्ष म्हणून पुढे येण्यासाठी. आमचा हेतू सत्तेत बसणं नाहीये तर एक प्रबळ विरोधक म्हणून काम करणं हा आहे. निवडणुकांमध्ये आम्ही मुख्यत्वे लढलो ते भाजपाच्या विरोधात. त्यामुळे त्यांच्यासोबत बसणं हे आम्हाला तत्वतः मान्य नाही,” असे पाटील यांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला पाठिंबा न देता, भाजपासोबत विधिमंडळातून वॉकआउट न करता तटस्थ राहण्याच्या निर्णयाबाबत बोलताना सांगितले.
मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, त्यांचा पक्ष भाजपा व शिवसेना दोघांपासूनही समान अंतर राखेल. आम्ही दोघांच्या विरोधातही लढलो होतो. हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल, असे वाटत नाही. तरीसुद्धा, एकीकडे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ताधारी आघाडी व दुसरीकडे प्रमुख विरोधक म्हणून भाजपा अशा दोन आघाड्यांमध्ये राजकारणाचे विभाजन झाल्याचे सध्यातरी दिसते. असे असले तरी या दोन्ही आघाड्यांच्या पलीकडेसुद्धा एक राजकीय अवकाश आहे व तो भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करू.
सत्ताधारी असलेल्या तीन पक्षांमध्ये होणारी सुंदोपसुंदी व भाजपात असलेले अंतर्विरोध या दोन्ही गोष्टींचा फायदा घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या काळात करेल.