मनोज वैद्य
…लाट ही ओसरण्यासाठीच असते !
कधी कधी
सगळंच कसं चुकत जात !
नको ते हातात येतं ,
हवं ते हुकत जातं !
– मंगेश पाडगावकर
या कवितेच्या ओळी पाच राज्याच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपला सध्याच्या परिस्थितीत लागू होतात.या निवडणूकीत पराभूत होण्यापूर्वीच सारेच कसे चुकत चालले होते. या निवडणूकीत भाजप पक्षातंर्गत घडलेल्या एका मोठ्या घटनेला राजकीय विश्लेशकांनी फारसे महत्त्व दिले नाही , ती घटना म्हणजे ऐन निवडणूक प्रचार मोहीमेत मध्य प्रदेशमधून (विदीशा) निवडून येणाऱ्या परराष्ट्रमंञी सुषमा स्वराज यांनी यापुढे निवडणूक न लढविण्याची घोषणा. त्यापाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये मोठा प्रभावक्षेञ असलेल्या परंतु पक्षाच्या डावपेचामुळे मनाविरुध्द गृहराज्याबाहेर काढलेल्या उमा भारती यांनीदेखील यापुढे निवडणूकीच्या राजकारणातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले. या दोन्हीही भाजपच्या एकेकाळच्या ‘ फायरब्रँड ‘ नेत्या. सध्या मोदी- शहा यांच्या कृपेने नावालाच पदावर होत्या आणि योगायोगाने या दोन्हीही लालकृष्ण आडवाणी यांच्या समर्थक होत्या हे विशेष ! यांच्या मोक्याच्या क्षणी या निवडणूक संन्यासाचा योग्य तो संदेश कार्यकर्ते व मतदार यांना नक्कीच गेला असणार यांत काही शंकाच नाही. त्यातून मप्र निवडणूकीत किती नुकसान झाले यापेक्षा भाजपमधील मोदींविरोधी गटातील मंञीपदावरील नेत्याने असंतोष व्यक्त करुन,सरकारमध्ये आलबेल नसल्याचे संकेत संयमाने दिले आहेत .एकूणच आता या भाजपशासित राज्याच्या अपयशानंतर कोंडमारा सहन करणाऱ्या नाराज मंञ्याच्या यादीत भरच पडणार आहे.
त्यानंतर पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम् यांनी मुलाखतींचा सपाटा लावला.त्यांनीही या पाच राज्याच्या निवडणुकीत अगदी मोक्याचे टायमिंग साधले!
राजस्थानमधील फार मोठा वर्ग विशेषतः मारवाडी समाज देशभरात व्यापारात मोठे बस्तान बसवून आहे.या समाजातील व्यक्तींना अरविंद सुब्रमण्यम् यांनी नोटबंदीचा व्यापारावर वाईट परिणाम झाला,तसेच वस्तू व सेवाकर (GST) याची आखणी व अंमलबजावणी चूकीच्या पध्दतीने झाली अशी टीका केंद्र सरकारवर केली. यामुळे निवडणुकीच्या या राज्यातील छोट्या-मोठ्या व्यापा-यांच्या जखमेवरील खपली निघाली.त्यांना त्यांच्या वेदना नव्याने जाणवल्या.राजस्थानमधील माध्यमातील लोकांनी मान्य केले की, नोटबंदी व जीएसटी बद्दल नव्याने असंतोष जाणवला.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचे बंडसुध्दा निवडणुकीच्या तोंडावरच सुरु झाले हेसुध्दा लक्षात घेतले पाहीजे. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर होणार असे वातावरण माध्यमातून सुरु झाले, सट्टाबाजारांतील गूंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर राजस्थानमधील आहे.तो या घटनेमुळे प्रचंड अस्वस्थ झाला,त्यातील बहुतांशी भाजपसमर्थक असलेला हा वर्ग यांतून नकारात्मकता भूमिकेत गेला.तसेच रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी मोठ्या उद्योगपतींना वाटायचा आहे, पण शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मात्र पैसा नाही.यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला.देशांत आत्महत्या करणाऱ्या संख्येत मप्रचा तिसरा क्रमांक लागतो हे या निमित्ताने आपण लक्षात घेतले पाहीजे.
दिल्लीला जंतरमंतर ते संसद अशा सुमारे पाच लाखांचा किसान आंदोलन मोर्चा हासुध्दा नियोजित पध्दतीने केलेली आखणी होती. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलाखतींचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की, बरेचसे शेतकरी मप्रमध्ये मतदान करुनच आले होते. मप्रमधील मंदसौर आंदोलनांतील शेतक-यांवर झालेला गोळीबार व त्यात मृत्युमुखी पडलेल्या गोष्टींना बराच कालावधी गेला होता परंतु या दिल्लीच्या मोर्च्याने त्या हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांची आठवणी पुन्हा जागृत झाल्या.
सारेच कसे नियोजित पध्दतीने एखाद्या संहिता असल्याप्रमाणे घडत होते आणि कवितेच्या ओळीत म्हटल्याप्रमाणे वाटायला लागते , कधी-कधी सगळंच कसं चुकत जात! पुढच्या ओळीतील अर्थबोध होतो नको ते हातात येतं ! म्हणजेच तीन भाजपशासित राज्यांत सत्तांतर होते.
कालपर्यंत ज्या पक्षाला देशातून संपवायचा या अहंकाराने पेटलेल्या , त्या पक्षाच्या अध्यक्षाला हिणवून सर्व स्तरावर नामोहरम करणाऱ्या दिग्गज अशा सर्वशक्तीमान मोदी-शहा जोडीला या तीन राज्यात पराभवाचे तोंड पहावे लागले.
मोदी हे करारी , कर्तव्यकठोर नसून ते हुकूमशहा , अहंकारी व सतत खोटे बोलणारे आहेत अशी प्रतिमा निर्माण करण्यात काँग्रेस यशस्वी कधी झाली हे मोदींनासुध्दा कळले नाही.त्याउलट राहुल गांधी हे प्रेमळ, साधे व स्वच्छ मनाचे प्रामाणिक आहेत असे बिंबविण्यांत आले.त्यातून नायक विरुध्द खलनायक असेच काहीसे नाट्य येणाऱ्या काळात उभे राहील.त्यातून सरकारने गांधी घराण्यावर काहीही कारवाई अथवा प्रतिक्रिया याचा परिणाम देशांतील जनतेत राहुल गांधी यांच्याविषयी अधिक सहानुभूती निर्माण होईल.त्यामुळे भाजपचे रणनीतीकार स्वतःच्या चक्रव्यूहांत अडकल्याचे लक्षात येत आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड यांमधील २२कोटी जनतेवर गारुड करण्यांत राहुल गांधी यशस्वी झाले.त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीला निकालाच्या दिवशी नेमके एक वर्ष पूर्ण होत असताना, तीन राज्यांत सत्ता प्राप्त करणे हे त्यांच्या नेतृत्वार शिक्कामोर्तबच आहे.या तीन राज्यांत लोकसभेच्या एकूण ६५ जागा असून त्यातील फक्त तीन जागांवर काँग्रेस २०१४ ला विजयी झाली होती,आत्ताच्या निवडणूकीच्या टक्केवारीनुसार भाजपचे ४४ जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
तीन राज्यांच्या निवडणूकीच्या यशाने विरोधी पक्षांच्या महाआघाडीत काँग्रेसला महत्व प्राप्त होऊन, प्रादेशिक पक्षांच्या मध्यवर्ती भूमिकेत राहुल गांधीचे नेतृत्व प्रस्थापित होण्यास आता अडचण होणार नाही. प्रादेशिक पक्षाच्या अस्तित्वात येणाऱ्या महाआघाडीमुळे स्थानिक राज्यांच्या अस्मिता व जातसमीकरणे यातून हिंदीपट्ट्यात भाजपचे १९९२ चे जुने झालेले राममंदिराचे नाणे कितपत चालेल यांबद्दल शंकाच आहे.
एकूणच भाजपच्यापुढे २०१९ ची लढाई सोपी राहीली नसून.सर्वशक्तीमान मोदी यांच्यावर विसंबून राहणे भाजपला धोक्याची ठरु शकते.कारण मोदी यांची लाट होती हे मान्य केले तर एक लक्षात घेतले पाहीजे , की लाट ही ओसरण्यासाठीच असते.
manojvvaidya@gmail.com