-श्रुति गणपत्ये
या आठवड्याच्या सुरुवातीलाच अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केल्याने संपूर्ण जगभरात त्याची प्रतिक्रिया उमटली. अफगाणिस्तानी सैन्य लढलं का नाही, अमेरिकेने सैन्य मागे घेण्याचा निर्णय आताच का घेतला, आता तालिबान्यांचा हिंसाचार पुन्हा सुरू होईल, तिथल्या नागरिकांची सुरक्षितता, रशिया, चीन, अमेरिका यांची आता भूमिका काय असेल वगैरे अनेक प्रकारच्या चर्चा यावेळी झाल्या आणि पुढे सातत्याने होत राहतील. पण अफगाणिस्तानचा प्रश्न केवळ तालिबान्यांनी सत्तेत आल्याने सुरू झालेला नाही तर त्यांना मूळात प्रोत्साहन देणाऱ्या अमेरिकेने सुरू केला आहे. १९८० च्या काळामध्ये रशियाला मात देण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानामध्ये टोळ्यांना मदत केली आणि पाकिस्तानमध्ये त्यांच्यासाठी प्रशिक्षण कॅम्प उघडले. त्याचं आजचं रूप हे तालिबान आहेत, धर्माच्या नावाने गळा काढणारे आणि हिंसा करताना मागे-पुढे न पाहणारे. नंतर त्याच तालिबान्यांचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने आपले सैन्य अफगाणिस्तानमध्ये पाठवले आणि देशाचा विध्वंस तिथेच झाला. देशाच स्थैय यावं म्हणून अमेरिकेने दिलेलं कोणतंही वचन पाळलं नाही उलट अफगाणिस्तान धुमसत राहिला आणि त्याचा शेवट काहीच विरोध न होता तालिबान्यांना मिळालेल्या सत्तेत झाला.
आता याचा ओटीटी प्लॅटफॉर्मशी काय संबंध आहे असं तुम्हांला वाटेल. पण सुमारे ४० वर्ष सुरू असणारी ही अफगाणिस्तानची अस्वस्थता ओटीटीवर विविध चित्रपट आणि डॉक्युमेंटरीजमधून पुढे येते. थेट राजकारणाला हात घालण्याऐवजी अफगाणिस्तानातल्या लोकांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडला आहे, त्यांना काय गमवावं लागलं आहे याचं वरवरचं चित्रण विविध चित्रपटांतून येत राहतं. त्यात प्रामुख्याने मोहसीन मखमलबाफचा “कंदहार”, डेबोरा एलिसच्या पुस्तकावर आधारित “द ब्रेड विनर” (नेटफ्लिक्स) आणि मनीषा कोयरालाचा “द एस्केप फ्रॉम अफगाणिस्तान” (अॅमेझॉन) हे महिलांची स्थिती दर्शवणारे चित्रपट येतात. कंदहारमध्ये आपल्या बहिणाचा शोध घ्यायला कॅनडामधून आलेल्या महिलेची ही कहाणी आहे आणि विविध संकटांचा सामना करत ती अफगाणिस्तानच्या छोट्यातल्या छोट्या गावात फिरत राहते आणि सातत्याने होणारी युद्ध आणि अस्थिरता यामुळे लोकांची झालेली दुर्दशा पुढे येते. द ब्रेड विनर ही कार्टून फिल्मच्या माध्यमातून मांडलेली एका मुलीची कथा आहे. तालिबान्यांनी शिक्षण बंद केल्याने शिक्षक असलेले तिचे वडील घरी बसले आहेत. कुटुंबासाठी पैसे कमावण्यासाठी तिला मुलगा बनून काम करावं लागतं आणि आपण पकडले जाऊ या भीतीमध्ये सातत्याने वावरावं लागतं. द एस्केप.. मध्ये भारतात पळून येऊ इच्छिणाऱ्या एका महिलेचा संघर्ष आहे. संजय दत्तचा तोरबाझ (नेटफ्लिक्स) हा आणखी एक अफगाणी मुलांवर असलेला चित्रपट आहे. पालकांचं छत्र हरपलेली, शरणार्थी कॅम्पमध्ये राहणारी आणि तालिबान्यांसाठी सहज उपलब्ध होणारे फिदायी सैनिक अशा असुरक्षित वातावरणात वाढणाऱ्या मुलांना क्रिकेटमध्ये गुंतवण्याचं काम संजय दत्त करतो.
पण बहुसंख्येने असलेले इंग्रजी चित्रपट अमेरिकन सैनिकांनी अफगाणिस्तानमध्ये किती मोठी भूमिका पार पाडली हेच दाखवत राहतात. लोन सर्व्हायवर (अॅमेझॉन), १२ स्ट्रॉंग (नेटफ्लिक्स), अफगाणिस्तान- द लायन्स लास्ट रोअर (अॅमेझॉन) अशा अनेक चित्रपटांमध्ये अमेरिकन सैन्य कशा पद्धतीने अफगाण नागरिकांना मदत करून, स्वतःचा जीव धोक्यात घालून तालिबान्यांशी लढत आहे हे दाखवलं आहे. त्यासाठी त्यांची शूरवीरता, धाडस, धैर्य प्रसंगी एकट्याने लढण्याची हिंमत वगैरे ओघानेच येतं. त्याशिवाय त्यांच्याकडे असलेली अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रं, तंत्रज्ञान आणि त्यामानाने मागासलेले तालिबानी हे वारंवार या चित्रपटांमधून बिंबवलं जातं. अमेरिकन भांडवलशाहीचा प्रचार कसा विविध माध्यमातून होत राहतो आणि सारखं तेच तेच पाहून लोकांनाही ते खरं वाटू लागतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे अमेरिकी चित्रपट आहेत. अफगाणिस्ताननंतर इराण, इराक आणि इतरही ज्या देशांमध्ये अमेरिकेने हल्ले केले आणि जनजीवन कायमचं उद्ध्वस्त करून टाकलं त्या देशांवर बनलेले बहुतांशी चित्रपट हे अमेरिकी सैनिकांची बाजू मांडणारेच अधिक आहेत.
त्यात “व्हिस्की टंगो फॉक्सट्रॉट” (अॅमेझॉन) हा एक वेगळा चित्रपट आहे कारण तो अफगाणिस्तानमध्ये काम करणाऱ्या परदेशी पत्रकारांवर आहे. त्यांचं स्वतःचं एक राजकारण असतं, बातमी मिळवण्यासाठी धडपड, प्रसंगी जीव धोक्यात घालणं, आपापसातली टोकाची स्पर्धा, पहिल्यांदा बातमी मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये एकमेकांची दिशाभूल करणं, त्यातून अमेरिका आणि युरोपमधल्या मोठ्या पेपरमधून आलेल्या पत्रकारांना मिळणारा आर्थिक पाठिंबा आणि काही आणीबाणीचा प्रसंग उद्भवला तर मिळणारं राजकीय संरक्षण, पाश्चिमात्य देशाचा या युद्धाकडे बघण्याचा दृष्टीकोन असे वेगळे काही मुद्दे यामध्ये येतात.
अर्थातच या सगळ्या चित्रपटांध्ये काही समान धागे आहेत. ते म्हणजे अफगाणिस्तानची दुर्दर्शा दाखवणं आणि केवळ तालिबानीच याला कसे जबाबदार आहेत हे सांगत राहणं. त्यातल्या त्यात स्त्रिया आणि मुलांची दयनीय अवस्था थोड्याफार प्रमाणात या चित्रपटांमधून पुढे येते. सततच्या लष्कर आणि तालिबान यांच्या उडणाऱ्या चकमकींमुळे अस्थिर झालेलं आयुष्य, बुरख्यात वावरणाऱ्या आणि स्वातंत्र्य गमावलेल्या महिला, प्रत्येक मोठ्या शहराला आलेलं छावणीचं रूप, शरणार्थी कॅम्प, अमेरिकन, युरोपियन स्वयंसेवी संस्था करत असलेलं काम, गोळीबार, बॉम्बस्फोट असं मर्यादीत चित्रण या येत राहतं.
पण मूळ प्रश्नांना कोणीच हात लावत नाहीत. इथे प्रचंड प्रमाणात फोफावलेली अफूची शेती आणि त्यातून तालिबान्यांना मिळणारा पैसा, अमेरिकन लष्कराने नागरिकांवर केलेले अत्याचार, तालिबानी असल्याच्या संशयावरून अमेरिकन लष्कराने अचानक कोणाच्याही घरावर टाकलेल्या धाडी किंवा केलेला अंधाधुंद गोळीबार, अमेरिकन सैन्याच्या ऐषोआरामासाठी एअर कंडिशन, जिम, पॅक्ड फूडने भरलेले त्यांचे कॅम्प आणि त्यासाठी खर्च केलेले अब्जावधी डॉलर्स, स्त्रियांच्या असहायतेचा फायदा उठवत वाढीला लागलेला वेश्या व्यवसाय, मुलांचं होणारं शोषण, रोजचं आयुष्य जगताना लोकांना येणारे प्रश्न, प्रचंड बेरोजगारी, शिक्षणाचा खेळखंडोबा, आरोग्य व्यवस्थांची दुरावस्था आणि परदेशी मदतीवर चालणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचं राजकारण, अमेरिकेला शरण गेलेले राजकारणी, युद्ध सुरू राहवं आणि त्याचा फायदा आपल्याला मिळावा म्हणून सातत्याने काम करणारे वॉर लॉर्ड, अमेरिकन स्वयंसेवी संस्थांचं वेगळं राजकारण आणि त्यातून अफगाणिस्तानमध्ये वाहणारा प्रचंड पैसा, पाकिस्तानच्या सीमेवर असलेले तालिबानी प्रशिक्षण कॅम्प आणि त्याला मिळणारा अमेरिकन पैसा या खऱ्या मुद्द्यांवर कधीच चित्रपट किंवा सीरिज निघाल्या नाहीत.
shruti.sg@gmail.com