– नामदेव कुंभार
धोनी… म्हटलं की डोळ्यासमोर त्याचा शांत स्वभाव आणि आक्रमक खेळ येतो. धोनीनं भारतीय क्रिकेटला जै वैभव मिळवून दिलं ते शब्दात मांडणं शक्य नाही. सौरव गांगुलीसारख्या आक्रमक खेळाडूनं भारतीय संघाची बांधणी केली खरी पण धोनीनं त्या संघाला गतवैभव मिळवून दिलं. सचिन, द्रविड, गांगुली, सेहवाग यासारख्या दिग्गज खेळाडूंकडून धोनी खूप काही शिकला. दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करणारा झारखंडमधील हा खेळाडू एक दिवस देशाचं नाव जगात मोठं करेल असं त्यावेळी एकाही भारतीयाला वाटलं नसेल…. पहिल्या सामन्यात शुन्यावर बाद होणाऱ्या धोनीनं नंतर आपल्या आक्रमक खेळीनं जगाला प्रेमात पाडलं.
आयसीसीच्या तिन्ही टॉफ्री जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे. धोनीनं भारतीय संघाला जिंकण्याचं व्यसन तर लावलेच पण हातून गेलेला सामना कसा जिंकायचा हेही शिकवलं. धोनी-युवराज जोडीनं अनेकदा अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. त्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. धोनीने अचानक घेतलेली निवृत्ती मनाला ठेच पोहचवणारी होती. १३० कोटी भारतीयांसोबत जगाला धोनीच्या निवृत्तीचा सामना पाहायचा होता… पण… सेहवाग, युवराज, गांगुली, द्रविड या दिग्गजाप्रमाणे धोनीला निरोपाचा सामना मिळाला नाही ही खंत प्रत्येक भारतीयांच्या मनात राहिल.
आता भारतीय संघात धोनी दिसणार नाही… एकदिवस ते होणारच होतं.. वेळ आल्यावर प्रत्येकाला संघातून बाहेर काढलं जातं किंवा तो खेळाडू स्वत: निवृत्ती घेतो. धोनीची जागा घेण्यासाठी अनेक खेळाडू आतुर आहेत. बीसीसीआयनं तसे नियोजनही केलं असेल. पण दुसरा धोनी मिळणं कठीणच आहे. सचिन निवृत्त झाल्यानंतर संघाचं कसं होईल, असं म्हटलं जायचं पण संघानं जिंकणं सोडलं नाही. धोनीचंही तसेच झालं. जसा दुसरा सचिन मिळाला नाही तसेच दुसरा धोनीही मिळणार नाही. धोनीची जागा कोणी घेऊच शकत नाही.
धोनी जेव्हा रेल्वेकडून खेळायला गेला तेव्हा मित्रानं स्वत:च्या पैशातून त्याला बॅट घेऊन दिली होती. त्याचं आभार मानवेत की त्या बॅनर्जी सरांचे आभार मानावेत. ज्यांनी फुटबॉलच्या गोलकिपरला क्रिकेटच्या स्टंपमागे उभं केलं आणि त्याचं मुलानं देशाला वैभव मिळवून दिलं. मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध डिसेंबर २००४ मध्ये पाहिलेला धोनी आजही मला आठवतो. त्याच्या हातात धुपाटणं जणू, ५२ इंच छाती, लाल लांबसडक केस, चालणं तर अगदी कसलेल्या मातीतल्या पैलवानासारखं.. पण पहिल्याच चेंडूवर शून्यात धावबाद…त्यावेळी अनेकांना वाटलं होतं की गांगुलीनं संघात कोणालं घेतलं.. पण तोच रांगडा गडी नंतर भारतीय संघाचा कर्णधार झाला अन् टी २० चा विश्वचषकही जिंकून दिला…. त्याच्या स्वभावाची दुनिया फॅन झाली होती..
पेशावरमध्ये पाकिस्तानविरोधात धोनीनं केलेली १४८ धावांची खेळी अन् त्या राणा नावेदला लागोपाठ तीन षटकार खेचत त्याचे केस आणि करीयर दोन्ही बरबाद केले.. आणि तिथून परवेज़ मुशर्रफ तुझा दिवाना झाला.. जयपूरमध्ये श्रीलंकाविरोधात केलेली १८३ धावांची खेळी. यात चमिंडा वास सारख्या गोलंदाजाला कव्हरला लगावलेले दोन खणखणीत षटकार…आजही लक्षात आहेत… २०११ च्या विश्वचषकातील षटकार तर कोणीच विसरु शकत नाही…… धोनीच्या अशा अनेक अविस्मरणीय खेळी आहेत.. ज्या प्रत्येकाच्या मनात घर करुन कायम राहतील…
धोनीनं फक्त कर्णधार, फलंदाजीतच नाही तर यष्टीरक्षणाची मोठी जबाबदारी पार पाडली… गेल्या दहा ते १५ वर्षात विकेटमागे एखाद्या भिंतीप्रमाणे तू उभा राहिला. तुझ्या चपळाईने अनेक फलंदाजांना बाद झालेलंच समजलं नाही. चाळीशीतही वयातही २२ यार्ड धावपट्टी पार करताना धोनी उसेन बोल्टलाही मागे टाकू शकतो, असं म्हटलं तर वावगं वाटायला नको…..
धोनीनं भारतीय संघाला खूप काही दिलं आणि शिकवलं. धोनीनं अनेकांना आपल्या ध्येयावर प्रेम करायला शिकवलं. देशासाठी धोनीनं खूप काही पणाला लावलं आहे… ज्यावेळी मुलीचा जन्म झाला त्यावेळी तब्बल ४० दिवसांनी त्यानं तोंड पाहिलं…. नाहीतर आजचे क्रिकेटर अर्धवट दौरा सोडून सरळ रुग्णालयात पळतात… अशा खेळाडूनं धोनीचा आदर्श घ्यायला हवा….
विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जाडेजा, अश्विन, शामी, भूवनेश्वर, रहाणे ही तुझी गुंतवणूक आहे. आणिबाणीच्या क्षणी तू चक्क दिग्गजांनाही डावलून यांच्यावर विश्वास दाखवला होतास.. त्यावेळी टीकाही सहन केल्या होत्या. पण आज या खेळाडूकडे पाहिल्यानंतर लोक तुला सलाम करतात…पण याचं धोनीनं कधीच क्रेडीट घेतलं नाही… धोनीची आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, सामना गमावल्यानंतर धोनीनं अनेकदा जबाबदारी स्वत:वर घेतली पण सिरिज जिंकल्यानंतर एखाद्या कोपऱ्यात दिसायचा.. आता हा कोपराही रिकामा दिसेल. धोनीनं क्रिकेटला नेहमी आदर सन्मान दिला. सामना गमावल्यानंतर इतर खेळाडूसारखं भावनावश होऊन बॅट फेकली नाही.. की Gloues फेकल्या नाहीत.. शांत राहून पराभव स्वीकारला… आणि भारतीय संघातील खेळाडूंना विजयाबरोबर पराभव स्वीकारायला शिकवलं.
शेवटी एकच सांगेन… माही, तुझ्याकडून महत्वाचं शिकलोय, “ज्याला जिंकायचं आहे त्याला हे माहित पाहिजे कधी लढायचं आणि कधी शांत राहयचं…”
Thank you Mahi