करवीरपुरवासिनी श्रीमहालक्ष्मीची शिल्पकृती सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेलीआहे. भारतीय पुरातत्व खात्यामार्फत झालेल्या संवर्धनामुळे देवीच्या मूळ स्वरूपात बदल झाल्याचा भक्तांचा आरोप आहे. झालेल्या प्रकाराविरोधात श्रीमहालक्ष्मी मंदिराच्या न्यासाकडून न्यायालयीन प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याने (एएसआय) गेल्या वर्षापासून कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मूर्तीच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्या हातात घेतली होती. मूलतः दगडात कोरलेल्या या मूर्तीचा काळ शिलाहार- यादव काळापर्यंत मागे जातो. सुमारे १००० वर्षे जुन्या असणाऱ्या या मूर्तीच्या संवर्धनाच्या प्रक्रियेतून मूर्ती क्षतीग्रस्त झाल्याचा दावा देवीच्या भक्तांनी केलेला आहे.
आणखी वाचा : कळसूत्री बाहुल्या ते ‘आलम आरा’! भारतीय कलापरंपरेचा ४५०० वर्षांचा अनोखा इतिहास!
पुरातत्त्व खात्यामार्फत संवर्धनासाठी वज्रलेपाचा वापर करण्यात आला होता. वज्रलेपचा काही भाग चार दिवसांपूर्वी काढण्यात आला. संवर्धनासाठी वापरण्यात आलेला लेप पूर्णतः काढल्यावर देवीच्या रूपात बदल झाल्याचा तसेच वज्रलेपाच्या प्रक्रियेतून देवीचे विरूपिकरण झाल्याचा भक्तांचा आरोप आहे. देवी व भक्तांचे नाते हे अतूट आहे. देवी विषयीचा भविकांमध्ये असलेला भाव व त्या भावातून देवीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच भावनिकही असतो. याच भावनेतून भक्ताच्या एका हाकेवर धावून येणाऱ्या देवीसाठी भक्त काहीही करू शकतात, हा दावा काहीसा अतिशयोक्त वाटला तरी याचे दाखले इतिहासात उपलब्ध आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरनिवासिनी महालक्ष्मीच्या एक भक्ताचा या लेखात थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणखी वाचा : Happy Birthday Barbie: बार्बी म्हणते, अवघे ६३ वयोमान; अमेरिकन बार्बी होती ‘मेड इन जपान’!
करवीर नगरी अर्थात कोल्हापूरच्या बऱ्याच गोष्टी प्रसिद्ध आहेत. खाद्यसंस्कृतीपासून ते युद्धकलेपर्यंत अनेक कलांनी या भूमीला समृद्धी बहाल केली. पुराणात हे स्थान ‘दक्षिणकाशी’ म्हणून प्रसिद्ध आहे. देवीच्या प्रसिद्ध शक्तिपीठांच्या यादीत कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा उल्लेख गौरवाने केला जातो. तसेच विविध शिलालेखांमध्ये (दगडावरील कोरीव लेख) करवीर, कोल्लापूर, कोलापूर, कोलगिरी या पर्यायीनामांचा उल्लेख येतो. करवीर माहात्म्यात या भागाचे वर्णन ‘वाराणस्याधिकं क्षेत्रं करवीरं पुरं महत’ असे केले आहे. म्हणजे करवीरपूर ही महान नगरी वाराणसीहून श्रेष्ठ आहे. या नगरीच्या उल्लेखावरून तिच्या समृद्धतेची तसेच ख्यातीची कल्पना येते.
आणखी वाचा : International Women’s day 2023: २००० वर्षांपूर्वी स्वतःच्या नावाने नाणी पाडणारी मराठी आद्य राणी ‘नागनिका’
साहजिकच समृद्धी ही अनेकांची मती खराब करते. ते स्वकीय असोत वा परकीय लोभ कुणालाही सुटलेला नाही. त्यामुळेच तत्कालीन समृद्ध असलेल्या कोल्हापूरवर व पर्यायाने देवीच्या मंदिरावर हल्ले झाल्याचे दाखले मिळतात. मध्ययुगीन काळात श्रीमहालक्ष्मीच्या मूर्तीवर परकीयांकडून झालेले आक्रमण जितके खेदजनक होते तितकाच स्वकियांकडून झालेला हल्ला हा वेदनादायी होता व आजही आहे. इतिहासाच्या पानांत असाच स्वकीयांकडून झालेल्या आक्रमणाचा पुरावा शिलालेखाच्या स्वरूपात आजही उपलब्ध आहे. हा शिलालेख कोल्हापूरच्या लक्ष्मीविलास राजवाड्याच्या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.
हा शिलालेख मूलतः वीरगळ असून देवीसाठी प्राण अर्पण केलेल्या वीराची माहिती देतो. असे असले तरी या लेखाचा वरचा भाग नष्ट झालेला आहे. त्यामुळे या भागातील तत्कालीन राजघराण्याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही. या शिलालेखानुसार चोल राजाने या भागावर आक्रमण करून हे मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला होता. साहजिकच देवीचे आद्य मंदिर हे लाकडाचे होते हे या गोष्टीवरून लक्षात येते. परंतु अभिलेख हा भग्न अवस्थेत असल्याने त्या काळात या भागात नेमके कोणते राजघराणे राज्य करत होते याविषयी माहिती मिळत नाही.
प्रसिद्ध अभ्यासक रा. चिं . ढेरे यांनी इतर ऐतिहासिक पुराव्यांच्या मदतीने नमूद केल्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये त्या काळात चालुक्य राजा सोमेश्वर (१० वे शतक) याचे अधिपत्य असावे. तर चोलांचा राजा ‘राजाधिराज’ चोल याने आक्रमण कले होते. या युद्धाचा उल्लेख तत्कालीन चोल अभिलेखांमध्ये सापडतो. त्या उल्लेखानुसार या दोघांमधील युद्ध कोप्पम (कोप्पळ) येथे झाले होते. युद्धात चोलांचा विजय झाला होता. विजयाचे स्मारक म्हणून चोल राजाने कोल्हापूर मध्ये दीपस्तंभ उभारला होता. सध्या असा कुठल्याही प्रकारचा विजय स्तंभ अस्तित्वात नाही. परंतु चोल आपल्या नोंदींमध्येही अशा प्रकारच्या स्तंभाचा उल्लेख करतात. या चोलांच्या आक्रमणात त्यांनी महालक्ष्मी मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा हा प्रयत्न हाणून पडण्याच्या कामात ‘मुतय्या’ याने आपल्या प्रणाची बाजी लावली व त्याच्या याच पराक्रमाच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा विरगळ अभिलेखासह कोरण्यात आला होता.