Nag Panchami traditions श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणतात. या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने पाटावर नऊ नागांच्या आकृत्या काढून त्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी घराच्या दरवाजाच्या भिंतीवरही फणायुक्त नाग काढून त्याची पूजा करतात. दूध आणि लाह्या यांचा नैवेद्य त्यांना दाखवतात. नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी या दिवसाचे महत्त्व सांगणाऱ्या कथेचे वाचन करण्यात येते. ही कथा शेतकऱ्याशी संबंधित आहे. एक शेतकरी होता. एका सकाळी त्याने नित्याप्रमाणे जमीन नांगरण्यास प्रारंभ केला; परंतु नांगर जमिनीत घुसताच त्या खाली असलेल्या नागाच्या वारुळातील पिलांना त्याचा फाळ लागला आणि ती पिल्ले गतप्राण झाली. हे पाहून नागिणीला राग आला; तिने त्या शेतकऱ्याला व त्याच्या बायका-मुलांना दंश करून ठार मारले. मग तिला कळले की, त्या शेतकऱ्याची एक मुलगी परगावी आहे. नागीण तिला मारण्यासाठी परगावी गेली. पाहते तर त्या शेतकऱ्याच्या मुलीने पाटावर चंदनाचे नाग काढून त्यांची पूजा केली होती. दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवून ती त्यांची प्रार्थना करत होती. ते दृश्य पाहून नागीण प्रसन्न झाली. नैवेद्याचे दूध पिऊन ती तृप्त झाली आणि तिने त्या शेतकऱ्याच्या मुलीला डोळे उघडण्यास सांगितले. मुलीने डोळे उघडले आणि समोर सळसळती नागीण पाहून ती मुलगी घाबरली. नागिणीने तिला अभय दिले आणि झाला तो वृत्तांत कथन केला. शेतकऱ्याच्या मुलीने वडिलांकडून झालेल्या चुकीची माफी मागितली. त्या मुलीच्या भक्तिभावाचे फळ म्हणून नागिणीने तिच्या आई-वडिलांना आणि भावंडाना पुनश्च जीवनदान दिले. ही कथा पौराणिक असली तरी त्यातून स्पष्ट होणारा मथितार्थ हा शेतकऱ्यांसाठी सापाचे महत्त्व विशद करणारा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा