– चंदन हायगुंडे
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या गुन्ह्यात सनातन संस्थेशी संबंधित वकील संजीव पुनाळेकर आणि साधक विक्रम भावे याना सी.बी.आय.ने २५ मे २०१९ रोजी अटक केली. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टी (भाजप) सत्तेत असताना “हिंदुत्ववादी” वकील पुनाळेकर याना अटक झाल्याबद्दल काही लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. पत्रकारिता वर्तुळातही याविषयी चर्चा आहे. ३ जून २०१९ रोजी पुनाळेकरांच्या समर्थनार्थ एका वकिलांच्या गटाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी काही पत्रकारांनी “तुमच्या हिंदुत्ववादी विचारांचे सरकार” सत्तेत असताना पुनाळेकरांना अटक झाली असा मुद्दा उपस्थित केला.
बरेच “हिंदुत्ववादी” नेते, कार्यकर्ते एकाच वेळी सनातन संस्थेसह विविध “हिंदुत्ववावादी” संस्था संघटनांसोबत वावरताना, काम करताना दिसतात. नुकतेच गोव्यात सनातन संस्था व संबंधित गटांनी आयोजित केलेल्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात भाजपचे तेलंगणातील आमदार ठाकूर राजा सिंघ यांनी भाषण केले. तरीही एकूण हिंदुत्ववादी चळवळीत सनातन संस्था प्रिय आहे असे म्हणता येत नाही.
मुळात सनातन संस्था वेगळेच रसायन आहे. सनातन संस्थेचे संस्थापक “परात्पर गुरु” डॉ. जयंत आठवले म्हणतात कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे देश रसातळाला गेला. संस्थेचे मुखपत्र/ वृत्तपत्र “सनातन प्रभात” मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार “परात्पर गुरु” आठवले ३० मे २०१५ रोजी “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या कार्यातील मुख्य भेद” स्पष्ट करताना म्हणतात, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४० लाख स्वयंसेवक असूनही त्यांनी साधना न केल्यामुळे गेल्या ६८ वर्षात देश टप्प्याटप्प्याने सर्वच क्षेत्रात रसातळाला गेला. याउलट हिंदू जनजागृती समितीला येत्या ५ वर्षात केवळ ४ लक्ष साधना करणारे साधक कार्यकर्ते मिळतील. त्यानंतर ती तत्क्षणी धर्मक्रांतीला आरंभ करून हिंदुराष्ट्राची म्हणजेच रामराज्याची स्थापना त्यापुढील ३ वर्षात, म्हणजे आजपासून ८ वर्षात, म्हणजेच २०२३ यावर्षी करेल.”
(हिंदू जनजागृती समिती सनातन संस्थेशी संबंधित आहे). याबाबत दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना संघाच्या जेष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि सनातन प्रभातमधील हा लेख “नॉन सेन्स” असून “संघ परिवाराच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी साठी देशभरात १.५ लाख सेवा केंद्र सुरु आहेत. हीच खरी साधना आहे.” सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका चित्रात अमित शहांना उद्देशून म्हटले आहे कि, “होय अमितजी, संपूर्ण बहुमताचे अन हिंदुत्ववादी (?) भाजपचे शासन धर्महानी रोखू शकत नसल्याने ‘हिंदू राष्ट्राची स्थापना’ हा उपायही हिंदू धर्मात आहे.”
अशी अजूनही उदाहरणे देता येतील कि ज्यातून सनातन संस्था व अन्य हिंदुत्ववादी व्यक्ती, संघटनांमधील भेद दिसून येतील. सनातन संस्थेचे विचार व कार्यपद्धतीशी असहमत असणारा मोठा गट हिंदुत्ववादी चळवळीतही आहे. सनातन संस्थेची “टक्केवारी” मध्ये माणसाची आध्यात्मिक पातळी मोजण्याची पद्धत, अतार्किक वैचारिक मांडणी, सनातन प्रभात मधील चमत्कारिक व अवास्तव वाटावे असे लेख अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसाठीही चेष्टा मस्करीचा विषय बनला आहे. सनातन संस्थेनुसार वकील पुनाळेकरांची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के आहे.
काही हिंदुत्ववादी मंडळी तर सनातन संस्थेमुळे हिंदू समाजाचे नुकसान होते आहे, सनातन संस्थेमुळे “खरे हिंदुत्व” बदनाम होते, असे मानून त्यापासून समाजाने व हिंदुत्ववादी चळवळीने सावध राहावे यासाठी प्रयत्नही करताना दिसतात. सनातन संस्थेने वेळोवेळी आपण निर्दोष असल्याचे म्हटले असले तरी भाजप नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सनातनच्या विचारधारेवर जाहीर टीका केली आहे. तसेच काँग्रेस पक्ष सत्तेत असताना सनातनवर प्रभावी कारवाई झाली नाही, पण ती आम्ही करून दाखवली, असेही फडणवीस म्हणतात.
अर्थात भाजप राजकीय पक्ष आहे व राजकारणातील गणिते निराळी असतात. एकीकडे भाजप सत्तेवर असताना सनातन संस्थेशी संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई होते तर दुसरीकडे “हिंदू दहशतवाद” काँग्रेसने निर्माण केलेला बागुलबुवा आहे असे आरोप करून मालेगाव बॉम्बस्फोट २००८ गुन्ह्यातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूरला भाजप लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन निवडून आणतो. तसेच हिंदुत्ववाद्यांना “धर्मांध” म्हणणारा काँग्रेस पक्ष नालासोपारा स्फोटके प्रकरणात संशयित हिंदुत्ववादी आरोपी वैभव राऊतच्या अटकेचा जाहीरपणे विरोध करणाऱ्या नवीनचंद्र बांदिवडेकरला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देतो. संभाजी भिडे गुरुजींच्या अटकेची मागणी करणारे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत बसवा वगैरे म्हणणारे प्रकाश आंबेडकर पुढे भिडेंच्या “श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान”चे धारकरी व संघाशी जवळीक असणाऱ्या गोपीचंद पाडळकरांना लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी देतात. हे सर्व राजकीय खेळ आहेत, ज्यामध्ये विचारधारेपेक्षा मतांना प्राधान्य दिले जाते.
त्यामुळे भाजप सत्तेवर असताना पुनाळेकर व भावे अटक होतात यात काही आश्चर्य नाही. यापूर्वीही भाजप सत्तेवर असताना सनातन संस्थेशी संबंधित लोक अटक झाले आहेत. कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या गुन्ह्यात सनातन संस्थेशी संबंधित संशयित आरोपी समीर गायकवाड व डॉ. वीरेंद्र तावडे याना अटक झाली, त्यावेळी भाजपचेच सरकार होते. भाजप सत्तेवर असतानाच डॉ. तावडेना दाभोलकर खून प्रकरणात अटक झाली.
दरम्यान, दाभोलकर खुनाचा तपास करणाऱ्या सी.बी.आय.ने मात्र घोळ घातला आहे. आरोपी वीरेंद्र तावडे विरोधात सप्टेंबर २०१६ यामध्ये न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रात सी.बी.आय. म्हणते कि सनातनचे साधक विनय पवार व सारंग अकोलकरने दाभोलकरांना २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात सकाळी ७.२५ ला गोळ्या घालून ठार मारले. आणि आता मात्र सी.बी.आय.ने न्यायालयाला सांगितले आहे कि आरोपी सचिन अंदुरे व शरद कळसकरने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या. कळसकर कर्नाटकातील पत्रकार गौरी लँकेश खून प्रकरणातही आरोपी आहे. कळसकरने आठ महिन्यापूर्वी कर्नाटक पोलिसांना दिलेल्या जबाबाच्या आधारे पुनाळेकर व भावेला दाभोलकरांच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक केल्याचे सांगितले जाते. भावेची पार्श्वभूमीही संशयास्पद आहे. ५ जून २००८ रोजी ‘आम्ही पाचपुते’ या नाटकाचा प्रयोग सुरू असताना ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये स्फोट घडवण्यात आला. या नाटकामध्ये हिंदू देवदेवतांचे विडंबन झाले म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी हा स्फोट घडवला गेल्याचे तपासयंत्रणेचे म्हणणे आहे. या गुन्ह्यात भावे व रमेश गडकरी अशा दोन आरोपीना न्यायालयाने दोषी ठरविले. आता पुनाळेकर, भावे, तावडे दाभोलकरांच्या खुनात सहभागी होते कि नाही ते न्यायालय ठरवेल.
मात्र दाभोलकर खून प्रकरणात सनातन संस्था सुरवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दाभोलकरांचा खून २० ऑगस्ट २०१३ला झाला. बरोबर दोन दिवस आधी १८ ऑगस्ट रोजी सनातन प्रभात मध्ये प्रसिद्ध झालेले एक चित्र तपास यंत्रणांनी मिळवले. हे चित्र तपासातील कागदपत्रांचा भाग आहे.
या चित्रात दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस)ला मृत अवस्थेत पडलेला राक्षस दाखवला आहे. व या राक्षसाच्या पोटात “वारकरी”, “हिंदुत्ववादी” व “हिंदू जनजागृती समिती”च्या हातांनी झेंडा खुपसल्याचे दाखवून त्यास “हिंदूंचा निर्धार” म्हटले आहे. या चित्राखाली “धर्मद्रोही कायदा बारगळला” असे म्हटले आहे. या चित्राच्या आधारे दाभोलकरांच्या खुनात सनातन संस्थेचा हात असे म्हणता येत नाही. मात्र या चित्रातून सनातन संस्थेच्या विचारधारेबद्दल संशय निर्माण होतो.