एखाद्या भुईकोट किल्ल्यासारख्या मंदिरातून कडाडणारा संबंळ काय बरं सांगत असेल ? सत्तेच्या सर्वोच्चस्थानी करुणा विस्तारणारी ‘आई’ असावी, असं तत्त्वज्ञान वाढीस लागावं, असं घोषवाक्य म्हणजे आई ‘राजा’ उदो उदो’. ‘ती’ राजाच्या स्थानी. करुणा ही भावना संवेदनशील मनाला कृती करायला भाग पाडते. बुद्धांची करुणा आणि आईची करुणा सारखीच असेल, नाही का?
आपल्याच परंपरा अलिकडे नुसतीच रीत बनल्यात. त्यातील तत्त्वज्ञान, संदेश आपण हरवून बसलो आहोत का ? घटस्थापनेचा कलश डोईवर घेऊन नुसताच मिरवायचा किंवा पूजेत मांडायचा, अर्थ जायचे विसरुन. खरं तर कृषी विद्यापीठात बीज प्रमाणिकरणाची प्रक्रिया करताना कमी पावसात येणारी पिके कोणती, असा प्रश्न विचारण्याचा हा काळ आहे. नवरात्र हा रब्बी पेरणीपूर्वीचा काळ असतो.
आणखी वाचा-Shardiya Navratri 2023: भारतातील शक्ती पूजेचा (देवी) सर्वात प्राचीन पुरावा कोणत्या शतकातील?
तुळजापुरी जेव्हा दुपारी बारा वाजता घट बसवले जातील तेव्हा आपण काय करू तर फोटो काढू. म्हणजे आपल्या आनंदाच्या व्याख्या फोटो काढून ‘अपलोड’ करणे एवढ्यापुरत्याच झाल्या आहेत. फार तर नाचू फेर धरुन. म्हणजे गरबा करू अगदी बेरात्रीपर्यंत. पण मग घट का बसवू ? पाच प्रकारची बियाणे घेऊ आणि घटावर ठेवलेल्या मातीमध्ये टाकून देऊ. ओल्या मातीत आठ दिवसात जे उगवून येईल ते रब्बी पेरणीला चांगलं, असं कधी तरी पूर्वी असावं. म्हणजे घटस्थापना ही बीज प्रमाणिकरणाची प्रक्रिया.
तुळजाभवानीची आरती कधी लिहिली असेल ? ‘दुर्गे ‘दुर्गट’ भारी तुजवीण संसारी’, हे नरहर नावाच्या कवीसमोर दुर्गट पारलौकिक जीवन तत्त्वज्ञान मानणाऱ्या प्रत्येकासमोर असेलच. पण संकटं आपल्यासमोर किती तरी वेगळ्याच स्वरुपात उभी आहे. डॉ. सुदाम मुंडे आठवतात का ? – गर्भात मुलगा आहे की मुलगी आहे तपासणारा. आपण त्या मानसिकतेवर मात करू शकलो आहोत ?
आणखी वाचा-नवरात्री २०२३: नवरात्रीत गरबा खेळताना ‘या’ सोप्या स्टेप्स करा! Video नक्की बघा…
तुळजाभावनी मंदिराकडे खोलवर जाणाऱ्या पायऱ्या उतरताना, गळ्यात कवड्याची माळ, हातात पोत, नैवेद्याचे ताट घेऊन जाणारा एक मोठा वर्ग मोबाईलवरची बटणं दाबून जुन्या परंपरा पार पाडतो तेव्हा त्यांना नक्की कोणाचा, कशाचा उदोकार करतो आहोत ? कळत असेल का, की महिलांच्या हाती सत्ता देण्याचे अर्थ म्हणजे नवी दृष्टीच विकसित करणं. आपल्याकडे मोठे संकल्प कधी वर्तमानात केले जात नाहीत. मग प्रश्न करुणा विस्तारणाऱ्या मानसिकतेचा असो किंवा महिला आरक्षणाचा.